पराभवाची चाहूल काहीही दाखवते

पराभवाची चाहूल काहीही दाखवते
#प्रासंगिक

'मी घड्याळाचे बटन दाबले आणि मत कमळाला गेले' असे हास्यास्पद वक्तव्य राज्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी केले आणि सोशल मीडियातील विनोदी विश्वात एकाच खळबळ उडवून दिली. या विधानातून शरद पवारांना काय सुचवायचे होते हे सगळ्यांच्याच लक्षात आलेच असेल. ईव्हीएम मध्ये कसा फेरफार करता येऊ शकते हे त्यांना सांगायचे होते. आणि त्यातही फेरफार मध्ये फक्त कमळाचाच फायदा होतो हे दाखवण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयत्न. तो केवळ शरद पवारांनीच मांडला असे नाही. ईव्हीएम वर बोट उचलण्याचा विद्वत पराक्रम करणारे शरद पवारांप्रमाणे अरविंद केजरीवाल, राहुल गांधी व ममता बनर्जीसारखे अनेक जण आहेत. 2014 चा मोदी विजय पचनी पडत नसल्याने ईव्हीएम चा आसरा सर्व विरोधकांनी घेतला होता व 2019 ला पुन्हा मोदीच येणार हे दुःख भयानक वाटणाऱ्या विरोधकांनी पुन्हा धसका घेतला व सरळ ईव्हीएमलाच टार्गेट करणे निवडणुकी अगोदर सुरू केले. पराभव समोर दिसू लागल्याने ईव्हीएम बळीचा बकरा होतोय हे एव्हाना आता जनता समजू लागले आहे.

पण, शरद पवारांसारख्या जाणत्या(?) राज्याने तरी अश्या (घाबरट) टोळीत का सामील व्हावे. अनेक पराभव त्यांनी या अगोदर पचवीले आहे असा प्रश्न काहींना पडू शकतो. त्यात वावगे नाही. पण पराभव झाल्यावरही सत्तेत पत्ते लावून बसण्यात पवार माहिर होते. बहुमतात कोणीही येवो त्याला टेकू देऊन सत्तेचा आस्वाद घ्यायचा हे पवारांच्या राष्ट्रवादीचे सूत्र. म्हणूनच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ओला भाजपला पाठिंबा राहील असे जाहीर करून टाकले होते. पण भाजपा सरकारच्या बाबतीत पवारांचे हे सूत्र काही चालत नाही. सेना भाजपाचे कितीही भांडण झाले तरी ते एकमेकांना काही सोडत नाही. मग पवारांचे घड्याळ बिचारे विरोधकांच्या हातातच अडकून पडते. त्यामुळे पहिल्यांदा पराभव होत असूनही कधीही न घाबरणारे पवार सत्ता विवंचनेमुळे आता मात्र भयभीत होताना दिसत आहे. पवार किती घाबरले आहेत हे त्यांनी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या विधानावरूनही स्पष्ट होते. काय म्हंटले होते पवार? "सुप्रिया जर निवडणुकीत हरली, तर लोकांचा लोकशाहिवरचा विश्वास उडून जाईल." या वाक्यातून पवारांची भीतीच उद्धृत होते.

असो... पवारांच्या पुरोगामी उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी अनेक देवळात व मशिदीत दर्शन घेतले आहे. त्यामुळे देव पवारांसह त्या सर्वांना बळ देईलच. पण पवारांनी अश्या घाबराट वागण्यामुळे त्यांचे जाणत्या राजाचे सिंहासन कमकुवत करून घेतले आहे. राजाच असा घाबरू लागला तर त्याच्या शिलेदारांनी करावं काय? मग ते जाऊ लागतात भाजपच्या वाटेकडे. मग पवारांच्या शिलेदारांना टेन्शन येतं की लोक मुलांना पळवतात म्हणून. पण शरद पवारांची ख्याती त्यांच्या मुलांनी पहिली आहे, नातवांनी नाही. त्यामुळे पवार नातवंडासमोर असे घाबरे घाबरे वावरू लागले तर नातू तरी काय करणार?

खरं तर या प्रकरणी पवारांनी ज्या लोकांनी हैदराबाद व गुजरात मधून ईव्हीएम मशीन आणले, त्यांच्यावरच संशय घेतला असता तर त्यांच्या प्रतिमेला ते शोभेसे ठरले असते. किंबहुना पवारांचा अढळ हात आपल्यासोबत आहे म्हंटल्यावर ईव्हीएमलाही हायसे वाटले असते. पण पवारांनी ईव्हीएम कडेच बोट केले व पर्यायाने निवडणूक आयोगाकडे. पराभव पचवणे विरोधकांना इतके अवघड होऊन गेले आहे की ते आता निवडणूक आयोगालाही भाजपच्या हातातील बाहुली म्हणू लागले आहेत. देशात इतके वर्ष सत्ता चालविणार्यांना लोकशाहीचे सर्व पैलू कळले असले तरी विरोधक म्हणून जो मोठेपणा घ्यायचा असतो त्याबाबतीत मात्र ते सपशेल नापास ठरले आहेत. लोकशाही व संविधान धोक्यात आली असल्याची बोंब करणे हे त्याचेच लक्षण आहे. अन्यथा लोकशाहीची ताकद व संविधानाची सुरक्षितता या मंडळींना कळणार नाही असे होणार नाही.

ते काहीही असो. पवारांनी मात्र कमळाला मत जाताना पाहिले आहे. पवारांनी आपल्या
अनुभवाच्या चष्म्यातून हे पहिले असेल तरीही त्यास गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. कारण कोण कुठल्या लोकांनी ते ईव्हीएम (?) आणून पवारांसमोर ठेवले आणि पवारांनी बटन दाबले आणि कमळाला मत गेल्याचे प्रकरण घडले. पण ही घटना काही मतदान करताना आयोगाने मान्यता दिलेल्या ईव्हीएमद्वारे घडलेली नाहीये. आयोगाने मान्यता न दिलेले ईव्हीएम मशीन लहान मुलाच्या खेळण्यासमान आहे. कारण लोकांचा विश्वास ईव्हीएम मशीनवर नाही तर निवडणूक आयोगावर आहे. ईव्हीएम बद्दलची चौकशी खुद्द न्यायालयात झाली आहे आणि न्यायालयात ईव्हीएम वर शंका घेणारे तोंडघशी पडले आहेत. म्हणूनच लोकसभा निवडणूक चालू असताना विरोधकांच्या टोळकीने पुन्हा न्यायालयाचे द्वार ठोठावले आणि न्यायालयाने त्यांना दारातूनच परतवून लावले. एकाच गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा याचिका टाकून न्यायालयाचा वेळ जातो म्हणून विरोधकांच्या याचिकेला न्यायालयाने केराची टोपली दाखवली. पवारांचे विधान या घटनेनंतर लगेच आलेले आहे. त्यामुळे ईव्हीएम खोटे, न्यायालय खोटे, न्यायाधीश खोटे, निवडणूक आयोग खोटा, आयुक्त खोटे आणि पवार मात्र चोवीस कॅरेट खरे आहे असे त्यांना दर्शवायचे आहे काय? पवारांचा हे वागणे त्यांची पराभवाची भीती दर्शवते. पराभव दिसू लागल्यामुळेच त्यांना आता काहीही दिसू लागले आहे. त्यांनी कमळाला मत जाताना पाहिले हा त्याचाच प्रकार, दुसरे तिसरे काही नाही.

©️कल्पेश जोशी
lekhagni.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान