कपडे, दर्शन व प्रदर्शन

कपडे, दर्शन व प्रदर्शन

आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण देशातच आधुनिकतेचे पुरस्कर्ते आपल्या मार्गावरुन भरकटले असावे असे चित्र निर्माण झाले आहे. छद्मी पुरोगामीत्व, छद्मी विज्ञानवाद, छद्मी विवेकवाद व स्वत:ला बुद्धीवादी म्हणुवुन घेणा-या ढोंगी लोकांमुळे या सर्व संकल्पना जणु आपला मुळ प्रवाह सोडून भरकटत चालल्या आहे असे वाटत आहे. याला कारणीभूत असलेल्या नुकत्याच महिनाभरात चर्चेत आलेल्या शबरीमाला मंदिर निकाल, कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिराचे प्रकरण  यांसारख्या घटना जरी लक्षात घेतल्या तरी लक्षात येऊ शकेल. नैतिकता आणि सदसद विवेकबुद्धी नावाचा प्रकार मानवाला मिळालेली अमुलाग्र देणगी आहे. ज्याचा वापर त्या व्यक्तीवर अवलंबुन असतो. पण हल्ली नैतिकता आणि विवेक नावाच्या गोष्टींना काही किंमतच उरलेली दिसत नाही, असे या घटनांवरून वाटू लागले आहे.

कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात तोकडे कपडे परिधान करुन जाण्यास विरोध दर्शवणा-या पश्चिम महाराष्ट्र देवालय समितीच्या एका निर्णयावर सध्या वादंग निर्माण झाले आहे. भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी तर समितीला चोप देण्याची भाषा वापरली. इतरवेळी दुस-यांना न्याय, न्यायालय, संविधान व अधिकाराची भाषा शिकवणारी मंडळीही तृप्ती देसाईंच्या चोपा-चोपीच्या भाषेत सामिल झाली. विशेष म्हणजे ही तीच मंडळी आहे, जी स्वत:ला विज्ञानवादी, पुरोगामी व विवेकवादी म्हणवुन घेण्यात अग्रेसर असते. या मंडळीचं संविधान प्रेम स्वत:च्या सोयीनुसार असतं हे यातुन पुन्हा सिद्ध झालंय. एखादा निर्णय आपल्या मनासारखा असेल तर संविधान प्रेमी असल्याचे ढोल बडवायचे व नसेल तर चोप द्यायची भाषा करायची ही यांची नवी ओळख. म्हणुनच ह्या मंडळींचे पुरोगामीत्व व विज्ञानवाद छद्मी असल्याचे म्हणावे लागते.

मुळात प्रश्न असा आहे की, धार्मिक स्वातंत्र्यात न्यायालय हस्तक्षेप करणार नाही असे संविधानात नमुद केलेले आहे. पण त्यासाठी काही सीमाही ठरवल्या गेल्या आहेत. धार्मिक वाद विवाद न्यायालयाच्या निर्देशाने नव्हे तर समाजाने ठरवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करेल असा त्यामागे उद्देश होता. त्यासाठी समाजजागृती करणे सगळ्यात महत्वाचे. न्यायालयाच्या माध्यमातुन समाज मान्य करत नसलेले निर्णय देऊन परिवर्तन होणारे नसते. यामुळे न्यायालयाविरुद्ध असंतोष व नाराजी पसरण्यास वाव मिळतो. त्यामुळे मंदिरासारख्या पवित्र जागी भाविकांनी कोणते कपडे परिधान करावे, स्त्रियांनी यावे की नको, गाभा-यात जावे की न जावे असे निवाडे न्यायालयाकडून होतात हेच दुर्दैव. त्यातही मग न्यायालयाच्या निर्णयावरुन वाद घालत बसणे अतिदुर्दैव. न्यायालयात जर गेलेच आहात तर न्यायालयाने दिलेला निर्णयही मान्य करता आला पाहिजे. नाही तर आम्हाला हवा तोच न्याय अशी भाषा व वर्तन कुणी करत असेल, तर त्याला जरब बसलीच पाहिजे. पण न्यायालयापर्यंत अश्या समस्या घेऊनच का जावे हाच मुळात प्रश्न आहे.

खेळ खेळताना शक्यतो हाफ पँट व टी शर्ट परिधान केले जातात, फॅमिलीसोबत बाहेर फिरायला जायचे म्हंटले की सगळे जण चांगल्यातले कपडे परिधान करतात, पार्टी वगैरे असल्यास जरासे फॅशनेबल कपडे परिधान केले जातात. तेच जर क्लब पार्टी किंवा बारमध्ये जायचे असेल तर जरासे अंगप्रदर्शन करणा-या फॅशनेबल कपड्यास पसंती दिली जाते, घरी काही धार्मिक कार्यक्रम असेल तर नेहरू शर्ट किंवा पांढरा कुर्ता परिधान करतात, सण वार किंवा लग्न समारंभात पारंपारीक कपड्यांना व महिला नऊवारी व पैठणीसारख्या कपड्यांना पसंत करतात. एखाद्या बीचवरील चित्र पाहिले तर लक्षात येईल की स्त्री पुरुष दोघेही तोकड्या कपड्यात अर्धनग्न अवस्थेत असतात. भिन्न भिन्न ठिकाणी भिन्न स्वरुपाची पोशाखपद्धती असण्याचे कारण कालसापेक्ष व स्थानसापेक्ष परिधान करण्याचे विशिष्ट पोशाख ठरलेले आहे. आश्चर्य म्हणजे ह्या सगळ्या अलिखीत नियमावलीतील बाबी आहेत. कुणी विशिष्ट कायदा करुन ही पोशाख पद्धती ठरवलेली नसुन ती स्वत: समाजाने ठरवलेली आहेत. त्यासाठी कोणावरही बळजबरी नसते, पण जागेचा व तेथिल वातावरणाचा विचार करता हे अलिखीत नियम समाजानेच कालानुरुप निर्माण केले आहेत. त्याचप्रमाणे देवळात जातानाही एक विशिष्ट पोशाख समाजानेच ठरवला आहे. आज काल जी सामान्य पोशाख पद्धती रुढ झाली आहे तिच्यासह बरेच लोक मंदिरात प्रवेश करतात. त्याचे काही कुणास सोयर सुतक नाही. पण अंगप्रदर्शन करणारी बीचवर आणि बियरबारमध्ये परिधान करावयाची कपडे मंदिरासारख्या धार्मिक जागी कुणी परिधान करुन जात असेल तर ते नैतिकतेला धरुन नसते व विवेकबुद्धीला न पटणारे नसते.

पश्चिम महाराष्ट्र देवालय समितीने भक्तांच्या प्रतिक्रियांवरुन विचार करुन तोकडे कपडे वापरु नये अशी सुचना केली होती. खरं तर ही सुचना काही कुणावर लादलेली नव्हती. तोकड्या कपड्यात कुणी आलेच तर त्याला दर्शन मिळेल असे समितीने स्पष्ट केले होते. शिवाय कुणाला कपडे बदलायचे असेल, तर चेंज रुमची व्यवस्था केली जाईल इतका सहज हा निर्णय होता. त्यावर आकांड तांडव करायचे काही कारण नव्हते. पण, आम्ही सांगु तेच विचार पुरोगामी व आम्ही सांगु तोच विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन असा मुजोरपणा वाढीस लागला आहे. त्यातुनच मग चोप देण्याची भाषा सुचते. एवढी ही असहिष्णुता कश्यासाठी?? लोक म्हणतात, ही लढाई पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी अशी आहे; पण सत्य तर हे आहे की ही लढाई विवेकवाद विरुद्ध छद्मी विवेकवाद, विज्ञानवाद विरुद्ध छद्मी विज्ञानवाद व पुरोगामित्व विरुद्ध छद्मी पुरोगामीत्व अशीच आहे, असे निष्पन्न होत आहे. आणि हे असेच सुरु राहिले तर आज मंदिरात तोकड्या कपड्यात प्रवेशाचा आग्रह धरणारे तथाकथीत पुरोगामी मंडळ उद्या शाळा काॅलेजातील शिक्षिकांनाही तोकड्या कपड्यात येऊ देण्यासाठी गोंधळ घालतील. कारण शाळा काॅलेजात विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येतात त्यांची दृष्टी चांगली हवी. असा युक्तीवाद इथेही पुढे करायला ही मंडळी मागेपुढे पाहणार नाहीत. तेव्हा तुम्ही देवळात दर्शन करण्यास आले आहात की प्रदर्शन करण्यास, हा सवाल उपस्थित झालाच पाहिजे.

-कल्पेश गजानन जोशी
Lekhagni.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान