मुस्लीम समावेशक हिंदुत्व??

मुस्लीम समावेशक हिंदुत्व??
सरसंघचालक हिंदुत्वाविषयी नेमकं काय बोलले?

》》

"हिंदुत्व या विषयावर (१८ सप्टेबर) बोलताना मोहनजी म्हणाले, की हिंदुत्व हा विचार संघाने शोधलेला विचार नाही. हिंदुत्व या विचाराचे उगमस्थान भारताच्या प्राचिन संस्कृतीपासुनच आहे. सर्व मानवाचे कल्याण, सर्वसमावेशकता, परस्परांबद्दल आदरभाव, वसुधैव कुटुंबकम व मानवता या विचारांना आत्मसात करणे म्हणजेच 'हिंदुत्व' आहे . तसेच देशभक्ती, संस्कृती व आपल्या पुर्वजांचा गौरव हे हिंदुत्वाचे तीन आधारस्तंभ असल्याचेही सरसंघचालकांनी सांगितले. दुष्टांबाबतही चांगला विचार करणे आपली संस्कृती शिकवते. हाच विचार संघाचाही आहे. याचे स्पष्टीकरण करताना मोहनजींनी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पसायदानातील 'जे खळांची व्यंकटी सांडो' या ओवीचा आधार घेतला. आम्हाला दुष्ट व्यक्तीविषयी चीड नाही, तर त्याच्यातील दुष्ट विचारांची अडचण आहे. त्या व्यक्तीला दुर्गुणविरहित घडवुन आपलेसे करणे म्हणजे हिंदुत्व आहे. संघ याच विचारावर आजपर्यंत चालत आला आहे, असेही त्यांनी सांगितले. मोहनजींचे मुस्लीम समावेशक हिंदुत्वाचं विधान समजुन घेताना या गोष्टीचा विचार केला पाहिजे.

हाच विचार थोडा स्पष्टपणे मांडतांना डाॅ. भागवत पुढे म्हणतात, हिंदुत्वाची किंवा भारतीय मुलभूत विचारांची जी बदनामी झाली त्यास काहीअंशी स्वत: हिंदुच जबाबदार आहेत. हिंदुंनी हिंदुत्वाच्या विचाराला केवळ कर्मकांडासारख्या गोष्टींशी जोडुन हिंदुत्वाच्या एका उदात्त विचाराला संकुचित करुन ठेवले. हिंदू या नावाला आर्यधर्म, सनातनधर्म, भारत, इंडिक असे विविध नावांनीही जगात ओळखले जाते. संघाला याबाबत काही समस्या नाही. कारण, या सगळ्याचा समुच्चयपुर्ण उल्लेख हा हिंदुच आहे. हिंदुंनी आपल्याला संकुचित न करता स्वत:चं व्यापक हिंदुपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा हिंदु स्वत:ची ओळख विसरला, तेव्हा तेव्हा आपला देश धोक्यात आला आहे. तेव्हा हिंदूंनी आपलं हिंदुपण सदैव स्मरणात ठेवणे गरजेचे आहे.

आपल्या दुस-या दिवसाच्या व्याख्यानाचा शेवट करताना सरसंघचालक डाॅ. मोहनजी भागवतांनी हिंदुराष्ट्र संकल्पनेविषयी थोडक्यात विचार व्यक्त करताना म्हणाले, की हिंदुुराष्ट्रामध्ये मुसलमानांना किंवा अन्य धर्मीयांना स्थान नाही असे अजिबात नाही. पण ज्या दिवशी आम्ही असे म्हणु तेव्हा त्याला हिंदुत्व म्हणता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले व दुस-या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप केला."
या ठिकाणी मोहनजींना दुर्गुणविरहित मुस्लीम अपेक्षित आहे. ते त्यांनी वर स्पष्ट केलं आहे.

१९ सप्टेबरच्या तिस-या दिवशीच्या कार्यक्रमात हिंदुत्व या विषयावर सरसंघचालक पु. मोहनजी भागवत म्हणाले,  हिंदुत्वाला 'हिंदुइजम' म्हणणे योग्य नाही. 'इजम' जोडल्यामुळे तो विचार संकुचित व एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त होतो. हिंदुत्वाचा विचार अतिशय व्यापक आहे. भारतातील सर्व जाती जमातीही निर्विवाद हिंदुच आहे. खरं तर आम्ही भारतातील सर्व समाज हिंदूच समजतो. काहींना हिंदु असल्याचा अभिमान वाटतो, काहींना वाटत नाही. तर काहींना आपण हिंदु आहोत हेच माहित नाही. आदीवासी समाज तर आपला खरा पुर्वज आहे. आम्ही त्यांच्याकडे इतरांप्रमाणे बंधुत्वाच्या नात्याने पाहतो. आपली संस्कृती आपल्याला एकता शिकवते. पण आपल्याच काही चुकीच्या समजुतीमुळे आपापसात परकेपणा निर्माण झाला. तो परकेपणा दूर होतोय. सर्व समाजाला आता सदभावनेने पुढे जायचे आहे.

धर्मांतरणविषयी बोलताना धर्मांतरण करण्यामागे कपट असल्यामुळे त्याला विरोध करावा लागतो. नाहीतर स्वखुशीने अन्य धर्म स्विकारणा-या व देशासाठी समाजासाठी कार्य करणा-या नारायण वामन टिळकांसारख्या लोकांचा आम्ही नेहमी आदरच करतो. धर्मांतरण अध्यात्माच्या तत्वावर झाले पाहिजे. छळाने व कपटाने होणा-या धर्मांतरास संघाचा कायम विरोध राहिल असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, पर्यावरणाचं कारण पुढे करुन नेहमी हिंदुंच्याच सणांना विरोध करणं चुकीचं आहे. काही लोक केवळ हिंदुंच्या सणाला विरोध म्हणुन पर्यावरणाचं कारण पुढे करतात. पर्यावरणाचा विचार करताना अन्य धर्मीयांच्याही सणाचा विचार व्हायला पाहिजे. हिंदु सणवार कालानुरुप बदलत आले आहेत. त्यात आवश्यक तो बदल समाजच घडवेल. परंतु समाजमन सुधरवण्याची पद्धत व भावना चुकीची असल्याचे सांगत त्यांनी तथाकथीत पुरोगाम्यांवर निशाणा साधला.

मोहनजींना जिहादी, कट्टरवादी, दहशतवादसमर्थक, भारतविरोधी, धर्मांतरणं करणारा व लव्हजिहादचा पुरस्कार करणारा मुस्लीम हिंदुत्वामध्ये अपेक्षित नाही, हे आता तुमच्या लक्षात आले असेलच! पण तरीही सोशलमिडियावरच्या मुल्यहिन लाईक्स मिळवण्यासाठी व आपण अन्य हिंदुत्ववाद्यांपेक्षा किती भिन्न आहोत हे दाखवण्यासाठी खटाटोप करायचाच असेल, तर खुशाल करा. संघ काही कावळ्यांच्या शापाने संपणारा नाही.

-कल्पेश जोशी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान