मंदिरनिर्माण व हिंदू अस्मितेचा इतिहास
"मंदिरनिर्माण व हिंदू अस्मितेचा इतिहास"
अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी सध्या जे काही रणकंदन सुरु झाले आहे, ते केवळ 'राजकारण' या केवळ एका मुद्द्याचा विचार करुन चालणार नाही. राम मंदिर उभारणीचा आग्रह हिंदूंकडून होतोय, त्यामागे खरे तर अस्मितेचा प्रश्न दडलेला आहे. राम मंदिर उभारणी हा भारतातील बहुसंख्यक असणा-या हिंदूंच्या अस्मितेचा व त्यांच्या श्रद्धास्थानाचा प्रश्न आहे. भारत लोकशाहीप्रधान झाल्यापासुन हिंदूंच्या अस्मितेविषयी विसाव्या शतकात उद्भवलेला हा पहिलाच प्रसंग. म्हणुन याकडे काहीजण 'राजकिय मुद्दा' म्हणुन बघताना दिसतात. परंतु, इतिहासात डोकावले तर लक्षात येईल की हा प्रश्न राजकिय नसून हिंदूंच्या अस्मितेचा, अस्तित्वाचा व स्वाभीमानाशी निगडीत असलेला प्रश्न आहे. या संदर्भातील ऐतिहासिक घडामोडींच्या दाखल्यासह केलेला हा उहापोह.
इ.स. ७११ साली मोहम्मद बीन कासीमची स्वारी भारतावर झाली व तेव्हापासुन इस्लामचा संपर्क भारताशी आला. या अगोदर भारतावर अनेक परकिय आक्रमकांनी आक्रमणं केली होती, परंतु त्यांची या आक्रमणांमागे केवळ राजकिय मनिषा होती. त्यांनी भारतीयांच्या धार्मिकतेला व संस्कृतीला धक्का लावण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु मोहम्मद कासीमच्या आक्रमणापासुन भारताला केवळ राजकियच नव्हे, तर धार्मिक आक्रमणाचा हिडीस चेहरा पहायला मिळाला. जगावर इस्लामचे राज्य आणण्याच्या आकांक्षेपोटी वेडावलेल्या इस्लामीक राज्यकर्त्यांनी राजकिय सत्तेसोबत धर्मसत्ता उभारण्यासाठी साम दाम दंड भेदाने झाडून गैर मुसलमानांना इस्लामची दीक्षा देण्याचे कार्य हाती घेतले. इस्लामच्या या धार्मिक आक्रमणाचा फटका सर्वात आधी युरोपात बसला. तदनंतर भारताच्या सिंध प्रांताला इस्लामीकरणाचा प्रत्यय आला.
समोरच्या राज्यावर राजकिय वर्चस्व प्रस्थापीत करुन नंतर तेथिल प्रजेस येन केन प्रकारे इस्लाम स्विकारण्यास भाग पाडायचे, स्रीयांना व बालकांना कैद तरुन एक तर व्यापार करायचा किंवा जनानखान्यांमध्ये बटकी बनवुन ठेवायचे. युद्धात नावाजलेल्या सरदार सुभेदारांना सुंदर स्त्रिया बक्षिस म्हणुन द्यायच्या व त्यांच्यापासुन होणा-या संततीला जन्मजात इस्लामीक करुन गुलाम बनवायचे किंवा सैन्यात भरती करायचे, असा जणू आठशे वर्षापर्यंतच्या इस्लामीक राजवटीतील अग्र नियमच होता. दिल्लीतील सत्ता बदलल्या, तुर्क, पठाण, अफगाण, मोगल कैक जातीचे मुसलमान आक्रमक बदलले, परंतु त्यांचा इस्लामीकरणाचा रिवाज मात्र बरकरार होता. ज्यात औरंगजेबसारख्या धर्मपिपासू राज्यकर्त्याने जिझीया सारखे अन्यायकारक कर लावुन व जिहाद पुकारुन गैरमुसलमानांना सळो की पळो करुन सोडले.
सबक्तगीननंतर त्याचा पुत्र मोहम्मद गझनी हा गझनीच्या गादीवर बसला. ज्याला 'बुतशिकन' म्हणजेच मुर्तीभंजक ही पदवी लाभली होती.
गादीवर बसताच मुस्लीम खलिफ्यासमक्ष त्याने प्रतिज्ञा केली की सा-या हिंदूस्थानातील काफरांचा (अल्लाहला न मानणा-यांचा) नायनाट करीन, तरच मी खरा सुलतान!
यावरुन मुस्लीम राज्यकर्त्यांची धर्मपीपासू मानसिकता लक्षात घेतली पाहिजे. अशा प्रतिज्ञा गादीवर येताना प्रत्येक सुलतानाने व बादशहाने केलेल्या दिसुन येतिल. भारताला इस्लाममय करताना हिंदूंच्या तीर्थस्थळांची, देवळांची, मंदिरांची, मठांची व हिंदू धर्म प्रसार करणा-या साधू संन्याशांची इतकी वाईट अवस्था केली की स्वर्गाप्रमाणे शांत व सुंदर असलेला हा प्रदेश केवळ आरोळ्या किंकाळ्यांनी व यवनांच्या उच्छेदाने जणू नरक भासू लागला.
यवनांनी हिंदू मंदिरांची केलेल्या विध्वंसाची काही दाखले:
या सर्व धार्मीक आक्रमणांच्या धांदलीत हिंदूंची मंदिरं प्रचंड मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाली. सोमनाथ व काशी विश्वेश्वरसारखी हिंदूंची अनेक मोठमोठी आराध्य तिर्थस्थळेही यातुन बचावली नाहीत, मग लहानमोठ्या धार्मीक स्थळांची या बुतशिकन म्हनवना-यांनी काय अवस्था केली असेल?
सोमनाथाच्या मंदिरातील ब्रम्हवृंदांनी मंदिर भग्न करु नका म्हणुन दया याचना केल्या. प्रसंगी हाती तरवारी घेतल्या. पण मोहम्मद घोरीने सा-यांची कत्तल करवुन स्वत:ला 'बुतशिकन' ही पदवी मिळावी म्हणुन सोमनाथाच्या मंदिरातील मुर्तीच्या स्वत:च्या हस्ते तुकडे करुन त्याचे अवशेष मक्का मदीनास पाठवले. काही काळानंतर सोमनाथाचे मंदिर हिंदूंनी पुन: उभारले. पण खिलजीच्या आक्रमणात मंदिराचे व देवाच्या मुर्तीचे पुन्हा तुकडे तुकडे करुन दिल्लीच्या एका मशिदीच्या पाय-यात त्यास चिनून टाकल्या गेले. सोमनाथाच्या मंदिरावर पुढील काही शतके अशी आक्रमणं होत राहिली.
औरंगजेबानेही सप्टेबर १६६९ मध्ये अखिल हिंदूस्थानातील हिंदूंच्या पवित्र तीर्थस्थळांपैकी असलेल्या श्री काशीविश्वेश्वराच्या देवळास जमिनदोस्त करुन त्या जागी भव्य मशिद उभारली. बुंदेला नरसिंहदेव ह्याने मथुरा येथे तेहेतीस लक्ष रुपये खर्च करून श्रीकृष्णाचे भव्य मंदिर उभारले होते, ते सन १६७० मध्ये पाडून तेथिल मुर्ती आग-यास आणुन त्या मशिदीच्या पाय-यांखाली पुरुन टाकल्या गेल्या.
शहाजहान काव्य, संगित, वास्तुकला, चित्रकलेला मोठा रसिक असल्याचे आपणांस सांगितले जाते, परंतु त्यानेही त्याच्या राज्यात हिंदूंची मंदिरे पाडण्याचा विशेषत: बनारसमधील मंदिरे पाडण्याचा हुकूम जानेवारी १६३३ मध्ये काढलेला आढळतो. नवीन मंदिरे बांधण्यास व जुन्या मंदिरांची डागडुजी करण्यास प्रतिबंध करणारे फर्मान त्याने काढले.
अदिलशहाने व औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर स्वराज्यात घातलेल्या हैदोसात स्वराज्यातील गड किल्ल्यातील देवालये सर्वस्वी निर्जन बनविली. सोळाव्या शतकात अयोध्येतील शरयु काठच्या भव्य राम मंदिराचेही असेन पतन बाबर या मोगल आक्रमकाद्वारे केले गेले आणि भगवान श्रीरामाचे जन्मस्थान असलेले पुण्यपवित्र हिंदूंचे श्रद्धास्थान हिंदूंपासून दुरावले गेले.
"दिल्लीमध्ये कुतुबमिनारच्या जवळ कुब्वतुल-इस्लाम नावाची जी एक इस्लामी सत्तेच्या आरंभीच्या काळातील एक मशीद आहे, तिच्या बांधणीत हिंदू मंदिरातील खांब वगैरे सामुग्रीचा पुष्कळच उपयोग केलेला आहे. शिवाय त्या मशिदीमधील शिलालेखातही ती मशिद बांधण्यासाठी ज्यांचे मुल्य सत्तावीस लाख देहलीवाल होईल अश्या उध्वस्त केलेल्या देवळांची सामग्री वापरली आहे, असे नमूद आहे. काशीमध्ये कृतियासेश्वर या नावाचे जुने देवालय होते. ते मोडून त्या जागी लहानशी मशीद उभारली आहे. त्या मशिदीत पुर्वी एक शिलालेख होता. आता तो तिथे नाही. तथापी त्या शिलालेखात वरील देवालय मोडून तेथे मशीद बांधल्याचा लेख असल्याचे हिंदीचे पुर्वीचे प्रसिद्ध पुर्वसुरी श्री हरिश्चंद्र यांनी एका लेखात सांगितले आहे. काशीतील विश्वेश्वर व बिंदूमाधव या मंदिराचे मशीदीत रुपांतर केल्याचे सर्वज्ञात आहे. अजमेरची अढाई दिनका झोपडा किंवा मथुरेतील केशवदेव मशीद ही आणखी उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घोडे या गावातील मशिदीत एक फारसी शिलालेख आहे. त्यात खोदविणारा म्हणतो की, देवाच्या प्रसादासाठी मी तीस आणि तीन देवळे तोडली आणि मग या खराबाबादेत मशिदीचा पाया घातला. महाराष्ट्रातील मंदिरे तोडून त्याजागी मशीदी उभारली गेली असे पंढरपूर, कोल्हापूर, सोलापूर, परिंडे, मंगळवेढे, वाई, मिरज, अंबेजोगाई, परळी, चाफळ, बीड, प्रतापगड, लोणार, त्र्यंबकेश्वर, नाशिक, पुणे, बेदर, घोडे, जेजूरी यांसारखी दोनशे तरी स्थळे सापडतील." (मराठ्यांचा इतिहास पृ. ५४,५५)
यवन आक्रमकांनी केलेल्या विध्वंसात बौद्ध व जैन धर्मीय वास्तू, मंदिरे, स्तूपही बचावू शकले नाहीत. कारण, त्यांचा रोष केवळ हिंदूंवर नसून अल्लाहला न मानणा-या सर्व काफरांवर होता. मूर्तीपुजेच्या कडव्या विरोधी विचारांमुळे त्यांनी 'बुतशिकन' होण्यास आपले कर्तव्य मानले. यासंदर्भातील अगदी अलिकडील उदाहरण द्यायचे म्हणजे २००१ साली मुस्लीम तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील बमियानमध्ये जगातील सर्वांत मोठ्या बौद्ध मुर्तीला डायनामाईट लावुन उध्वस्त केले. हे तर सर्व जगाने पाहिलेच आहे.
५ नोव्हेंबर २०१७ रोजी लोकसत्ता दैनिकात रविंद्र माधव साठे यांचा 'इस्लामच्या आक्रमणामुळेच बौद्ध धर्माचा लोप' हा विशेष लेख प्रसिद्ध झाला होता. त्यातील तीन महत्वाचे मुद्दे येथे जसेच्या तसे-
मुद्दा क्र. १: "हिन्रिच झिमर हा मध्य आशियातील देशाच्या ऐतिहासिक घडामोडींविषयीचा एक अभ्यासक. त्याने आर्ट ऑफ इंडियन एशिया हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात भारतातील बुद्धिझमच्या नाशाविषयी त्याने अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. तो म्हणतो, ‘‘भारतातील कलाकृतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर अशोककालीन शतकाच्या प्रारंभापासून त्या कलाकृतीवर बुद्धिझमचा पगडा होता. त्यानंतर मात्र बुद्धिझम आणि हिंदू धर्माबद्दलच्या विषयांचे आळीपाळीने सादरीकरण होत असे. या दोन्ही परंपरा सुमारे दोन हजार वर्षे एकमेकांशी चढाओढ करीत समृद्ध पावल्या. त्याकरिता वेळप्रसंगी त्यांनी एकमेकांचे मठ, शाळाही वापरल्या. इ. स. १२०० मध्ये इस्लामचे आक्रमण झाल्यानंतर मात्र आपल्या जन्मभूमीतून बौद्ध धर्म गायब झाला. (पृष्ठ २७०.)"
मुद्दा क्र. २: "डॉ. बाबासाहेबांनी २५ मे १९५० रोजी कोलंबो येथे भारतातील बौद्ध धर्माचा विकास आणि विनाश यावर भाषण केले आहे. या भाषणातही त्यांनी बौद्ध धर्माच्या भारतातील ऱ्हासास अल्लाउद्दीनसारख्या मुस्लीम आक्रमकाच्या अत्याचारास अधोरेखित केले आहे."
मुद्दा क्र. ३: "मार्क्सवादी विचारवंत धर्मानंद कोसंबी यांनीही म्हटले आहे की, महम्मद बिन बख्तयार खिलजीच्या नेतृत्वाखाली इ. स. १२०० मध्ये नालंदा येथील विद्यापीठ व सारनाथच्या स्तंभाचे अतोनात नुकसान झाले (द कल्चर अॅण्ड सिव्हिलायझेशन ऑफ एन्शंट इंडिया, न्यू दिल्ली, १९८४, पृष्ठ १८.)"
या तीन मुद्द्यांवरुन व विशेषत: बाबासाहेबांनीच इस्लामीक आक्रमकांच्या मुर्तीविरोधी भूमिकेचे केलेल्या स्पष्टोक्तीवरुन यवनांची विध्वंसक वृत्ती लक्षात येऊ शकेल.
तथापी, आज हिंदूंचे काशी विश्वेश्वराचे देऊळ त्याच भव्य दिव्यतेत व डौलात उभे असल्याचे आपण पाहतो. गुजरातेतील भगवान सोमनाथाचे मंदिरही शिरावर भगवी पताका डोलाने फडकत उभे असल्याचे आपण पाहतो. मथुरेतील श्रीकृष्णाचे मंदिराचेही दर्शन घेण्याचे भाग्य हिंदूस मिळते. याचे कारण काय असावे? हिंदूंच्या संस्कृतीवर घाला घालताना उध्वस्त केलेली मंदिरं पुन्हा कश्याप्रकारे उभी राहिली याचे स्वा. सावरकर लिखीत 'सहा सोनेरी पाने' या ग्रंथातील एक उदाहरण दिलेच पाहिजे.
"दक्षिणेत स्वारीवर जाताना औरंगजेबाने राजपुतांना प्रचंड नुकसान पोहचविले. मंदिरे उध्वस्त करत व आया बहिणींवर हात टाकत त्याने नको तो धुमाकूळ घातला. याचा वचपा काढण्यासाठी जोधपुरचा प्रबल महाराणा जसवंतसिंग व दुर्गादास राठोड यांनी कंबर कसली व हा हा म्हणता औरंग्याने हस्तगत केलेला प्रदेश तरवारीच्या जोरावर मुक्त करण्यास सुरुवात केली व सवाई कपटाने औरंग्यावर चालून पडले. औरंगजेबाने मंदिरे पाडून उभारलेल्या मशिदीच काय त्या नव्हेत, तर सा-या मशिदी झाडून जमिनदोस्त करण्यास सुरुवात केली. त्या सर्व जागी मंदिरे उभारली. बाटवलेल्या हिंदूंनाच काय तर जो जो यवन दिसेल त्यास सामुहिकरित्या शुद्धीकरण करुन हिंदू करोन सोडले. औरंगजेबाच्या सैन्यातील मुसलमान मंदिरा मंदिरातून गोमांस फेकित पुढे जाताच राठोडांची सैन्येही मशिदीमशिदीतून डुकरे कापून फेकित जश्यास तसा वचपा काढित गेली. महाराणा जसवंतसिंगाच्या व दुर्गादास राठोडचा हा रुद्रावतार पाहुन नुसता औरंगजेबच नाही संबंध हिंदूस्तानातील यवन गर्भगळीत झाला."
"हिंदू राज्यकर्त्यांच्या अश्या अलौकीक शौर्यामुळे आज हिंदूंची तीर्थस्थळे शाबुत आहेत."
हिंदूंची तीर्थस्थळे यवनांपासुन मुक्त व्हावीत व ज्या तीर्थस्थळांची विटंबना झाली त्याचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी हिंदू राज्यकर्त्यांद्वारा केलेल्या प्रयत्नाची अभिमानास्पद दाखले:
शिवाजी महाराज दक्षिण मोहीमेवर असताना भागानगरात (हैदराबाद) कुतुबशहाशी त्यांची भेट झाली. प्रसंगी पातशहाने विडा उचलण्याचा आग्रह शिवाजी महाराजांस केला. परंतु महाराजांनी विडा घेतला नाही. "श्री वाराणशीस जाऊन श्रींची स्थापना करु तेव्हाच विडा घेऊ" असे उत्तर महाराजांनी पातशहास दिले. शिवछत्रपतींच्या ९१ कलमी बखरेत हा उल्लेख आढळतो.
निनाद बेडेकर यांचा 'क्रांतीचा अग्नी पेटविणा-या बलिदानाची आठवण' या शिर्षकाखाली एक लेख १९ मार्च १९९६ च्या 'सामना'त प्रसिद्ध झाला होता. त्यातील महत्वाचा मजकूर : 'सय्यिद कुतुबुद्दीन सज्जादानशिन याने पुढील अर्ज केला आहे :
'नरकवासी संभाजी याने धर्मद्वेषामुळे तळकोकणचे मदरसे आणि मशिदी उध्वस्त केल्या. मी (कुतुबुद्दीन) दोन जुम्मा मशिदी आणि एक मदरसा दुरुस्त केला आहे. पण इतर मदरसे व मशिदी अद्याप नामशेष आहेत. इकडील पाऊस तर सर्वांना माहित आहे. एखाद्या प्रामाणिक अधिका-याला हुकुम व्हावा की काळजीपुर्वक रक्कम खर्चून पवित्र इमारती दुरुस्त कराव्यात.'
संभाजी राजांचे धर्मप्रेम यावरुन लक्षात येते. शिवाय हडकोकणच्या शिलालेखात शंभूराजांनी 'हे हिंदू राज्य झाले आहे' असे स्पष्ट कोरले आहे. कुडाळच्या मंत्रशास्त्र्यांना दिलेल्या दानपत्रात शहाजीराजांना 'हैंदवधर्मजीर्णोद्धारकरणधृतमति' तर शिवाजी राजांना 'म्लेंच्छक्षयदीक्षित' अशी विशेषणे त्यांनी वापरली आहेत. 'धर्म कार्यात खलल न करणे', 'धर्मकृत्याचा नाश करु नये' अशी वाक्ये त्यांच्या पत्रात कायम येतात. कल्याण व भिवंडी येथिल मशिदी खुद्द शिवाजी राजांच्या आज्ञेवरुन पाडुन त्या जागी पुर्वीची मंदिरे उभारल्याचा पुरावा कविंद्र परमानंद लिखित शिवभारतात आहे. यावरुन हिंदूंच्या अस्मितेचे महत्व आपल्या लक्षात येऊ शकेल.
'काशीसारखी हिंदूंची पवित्र तीर्थस्थळे ताब्यात घेऊन धर्म संस्थापना दृढ करावी हा उद्देश प्रथम बाळाजी विश्वनाथाने दिल्लीच्या स्वारीत योजिला, त्याची थोडीबहुत सांगता मराठेशाहीच्या अखेरपर्यंत होत होती.' असे रियासतकार सरदेसाई लिहितात.
पेशवा बाजीरावसोबत दिल्लीच्या बादशहाचा उमराव म्हणुन जयसिंगाने तह केला होता. त्या तहात बाजीरावास दरवर्षी पाचलाख खंडणी देण्याचे जयसिंगाने कबूल केले होते. त्याच तहातील अन्य पाच मागण्यांसोबत पेशवा बाजीराव याने सहावी मागणी 'मथुरा, प्रयाग, काशी व गया ही तीर्थस्थळे पंतप्रधानांच्या (स्वत:च्या) कबज्यात द्यावी' अशी मागणी केली होती. २५ आॅक्टोबर १७५४ या दिवशी बादशहाने राजाज्ञा काढत हिंदूंची पवित्र स्थळे गया व कुरुक्षेत्र पेशव्यांना सोपवली. तेथिल मुसलमान अधिकारी काढून घेण्यात आले. तसेच, जुलै १७५७ मध्ये काशी व अयोध्या या पुण्यनगरीवरचे अधिकार पेशव्यांना सोपविले. असे सर्टिफिकेट खुद्द सुजाउद्दौलाने दिले. (संदर्भ- एस.आर.बक्षी व एस.के.शर्मा लिखित मराठाज इन पानिपत, १७६१) यावरुन शिवरायांसह पुढील शतकातील मराठेशाहीच्या वारसदारांनीसुद्धा सतत हिंदूंच्या धार्मिक स्थळांची, मंदिरांची अस्मिता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केलेले दिसुन येतात.
तसेच, बडोद्याच्या गायकवाडांनीही ज्या ज्या मंदिरांचे मशिदीत रुपांतर झाले होते, त्यांचे पुन्हा मंदिरात रुपांतर केल्याचे दाखले मिळतात. सरस्वतीच्या तीरावर यवनांनी आपली मोठी मशीद उभारली होती. परंतु, गायकवाड सरकारने त्यास शिवालयाच्या स्वरुपात आणले व त्यास्थळी भूतेश्वर महादेवाची स्थापना केली. यवनांच्या कारकिर्दीत पाडापाडी होऊन हिंदूंच्या धार्मिक स्थळांची जी विटंबना झाली होती व जी तीर्थकुंडे लुप्त झाली होती ती शोधून गायकवाडांनी त्याचे पुन: विधीवत संस्कार करवुन जिर्णोद्धार करविला.
तिरुवन्नमलई येथिल समोत्तिपेरुमल मंदिराचे यवनांनी मशीदीत रुपांतर केले होते. रधुनाथाने त्याचे पुन्हा मंदिरात रुपांतर केले. दक्षिण अर्काट जिल्ह्यात श्रीमुष्मम येथे भूराहस्वामीचे मंदिर होते. या मंदिराचे व वृद्धाचलम आणि जगप्रसिद्ध नटराज मंदिराचे दरवाजे यवनांनी बंद करुन टाकले होते. रघुनाथ पंडिताने ही दरवाजे उघडून पुन्हा पुजा उत्सव सुरु केले.
यवनांच्या इतक्या विध्वंसानंतरही आज हिंदूंची पवित्र तीर्थस्थळे व भगवी पताका डौलाने फडकताना दिसते ती अश्या हिंदू धर्माभिमानी राज्यकर्त्यांमुळे. हिंदूंचे जेव्हा जेव्हा राज्य आले, तेव्हा तेव्हा धर्माभिमानी हिंदू राज्यकर्त्यांनी आपली तीर्थस्थळे यवनी वीटंबनेतुन मुक्त करण्यासाठी शक्य ते ते प्रयत्न केले. त्यामुळेच कधी काळी यवनांच्या क्रुर आक्रमणात खिळखीळी झालेली काशी, प्रयाग, मथुरा, सोमनाथसारखी हिंदूंची तीर्थस्थळे आज हिंदूंना माथा टेकवण्यासाठी अस्तित्वात आहेत. मनात आणते, तर ते धर्माभिमानी हिंदू राज्यकर्ते बाटवलेली मंदिरांचे त्याच जागी पुनर्निर्माण सोडून अन्य दुस-या जागी मोठमोठी भव्य मंदिरे उभारु शकले असते. परंतु, ज्या स्थळांशी हिंदूंच्या परम आदरणीय श्रीराम व श्रीकृष्णांचा व देवादिकांचा इतिहास जुळलेला आहे त्याच्याशी तडजोड करणे म्हणजे आपला षंढपणा सिद्ध करणे झाले असते. म्हणुनच आपली अस्मिता, इतिहास, पौरुषत्व, अस्तित्व व स्वाभीमान सिद्ध करण्यासाठी हिंदूंच्या अनेक पीढ्यांनी मोहिमा आखल्या, कुटनीति केल्या, राजकारण केले, प्रसंगी रक्त सांडले पण तडजोड केली नाही.
अयोध्येच्या श्रीराम मंदिर उभारणीमागे आजच्या तमाम हिंदूंचा हाच स्वाभीमान जागृत झालेला दिसुन येतो. इतिहासाशी अनभिज्ञ असल्या कारणाने अनेक जण राममंदिर म्हणजे राजकिय मुद्दा किंवा निवडणुका तोंडावर आल्यानंतर हिंदूंची मते मिळवण्यासाठी तयार केलेला मुद्दा म्हणुन दुर्लक्ष करतात. काही धर्मभीमान नाहिसे झालेले जन्मजात हिंदू 'राममंदिरापेक्षा गरीबांच्या पोटाचा विचार करा' असे बेशरमी विधाने करतात, त्यांना बहुधा अस्मिता व गरीबीतला फरक कळलेला नसतो. किंबहुणा आपल्यातली उदारमतवादी व गरीबांचा कैवारी असल्याची प्रतिमा उजागर करण्यासाठी अशी सदगुणविकृती त्यांच्यामध्ये निर्माण होत असावी. परंतु, भारतीय संस्कृती नामशेष करण्यामागचा प्रयत्न म्हणून ज्या गोष्टी यवनांनी केल्या असतिल त्या लक्षात आल्यावर तरी हिंदूंनी दुरुस्त करायला हव्यात. हेच महत्कार्य पुर्वीपासुन यवनी सत्ता जाऊन हिंदूधर्माभिमानी राज्यकर्त्यांची सत्ता आल्यावर घडत आले आहे. राम मंदिराच्या निमित्ताने तेच महत्कार्य आजच्या धर्माभिमानी हिंदूंनी आपल्या शिरावर घेतले आहे. राजेशाही असती तर हिंदूंचे चतुरंग दलबल कधीच श्रीराममंदिरनिर्माण करुन मोकळे झाले असते. परंतु, लोकशाही मुल्ये ध्यानात घेता योग्य तो मार्ग अवलंबत हिंदूंचे राम मॆदिर निर्माणासाठी मार्गक्रमण चालू आहे. त्यात सत्ताधारी धर्माभिमानींनी आपल्या हातून हे महत्कार्य घडवून इतिहास रचावा व श्री शिवाजी, श्री संभाजी, पेशवा बाजीराव, गायकवाड यांसारख्या महान हिंदू राजांच्या पंक्तीत येवून विराजमान व्हावयाची पर्वणी दवडू नये.
अयोध्या ही भूमी श्रीरामाशी निगडीत व हिंदूंची पुण्य पवित्र असलेली भूमी आहे व जिथे श्रीरामाचे मंदिर पाडून यवन सम्राट बाबरने मशीद उभारली असेल तर आजच्या धर्माभिमानी राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या साथीने पुन: मंदिरनिर्माण करणे त्यांचे आद्य कर्तव्य समजले पाहिजे. कारण, मंदिर हा राजकारणाचा नव्हे, तर हिंदूंच्या अस्मितेचा मुद्दा आहे. त्यास न्याय मिळायलाच हवा.
(सदर लेखातील दाखल्यांसाठी ज.द. जोगळेकर यांच्या 'हिंदूराष्ट्रवादाचे स्त्रोत' या ग्रंथाचा व स्वा. सावरकरांच्या 'सहा सोनेरी पाने' या ग्रंथाचा संदर्भ घेतला आहे)
©कल्पेश जोशी
lekhagni.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा