मीटू: नुसतेच आरोप की अजुन काही?
मीटू: नुसतेच आरोप की अजुन काही?
काही दिवसापुर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने भारतातील हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर दहा वर्षापुर्वी लैंगिक दुर्वतन केल्याचे आरोप केले. यामुळे मिडियात एकच खळबळ उडाली. गेल्या महिनाभरात सोशलमिडियावरील मीटू चळवळीत अश्याप्रकारच्या आरोपाच्या फैरींची संख्या शंभरीपार गेली आहे. विंता नंदा यांनीही ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर लैंगिक दुर्वर्तनाचे आरोप केले व सगळ्यांना पुन्हा एक धक्का बसला. ज्या ज्या कलाकारांवर आरोप होत आहेत त्यांचे भारतातील लोक फार मोठ्या संख्येने चाहते आहेत. त्यामुळे खरं खोटं काय ते समजायला मार्ग नाही. या अभियानामुळे अजुन किती जणांवर आरोप होणारेत व पुढे हे मीटू नावाचं वादळ काय थैमान घालणार, हे काहीच सांगता येत नाही.
मी टू अभियानाच्या माध्यमातून कधीकाळी झालेल्या अत्याचाराविरोधात आज अचानक आवाज उठवणे अनेकांना शंकास्पद वाटत आहे. ते स्वाभाविक आहे. पण त्यात तथ्य नाही. दहा वीस वर्षापुर्वी अत्याचार झाले तेव्हाच त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार का केली गेली नाही, असा प्रश्न भविष्यात कुणास पडू नये म्हणुनच हे अभियान छेडले आहे. अत्याचार झाल्यावर त्याविरोधात स्त्रीयांना कुठलीही भीती व संकोच न वाटता आवाज उठवता यावा म्हणुन हे मीटूपुराण सुरु झाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कामाच्या ठिकाणी लज्जारक्षणास्तव किंवा भीतीमुळे स्त्रिया आपल्यासोबत झालेल्या दुर्वर्तनास वाचा फोडत नाही. ही बाब काही स्रीलंपट व गूंड प्रवृत्तीच्या पुरुषांना चांगलीच ठाऊक असते. म्हणुन त्यांची तसे दुर्वर्तन करण्याची छाती होते. या पुरुषी अहंकाराला जरब घालणे गरजेचे होते. या अभियानामुळे पीडित महिलांना जर आवाज उठवण्याची हिंमत मिळत असेल, तर त्यात वावगे काय? त्या महिलेवर किती वर्षापुर्वी अत्याचार झाला ते जास्त महत्वाचे नसून अत्याचार झाला हे महत्वाचे आहे व त्याविरोधात आवाज उठवला गेलाच पाहिजे.
परंतु फिल्म इंडस्ट्रीतील स्त्री कलाकारांची संख्या यात जास्त दिसुन येत आहे. फिल्म इंडस्ट्रीत तर संधी मिळवण्यासाठी व काम मिळवण्यासाठी अनेक तरुणींना तेथील वरीष्ठ कलाकारांच्या किंवा दिग्दर्शक निर्मात्यांच्या इच्छा पुर्ण कराव्या लागतात, ज्या आर्थिक किंवा शारीरीक सुखाच्या असतात अश्या चर्चा आजही गावागावात रंगत असतात. त्यात किती तथ्य असते माहित नाही. पण मी टू च्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीतील स्त्रिया ज्याप्रकारे रोष व्यक्त करताय त्यावरून ते खरेच असावे असे वाटू लागले आहे. तथापी या सर्व महिलांनी त्यावेळी तर आपला स्वार्थच पाहिला. विरोध केल्यास आपली संधी/काम डावलले जाऊ शकते म्हणुन त्या गप्प राहिल्या. आणि आज मात्र त्याविरोधात आकांडतांडव करतायेत. आपल्या स्वार्थाच्या बदल्यात तेव्हा तडजोड करणा-या महिलांनी नंतर आपल्यावर अत्याचार झाले, असं म्हणणं कितपत योग्य म्हणावं? असा प्रश्न करणंही गैरलागू ठरु शकत नाही. कारण या गोष्टीचं सरसकट समर्थन करणं एका विकृत विचाराला जन्म देऊ शकेल व यातुन नवरा बायकोतील अतिविकोपाला गेलेल्या भांडणातून सूडबुद्धीने नव-यावर चारित्र्यहननाचे किंवा अत्याचाराचे आरोप केल्यास तिच्या नव-यावरच अन्याय झाल्यासारखे होईल. याला दुजोरा देण्याचे कारण असे की काही दिवसांपुर्वीच न्यायालयाने एका अश्याच प्रकरणाचा निर्णय देताना पत्नीच्या इच्छेविरूद्ध शरीरसुखासाठी जबरदस्ती केल्यास त्याला बलात्कार म्हणता येईल असे म्हंटले होते. त्यामुळे नव-यापासुन फारकत घेऊ इच्छिना-या किंवा त्यांचे संबंध प्रचंड विकोपाला पोहचलेले असल्यास त्या महिलेद्वारे मीटू चा गैरफायदा घेतला जाऊ शकतो.
या अभियानाचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे, एखाद्या स्त्रीची कुणी छेड काढली असेल, विनयभंगाचा प्रकार घडला असेल, कुणी धमकी दिली असेल किंवा तिच्या इच्छेविरोधात अन्य काही दुर्वर्तन केलं असेल तर ती त्याविरोधात आवाज उठविण्यास घाबरत होती. पण मी टू मुळे ती आज अश्या व्यक्तीच्या विरोधात आवाज उठवण्याची हिंमत करत आहे. कारण त्यासाठी तिला आज अनेकांचा पाठिंबा मिळू शकणार आहे. काही वर्षापुर्वी माझ्या एका मैत्रिणीची परीक्षा सुरु असताना एका विद्यार्थ्याने छेड काढली होती. तशी ती डॅशींग होती. त्यामुळे परीक्षा झाल्यावर तिने त्याला गाठून चोप दिला. पण त्याने दिलेल्या धमकीमुळे ती फार भयभीत झाली होती. बाहेरगावी शिकण्यासाठी आले असताना जरा सहन केलं असतं तर काय बिघडलं असतं, असा विचार ती करत होती. तिच्या मुळ स्वभावाला न पटणारा तो विचार होता. कारण ती एक निडर स्वभावाची डॅशींग गर्ल होती. पण तिलासुद्धा भीतीने ग्रासलेच होते. मग सामान्य लाजाळू स्वभावाच्या मीतभाषी मुलींची काय अवस्था होत असेल याचा विचार केला म्हणजे मी टू चे महत्व लक्षात येऊ शकेल. त्यासाठी मी टू अभियान अप्पर क्लासमधून मिडलक्लासपर्यंत जरी पोहचले तरी त्याचे योग्य परिणाम दिसायला वेळ लागणार नाही. कारण स्त्रीला काहीही केले तरी ती काही भीतीपोटी व स्वलज्जारक्षणासाठी आवाज उठवत नाही हे बरेच धूर्त पुरुष जाणुन आहेत. त्याचाच फायदा ते घेतात व घेत राहतात. अश्या प्रवृत्तीवर जरब बसण्यासाठी हे मी टू अभियान महत्वाची भूमिका बजावु शकते.
त्यामुळे या अभियानाचा केवळ कौतुक सोहळा करुन भागणार नाही. अभियानाचा दुरुपयोग किंवा गैरवापरही होणे टाळता येत नाही. पुर्व वैमनस्यातून किंवा सूडबुद्धीने पेटलेल्या एखाद्या स्त्रीकडून पुरुषाला नाहक लक्ष्य बनवले जाऊ शकते किंवा ब्लॅकमेलही केले जाऊ शकते. वैयक्तीक शत्रुत्वाने पछाडलेल्या महिला या अभियानाचा गैरवापर करणार नाहीत, याची कोण हमी देणार? स्वत:च्या प्रसिद्धीसाठी किंवा जाणिवपुर्वक कुणाच्या बदनामीसाठी या अभियानाला शस्त्र बनवले जाणार नाही, असे कुणी आश्वासन देऊ शकणार नाही. एखाद्या व्यक्तीला अश्या खोट्या पद्धतीनं बदनाम केलं जात असेल तर त्याच्याकडून आरोप करणा-या महिलेवर अब्रू नुकसानीचा दावा करता येण्याची तरतूद आहे. नुकतीच अलोकनाथ यांनी त्यांच्यावर आरोप करणा-या विंता नंदा यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा केला आहे. एखाद्या पुरुषावरील आरोप खोटे होते हे काही काळानंतर सिद्ध झाले तर त्या पुरुषाची झालेली बदनामी व गेलेला वेळ कसा भरून निघेल? कारण नसता कुणीही अश्याप्रकारे बळीचा बकरा बनू शकतं. त्यामुळे या अभियानामुळे देश किती ढवळून निघतो व त्याचे किती सकारात्मक किंवा नकारात्मक बदल दिसतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.
-कल्पेश गजानन जोशी
Lekhamrut.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा