अवनीच पावली!

अवनीच पावली!
#तिरपी_टांग

अखेर काहीतरी सापडले. आरडाओरड करायला. बोंबाबोंब करायला. अवनी पावली. स्वत: गेली पण कोणाचं तरी भांडवल झाली. तसा एक प्रकारे आनंद आहेच. राज्यातील उच्चशिक्षीत, कुटनीतिज्ञ, परमप्रतापी व राज्यकारणी धुरंधर नेतेसाहेब अवनीसाठी हळ हळ व्यक्त करताय. एका मुक्या जनावरासाठी तमाम विरोधी पक्षांसह सत्ताधारी प्राणीमित्र-मैत्रिणींपर्यंत अवनीच्या करुणामय मृत्युच्या दु:खछटा पसरल्या...व भावनाशुन्यतेत निद्रिस्त समाज जागा झाला याचे समाधान वाटले. वाटलेच पाहिजे. येडे का काय?

मग बोला आता कोणीतरी हिंमत बहाद्दराने, जंगलांवर मानवाने केलेल्या कब्ज्याबद्दल. जंगलातील केलेल्या नैसर्गिक नुकसानाबद्दल. वृक्षांच्या कत्तलीबद्दल व आपले शौक पुरे करताना काळवीटांना, अस्वलांना, हरिणांना व वाघ सिंहांना ठार केल्याबद्दल. जंगलातील मुक प्राण्यांना शिकारीच्या गोंडस नावाखाली यमसदनी पाठवणा-या शेरे बहाद्दर लोकांबद्दल बोला. कुणीतरी बोला. एका मुक्या जनावरासाठी विरोधी पक्ष तद्दन खडा ठाकला त्याबद्दल आनंदच. पण गायींना कापण्याबाबत ह्याच विरोधकांना कवडीची चिंता नसते. उलट गाय खाण्यायोग्य पशू आहे म्हणुन अकलेचे तारे काही जण तोडतात. पण काहीही असो... आज सुबुद्धी आली असॆ समजू. सत्तेची खुर्ची अनेकांना सदबुद्धी आणते व अनेकांची मती सत्तेसाठी गूंगही होते असे मानू हवं तर. कदाचित हाही त्यातलाच प्रकार असेल. पण अवनीसाठी का होईना...एकदा अश्रू ढाळलेच. या निमित्ताने देशात व राज्यात विरोधी पक्ष नावाचे काही तरी प्रकरण आहे हे माहित झाले व ते सर्वच मुक्या प्राण्यांना आता अभय देणार आहेत.

विरोधी पक्ष म्हणजे सत्ताधा-यांच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करणाराच असतो, (मग ती गोष्ट देशहिताची का असेना) म्हणुन त्यास 'विरोधी पक्ष' म्हणतात, अशी समजुत सर्वदूर प्रचलित आहे. त्यात सध्याचे विरोधक खरे उतरले. इतके की त्यांनी देशविरोधी घोषणा देणा-यांना व माओवाद्यांनाही समर्थन देऊन टाकले. परिणाम असा झाला की सत्ताधारी देशभक्त ठरले. मग पाप विरोधकांच्या कथनी व करनीचे. मग रड बोंबल कश्याला करावी की अमुक स्वत:ला देशभक्त म्हणवतात व तमुकांनी लोकांना देशद्रोही ठरवण्याचे प्रमाणपत्र घेतले म्हणुन. हे प्रमाणपत्र आपल्याच पापातुन निर्माण झाले याचा विसर विरोधकांना पडतो.

असो. विरोधकांच्या एकंदरीत अवनीसाठीच्या सहानुभूती व दुखवटा पाळल्याने त्यांच्याबद्दलचा आशेचा किरण उजाडल्यासारखे वाटत आहे. विरोधक इतके दयाळू मायाळू झालेत की, ते गोवंशहत्येबद्दल नक्कीच आंदोलनं काढतिल. काळवीटं कशी काय मारली जातात व लोक निर्दोष कशी मुक्त होतात म्हणुन विरोधक कदाचित कोर्टात याचिका पेश करतिल. संक्रांतीला पतंगाच्या मांज्याने पक्षी मरतात तसे बकरीद ला बोकडं नको कापायला म्हणुन याचिका टाकण्याची हिंमत करतिल. हो..हो...करतिलच. कारण विरोधक प्रचंड मायाळू व दयाळू आहेत. त्यांना मुक्या जनावरांचा आक्रोश अजिबात सहन होत नाही. मग कुठला धर्म आडवा येत असेल तरी ते भीत नाहीत. कारण लर्वधर्म समभावाचे बाळकडू त्यांना त्यांच्या आज्याने बालपणीच पाजले आहे. जंगलात होणा-या ससे, हरिण, काळवीट, रानडुकरे अश्या कैक प्राण्यांच्या शिकारीबद्दल विरोध दर्शविण्यासाठी नक्कीच कँडल मार्च काढतिल. त्यात त्यांना वाघही समर्थन करतिलच...यात शंका नाही. कारण जंगलाची राणीच मेली आहे, मग राजाला संताप तर होणारच. म्हणुनच वाघानेही या मानवी क्रुरतेसोबत 'सामना' करायचे ठरवले आहे. या निमित्ताने वाघ व राजकिय विरोधक हाती हात घेऊन डरकाळ्या फोडताना दिसतिल. त्यातही काही लबाड केवळ ओठ हलवित डरकाळी फोडल्याचे भासवतिल व वाघाचा पुरेपूर फायदा घेण्याचा पेरयत्न करतिल. वाघ तसा भोळा भाबडा प्राणी. परंतु, हा प्रसंग जनता मोठ्या करमणुकीने पाहिल.

...तथापी ह्या सर्व प्रकारात देशात घुसलेले घुसखोर, रोहिंग्या, बांग्लादेशी व त्यांच्या जोडीला अकांततांडव माजवणारे नक्षलवादी मात्र आरामात टर्रफूस झोप काढतिल. कारण यांचा धोका ओळखुन देशहिताचं राजकारण करण्याइतपत विरोधक शहाणे झालेले नाही.

©कल्पेश जोशी
lekhagni.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान