जळणारे बांध, होरपळणारे वृक्ष

जळणारे बांध, होरपळणारे वृक्ष

मार्च महिना लागला की रस्त्या रस्त्याने शेतीचे जळणारे बांध दिसणार नाहीत असे होत नाही. हायवे लगतचे शेत असो किंवा ग्रामीण रस्ते असो; उन्हाळ्याच्या सुरुवातीला रस्त्याच्या बाजूने आग लागलेली दिसून येते. या आगीत कित्येक झाडे, झुडुपे लहान लहान रोपे जाळून नष्ट होत असतात. येणाऱ्या जाणाऱ्या बहुतेक जणांना हा प्रश्न पडतो. आग का लागली? कोणी लावली? कश्यासाठी लावली? उत्तर मिळत नाही. पण ह्या आगी शेतकऱ्यांनीच लावलेल्या असतात हे माहीत पडल्यावर मन उदास होते. सर्व मानवजातीस अन्न पिकवून देणारा हा अन्नदाता शेतकरी या वृक्षांच्या जीवावर का बरे उठत असेल, असा पुढचा प्रश्न लगेच पडत असतो.

'वसुधैव कुटुंबकम' हा संस्कार असलेली आपली भारतीय मानसिकता व त्या मानसिकतेच्या जोरावर आपल्या घरापासून ते जगाचा व्यापक व हितकारी विचार करणारे भारतीय व त्यातही पर्यावरणाची काळजी करणारा व वृक्षांना देवत्व बहाल करणारा आपला शेतकरी आहे. पण काही गैरसमज व अजाणतेपणी आज शेतकरी राजाकडून मोठी चूक घडत आहे. बांधावरील वाळलेले निरुपयोगी गवत व काटी जाळून अडचण दूर केली जाते. त्याच्या राखेपासून शेताला खत म्हणून उपयोग होतो. म्हणून हे बांध दरवर्षी सर्रास जाळले जात आहेत. परंतु, या सोबत गेल्या पावसाळ्यात कोंब फुटलेले रोप उगवलेले असतात. एका लहान कोंबपासून त्याचे रोपटे होईपर्यंतचा प्रवास पूर्ण व्हायला त्याला एक वर्ष लागून जाते. पण वर्ष पूर्ण होताच या बांधावर लावलेल्या आगीमुळे ते जळून भस्मसात होते. त्यांच्यासोबतच मोठमोठी झाडे ही जाळू लागतात. कित्येक मोठं मोठी कडुनिंबाची झाडे आग लागून उन्मळून पडलेली दिसतात. बऱ्याच झाडांची खोडे आतून जळून जातात व पहिल्या पावसात येणाऱ्या वेगवान वाऱ्यात हीच झाडे मोडून रस्त्यावर पडतात. अनेकदा विजेच्या तारांवर किंवा खांबांवर ही झाडे पडतात. त्यामुळे लाईट जाणे, डीपी जळणे किंवा शॉर्ट सर्किट होणे असे प्रकार वारंवार घडताना दिसून येतात. यात सर्वात जास्त नुकसान कोणाचे होत असेल तर ते शेतकऱ्याचेच. त्यामुळे हे बांध जाळणे थांबले पाहिजे.

वातावरणातील तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. हिमनग वितळू लागले आहे. ओझोन वायूचा थर कमी होत आहे. अंटार्क्टिका मधील बरीच हिमनगे वातावरणीय तापमान वाढल्यामुळे वितळली आहेत व त्यामुळे समुद्रातील पाण्याचा स्तर वाढताना शास्त्रज्ञांच्या निरीक्षणास आले आहे.  मे-जून महिन्यात राज्यातील व त्यातही विदर्भातील जिल्हे व खान्देशातील जळगांव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील तापमान दरवर्षी वाढताना दिसून येत आहे. उष्माघातामुळे मृत्यू पावणाऱ्या जीवांची संख्या वाढत आहे. पशु पक्ष्यांचे पाणी आणि अन्न मिळेनासे झाले आहे. जनावरांना चारा मिळत नाहीये. त्यात दुष्काळ पडला म्हणजे काय दैना होते हे नवीन सांगणेच नको. त्यामुळे आजच्या या परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर तारणहार आहे ते फक्त 'वृक्ष'. वृक्षांची संख्या वाढली, त्यांना जगवले तरच या महासंकटावर मात करता येऊ शकते. पण शहरीकरणामुळे, औद्योगिकरणामुळे व शेताचे बांध जाळण्यासारख्या मानवी चुकांमुळे वृक्षांची झपाट्याने संख्या कमी होत आहे.

एक वृक्ष मोठे व्हायला १५ ते २० वर्ष सहज लागून जातात. पण त्या वृक्षाला तोडायला फक्त काही मिनिटे लागतात. दरवर्षी शासनातर्फे वृक्ष लागवड केली जाते. पण दरवर्षी त्याच खड्ड्यात नवीन झाडे लावताना आपण पाहत असतो. पावसाळा आला की झाडे लावण्याला सगळेच आतुर होतात. कारण उन्हाळ्यात झाडांची आवश्यकता सर्वांना कळू लागली असते. त्यामुळे शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये व सामाजिक संस्था सगळेच वृक्षारोपणासाठी तत्पर होतात. पण ही लावलेली वृक्षे जगतात का? आणि जगत नसतील तर का जगत नाही? याचा गांभीर्याने प्रत्येकाने विचार केला पाहिजे. नवीन वृक्ष लागवडी बरोबरच जी मोठी डौलदार वृक्षे आज हयात आहेत त्यांची काळजीही घेतली गेली पाहिजे. शेतीचे बांध जाळण्यामुळे नवीन उगवणारी रोपटे व जुनी मोठाली वृक्षे दोघांचे नुकसान होत आहे. ही वृक्षे अशीच नाहीशी होत राहिली तर पुढील १० ते १५ वर्षातच भीषण परिस्थिती निर्माण होईल आणि एक दिवस या वाढत्या तापमानामुळे माणसंही होरपळायला लागतील. त्यामुळे आज जी मोठी वृक्षे दिसताहेत त्यांची काळजी प्रत्येक मानवाने घेतली पाहिजे.

©️कल्पेश जोशी
Lekhagni.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान