नरभक्षक वाघ की वाघभक्षक नर?

नरभक्षक वाघ की वाघभक्षक नर?

#तिरपी_टांग

दर आठ दहा दिवसांनी पेपरला वाघांविषयी बातमी ठरलेली आहे. अर्थात चारपायाच्या ओरीजनल वाघांची. कधी ते मानवी वस्तीत शिरतात, कधी शहरात प्रवेश करतात, कधी तर चक्क किचनमध्ये तर कधी कधी अक्षरश: बाथरुममध्येही दिसुन येतात. मिस्टर इंडिया फक्त अनिल कपुरच होऊ शकतो हा भ्रम आधी दूर करुन घ्या. जादूचं घड्याळ वाघाला नाही का सापडू शकत? असंच अाहे ते. नाही तर वाघ दिसले नसते का लोकांना इतक्या किचन बाथरुमपर्यंत जाईस्तोवर...
संत्याभाऊ तावातावात आज बोलत होता.

संत्याभाऊवर आज नेहमीप्रमाणे हसू आलच. शिवाय किव पण आली. पण संत्याभाऊ जंटलमन तरी आहे. काही तरी आपलं लाॅजिक लाऊन घेतो. पण २१ व्या शकतकातील ८५ टक्के सुशिक्षीत आमच्या भारतातील विद्वान लोकांना हे चांगलं माहित असावं, की वाघ आपल्या घरात पोहचताय की आपण त्यांच्या?

माणुस प्राणी अगदी उघडा नागडा फिरत होता तेव्हापासुन ह्या वन्यजीवांची डोकेदुखी बनलाय. काय दुश्मनी आहे काही कळत नाही. वाघ तेव्हाही नागडे फिरत व आजही. पण माणुस आज छान छान कपडे परिधान करतो. म्हणुनच वाघाला ही नीच वागणुक असावी. माणसाने कधीकाळी पोटासाठी शिकार केली, मग हौस म्हणुन, नंतर पौरुषत्व दाखवण्यासाठी व आता काय तर म्हणे वन्यजीव आमच्या गावात, शहरात येऊ लागले म्हणुन त्यांना ठार मारा! वन्यजावांची ही कुचंबना किती दिवस करायची? त्यांना बुद्धी नाही म्हणुन सतत उपभोगाचीच वस्तु किती दिवस समजणार? किती दिवस आपल्या सोयीने त्यांच्याकडे बघायचं?

वन्यजीव माणसाप्रमाणे बुद्धीवादी असते तर? त्यांनीही काढले असते आंदोलन. त्यांनीही केले असते उपोषण. त्यांच्या मतावर डोळा ठेऊन कुणी तरी सरसावले असते त्यांच्या हक्कासाठी. जंगलात राहणारे प्राणी म्हणुन त्यांनाही आदीवासींप्रमाणे हक्क मिळवुन देण्यासाठी प्रयत्न झाला असता. अन्न मिळावे म्हणुन त्यांनाही राशनाची सोय केली असती. कवडीमोल रुपयात हरीण, ससे, डुकरे घरबसल्या वाघांना खायला मिळाली असती. अर्थात ते कधी समृद्ध झाले असते काय, हा संशोधनाचा भाग. कारण ७० वर्षात भारतातील माणुसच भुकेने मरतोय. एकमेकाच्या तोंडचे घास पळविण्यात पटाईत असलेल्या भ्रष्टाचारी व लालची माणसाने डुकराला राशनात मिळणा-या अन्नातही भेसळ केली असती व डल्लाही मारला असता.

वन्यजीवांना आदीवासीचा दर्जा मिळाला म्हंटल्यावर तर मुलनिवाशीप्रेमींच्या आनंदाला पारावार उरला नसता. आदीवासी व गोरगरीबांच्या भाकरीवर डोळा ठेवणारे व त्यांच्या योजनात आपल्या उदरनिर्वाहाचं दुकान चालवणारे तथाकथीत चाओ माओ व लाल बावटयांनीही वन्यजीवांसाठी आपले लालभडक सलाम त्यांच्याकडून ठोकुन घेतले असते. गडचिरोली, नागपुर, चंद्रपुर भागातील वन्यजीव लोकवस्तीत दिसायला लागले की संशयच येतो, की काही क्रांती बिंती तर नाही करायची ठरवली ना बाबा ह्यांनी? पण पुढल्या क्षणी मन निर्धास्त होऊन जातं. कारण वन्यजीवांना सरकारी लाभ मिळत नाही की कुठल्या योजनेतुन पैसेही मिळत नाही. शिवाय मतदानाचा व हातात बंदूका घेण्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. म्हणुन मन निश्चिंत होतं.

पण या वाघांचं करायचं काय? हे हिंस्र व जणु सुडाने पेटलेले वाघ गावात येतात व बिचा-या गरीब, नादान, शांतताप्रीय, अहिंसावादी व भोळ्या बाबड्या माणसावर हल्ले करतात. ज्या देशात अहिंसा तत्व रुजलं, मानवता हाच धर्म शिकवला त्या महात्मा गांधींच्या देशात चक्क वाघाने काही कारण नसता माणसावर हल्ले करावे? हे घोर पाप आहे. वाघाला हे शोभतच नाही. अरे माणसांनी जंगलात घरे बांधली म्हणुन काय झालं? मानवाला घटनेत अधिकार आहे, कुठेही वास्तव्य करण्याचा. वाघांसाठी केली आहेत ना संरक्षित क्षेत्रे. तिथे जावं त्यांनी गपगुमान. आम्ही मानवाने डोंगर व जंगले पोखरुन विकास करण्यासाठी मोठ्या बिल्डींगा व कंपन्या टाकण्याचे ठरवले आहे, त्यामुळे वाघांनी इकडे फिरकलच नाही पाहिजे. जंगलाचा राजा आहे म्हणुन काहीही करावं काय?

...असेही संपण्याचा मागावरच आहेत ही वन्यजीव. त्यांच्या घरावर माणसाने कब्जा केला. त्रास तर होणारच. पण कायदा सर्वोच्च. मा. न्यायाधीशांनीच वाघ नरभक्षक झाला, म्हणुन जर गोळ्या चालवायच्या सांगितल्या तर वाघांनी आता हौतात्म्य पत्करलेलेच बरे. माणुस नरभक्षक होऊन सैनिकांवर दगडफेक करो, दंगलीत एकमेकांचे मुडदे पाडो, महिला व बालकांवर अमानवी अत्याचार करो किंवा दहशतवादी हल्ले करुन शेकडो लोकांना बळी घेवो त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री न्यायालय खुले होते, पण गोळ्या घालायचे आदेश कधीच निघत नाही. कारण त्यांना मानवाधिकाराचे संरक्षण असते. बिचा-या वाघांना कोण वाली नाही. म्हणुन त्यांना गोळ्या घालताना नीति, तत्वे, विवेक व कायदे कुणीही आडवे येत नाही. अश्या अधांतरी वाघांना कश्या जगवायचे?
एकदाचे संपले सगळे की डोक्याला किटकिट राहणार नाही. ना बातम्या येतिल ना कसले अभियान निघतील. सरकारचाही पैसा वाचेल. म्हणुन...या सगळ्या उपद्रवी व बीनकामाच्या जनावरांना आता संपवुनच टाकले पाहिजे. अन् पुढच्या पीढीचं काय घेऊन बसताहो नेहमी नेहमी. त्यांना वन्यजीवं पहायला मिळणार नाही म्हणुन? 'यह जमाना पुतळों का हय, गली गली मे चौक चौक मे पुतळे खडे करेंगे हम्म और बच्चो को बतायेंगे 'इसे 'वाघ' कहते थे और इसे 'ससा'..!

-कल्पेश गजानन जोशी
Lekhagni.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान