उंच उंच पुतळ्यांमागचं रहस्य??
उंच उंच पुतळ्यांमागचं रहस्य??
#तिरपी_टांग
त्या दिवशी महाशय जरा नाराजीत दिसत होते. नीट बोलत नव्हते की हसत नव्हते. तसे मघाशीच फार आनंदात होते महाशय. कोर्टाने दिवाळीतील फटाक्यांना जी काही पुरोगामीत्वाची वात (की वाट?) लावली होती, त्यामुळे लय आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. दिसेल त्याच्याजवळ कोर्टाच्या निर्णयाचे कौतुकपुराण चालू होतं. पण त्या दिवशी पेपरला 'स्टॅच्यू आॅफ युनिटी'ची बातमी काय वाचली, भाऊ एकदम चिंताग्रस्त झाले.
"च्या...मारी...एवढा उंच पुतळा बनवायची काय गरज होती बे?" असे वाक्य रागासंतापात त्यांच्या तोंडून बाहेर पडले. अन् हात पाय आपटत शेवटचा मोठा झुरका सोडत हातातली सिगारेट फेकुन तावातावाने भाऊ घराच्या दिशेने निघाले.
महाशयांचा राग अपेक्षितच होता म्हणा. कारण मला माहितीये भाऊ पक्के फुर्रोगामी...साॅरी साॅरी पुरोगामी आहेत. त्यांना विचारायचा अवकाश लगेच सुरु पडतिल, "पुतळ्याला किती खर्च लागला. किती जागा वाया गेली. श्रम वाया गेले. एवढ्या पैश्यात गोरगरीबाची भूक मिटली असती. देशावर कर्ज किती आहे. अन् मोदीला रिकाम्या गोष्टी सुचतात वगैरै वगैरे...पुरोगामी पुराण सुरु झालं असतं." अर्थात ते काही त्याचे मनापासुनचे विचार नाहीत बरं का? खंडण्या गोळा करुन व गरीबांना धाक धमक्या देऊन पैसे उकळणारे आमचे श्रीमान. त्यांचा अन् गरीबांचे कैवारी होण्याचा दूर दूर पर्यंत संबंध नाही.
पण आमचे भाऊ तसे मनाने चांगले हायेत बर का.
लोकांना धमकावतात, खंडण्या घेतात, हप्तेबी घेतात. ओले सुके सगळे शौक करतात. 'भीगे होट तेरे...' हे फार आवडीचं गाणं भाऊंचं. सतत हेच गाणं तोंडात असतं त्यांच्या. बाई माणुस दिसलं अन् तोंडातून गाणं बाहेर आलं नाही तर नवलच. पण भाऊंनी कधी कोणाचा जीव घेतला नाही बरं. दयाळू आहेत. माणसांचा राग पुतळ्यांवर काढतात. पुतळ्यांवर शाई फेकायला अन् पुतळावध करायला सुपा-या घेतात भाऊ. पण माणसावर हात बीत नाही उचलत. दयाळू आहेत ना. पुतळ्यांवर शाई फेकणं म्हणजे भाऊंच्या तर बाये हात का खेल. हल्ली तर पुतळ्यांची कापाकापीही करतात. माणसावर दया करुन निर्जीव पुतळ्यांना कापल्याबद्दल 'खरे मानवतावादी' म्हणुन त्यांचे राज्यभर सत्कार सोहळे झाले आहेत. त्यांचे प्रेरणादायी व्याख्यानेही ठेवणार होते, पण 'भीगे होट'शिवाय भाऊंना बोलता नाही येत. म्हणुन ते टळलं. पण सध्या सराव चालू आहे म्हणे...व्याख्यानाचा.
मग आता सांगा, असे उंच उंच पुतळे बांधू लागले सगळे तर भाऊंचं काम संपलच ना? एवढाले पुतळे कशे कापायचे अन कशी शाई फेकायची. तिकडे सरदारांचा, इकडे महाराजांचा...उद्या बाबासाहेबांचाही बांधणार आहे म्हणे. मग झाला का सत्यानाश? भाऊंच्या पोटावर पाय पडणार ना? सगळेच जर अशे मोठमोठे पुतळे बांधू लागले तर कसं व्हायचं हो? म्हणुन आमचे भाऊ रागवले आहेत.
परवा कोण तरी 'कोकणी दादा' भाऊंच्या घरी येऊन गेला म्हणे. अन त्यानं भाऊंना नाकातून आवाज काढत थेट कानात गुप्त कानमंत्र दिला.
आज दोन तीन दिवसानंतर आपले महाशय सर्वदूर आपल्याबद्दल फुशारक्या मारताना दिसताहेत. प्रसन्न आहेत. बेहद खुष आहेत.
आपल्या पांढ-या शर्टाची काॅलर मागे फेकत व छाती फुगवत सगळ्यांना सांगत फिरताय, "मोदीसाहब आपुन को डर गय, इसलिये इत्ते बडे बडे पुतळे खडे कर रहे हय...ख्या ख्या ख्या"
-कल्पेश गजानन जोशी
Lekhagni.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा