नयनतारा चुकल्याच नाही(?)

नयनतारा चुकल्याच नाही!

मराठी साहित्य सम्मेलन आले आणि काही वाद झाली नाही असे शक्य आहे का? दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने अखिल भारतीय साहित्य सम्मेलनापुर्वी वाद हा होतोच. वाद हा जणु त्यांच्या पाचवीला पुजला आहे.

आता नुकताच ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना अ.भा. मराठी साहित्य सम्मेलनास दिलेले निमंत्रण रद्द झाल्यामुळे नवीन वाद उफाळला आहे. काही साहित्यिकांनी यावर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगितले. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य या निमित्ताने पुन्हा हादरुन गेले आहे.

हे का झाले? कश्यामुऴे झाले? कोणी केले? यात डाव्या उजव्यांचा काय संबंध? हा राजकारणाचा भाग आहे का? यावर मत मतांतर व विश्लेषण अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ लेखक पत्रकारांनी केलेच आहे.

नयनतारा यांचे लिखित भाषण एका संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी जे विचार मांडले आहेत ते न पटल्यामुळे त्यांना उजव्यांनी(?) सम्मेलनातून डावलले आहे, यामागे भाजप सरकारचा हात आहे, (काही जण तर पार रा.स्व.संघापर्यंतही पोहचतिल). असा आरोप होतोय. नयनतारा डाव्या वैचारिक गोटातील असल्याचा सगळीकडे समज आहे. तसा तो समज तो खराच आहे. त्यामुळे त्यांची टिका व आरोप उजव्यांवरच असले पाहिजे असा स्वाभाविक समज सगळ्यांनीच करुन टाकला आहे. पण खरं तर नयनतारा आजीबाईंनी देशातील व विशेषत: राज्यातील खरीखुरी वस्तुस्थिती सांकेतिक भाषेत मांडली आहे. त्यामुळे नयनतारांच्या शाब्दीक बाणातून डाव्यांचेच 'शीर' कापले गेले आहे. कसे ते पाहू.

काय आरोप होते नयनतारा यांच्या भाषणात?

पहिला वादातीत मुद्दा- "देशातील सांस्कृतिक- धार्मिक विविधता संपवण्याचा प्रयत्न होत आहे." असा होता.
आता काय चुकीचे आहे बरे यात? देशात काही पक्ष व संघटना जाणिवपुर्वक भारतीय संस्कृती संपवण्याच्या मागावर आहेत की नाही? ख्रिश्चन मिशन-यांकडून जबरदस्तीने गोर गरीबांचे धर्मांतरण सुरु आहे. देशाची पुर्वीपासुन चालत आलेली संस्कृती व परंपरा संपवण्यासाठी नवनवे पंथ व धर्म उदयास आणले जात आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांपुर्वी 'लिंगायत धर्म' स्थापन करण्यासाठी काँग्रेस सरकारने पुढाकार घेतला होता. तसेच आता गोरधर्म, शिवधर्म व मुलनिवासी अश्या भ्रामक कल्पनांमध्ये गुंतवुन देशाच्या सांस्कृतिक ऐक्यास सुरुंग लावण्याचे कार्य काही गटांकडून राजरोसपणे होत आहे. त्यामुळे नयनतारांच्या बोलण्यात तथ्य आहे, असे मानावे लागते.

नयनतारांच्या लिखित भाषणातील दुसरा वादातीत मुद्दा म्हणजे, "जमावाच्या हिंसाचारामुळे भीतीचे वातावरण आहे."
घेणा-यांनी याचाही गैर अर्थ घेतला. नयनतारांचा गोरक्षकांच्या व माॅब लिंचिंगच्या मुद्द्याकडे रोष नसुन, देशात मागील वर्षभरात झालेला हिंसाचार, मोर्चे, आंदोलनांना लावलेले हिंसक वळण व यामुळे सामान्यांत निर्माण झाली दहशत याकडेच ख-या अर्थाने रोष असावा. एल्गार परिषद, शहरी नक्षलवाद व त्यामध्ये अटक झालेले बुद्धीवादी व समाजातील उच्चभ्रू समजले जाणारे सापडल्यामुळे सामान्य नागरीकास धक्काच बसला होता. शिवाय पुतळे कापणे, शाई फेकणे, विटंबणा करणे यामुळे निर्जीवलोकांतही दहशत निर्माण झाली होती. मागील वर्षी 'भीमा कोरेगांव' प्रकरणाचे पडसाद असो किंवा उत्तरप्रदेश, बिहारसह उत्तर भारतात आरक्षण व अॅट्रोसीटी प्रकरणामुळे झालेला हिंसाचार असो. या घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चंदन नावाच्या तरुणाची 'वंदे मातरम'च्या घोषणा देत असताना गोळ्या घालून दिवसा ढवळ्या हत्या होते. औरंगाबादेत गेल्या वर्षी नियोजनबद्ध झालेल्या दंगलीत एका हिंदू गृहस्थास जीवंत जाळले जाते. त्यामुळे नयनतारांच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य असावे.

नयनतारांचा तिसरा वादातीत मुद्दा तर खरोखरच वस्तुस्थिती व सत्य परिस्थितीवर आधारीत आहे. तो म्हणजे, "इतिहासावर पुनर्लेखन होत आहे!"
भीमा कोरेगांव प्रकरणी झालेल्या दंगलीविषयी सत्याचा मागोवा घेणा-या सत्यशोधन समितीने दिलेल्या अहवालात एक मुद्दा असाच होता की, इतिहासाचे विद्रुपीकरण करणारी पुस्तक व सामाजिक तेढ निर्माण करणारे विद्रोही पुस्तके या दंगलीसाठी कारणीभूत होती. यावरुन नयनतारांचा रोख लक्षात घेतला पाहिजे. साहित्य व इतिहासाशी जी छेडछाड होत आहे, यावर अंकुश लागला पाहिजे. काही स्वयंघोषीत इतिहासकारांची टोळी देशात कार्यरत आहे. जे रोज नवनवीन जावईशोध लावतात व पुरावा मागितल्यावर आपल्या फेसबुक ट्विटरवर माफी मागुन मोकळे होतात. एखाद्या विशिष्ट जातीतील स्त्रियांचा अपमान करणारे गलिच्छ भाषा वापरलेले पुस्तक एखाद्या संघटनेचा प्रमुख लिहितो. ज्याला या कृत्यामुळे न्यायालयात माफी मागावी लागते. काही पोपटपंची करणारे विद्रोही व्याख्याते स्वत:च तयार केलेला रंजक इतिहास लोकांमध्ये जाऊन मांडतात. काही महाशयांनी तर यु ट्युबवर चॅनेल्स उघडले आहेत, ज्यातुन आपल्या नवनिर्मित काल्पनिक इतिहासाचे पारायण ते नित्यनेमाने करत असतात. त्यामुळे या देशाचा उज्ज्वल इतिहास पुसून नवनिर्मित समाजभेदी इतिहास लिहिला जात आहे, हे वास्तव आहे. याचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. म्हणुनच इतिहासाचे होणारे पुनर्लेखन व त्यातुन निर्माण केल्या जाणा-या दंतकथांमुळे वैज्ञानिक मानसिकतेचे रुपांतर काल्पनिक दुनियेत वाहून जात असल्याचा नयनतारांचा आरोप पटतो. मग, नयनतारांचे हे विचार तथ्यपुर्ण आहे असे म्हंटल्यास वावगे ठरेल कसे?

खरं तर भाषणसीमेमुळे त्यांनी एवढेच मुद्दे मांडले असावे. नाही तर स्वयंघोषीत इतिहासकार, महाविद्यालयात शिकवणारे विद्रोही मानसिकतेचे प्राध्यापक, शहरांमध्ये वावरणारे पांढरपेशे शहरी नक्षलवादी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार करित आपल्या लेखनातून विद्रोहाच्या गोंडस नावाखाली देशद्रोही कथानक रंगविणारे साहित्यिक, देश तोडण्याची व आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ घोषणा देणा-या विद्यार्थी दशेतील कळपांचा स्वैराचार, पत्रकारीतेचा घसरलेला दर्जा व मिडिया व चॅनेल्सचा दुटप्पीपणा, भेदभाव, एकांगीपणा आणि वंदे मातरम म्हणण्यास विरोध करणारे व हिंदूंना संपविण्याची भाषा करणारे तथाकथीत अल्पसंख्यंकाचे तारणहार या सगळ्यांविरोधात त्यांनी जरुर आपले मत मांडले असते. ते आपण समजदार लोकांनी समजुन घ्यायला हवे. इतकेच.

-कल्पेश जोशी
lekhagni.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान