मॅकोले जिवंत आहे...
मॅकोले जिवंत आहे...
१८२८ साली विल्यम बेंटिकची भारताचा गव्हर्नर जनरल म्हणुन नियुक्ती झाली. त्याच्या कारकिर्दीतील महत्वाचे व भारताच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारे एक पाऊल म्हणजे शिक्षण सुधारणा होय. बेंटिकने सतीप्रथा व बालवधप्रथा यावर कायद्याने बंदी आणली होतीच. भारतातील या अनिष्ट प्रथांंना राजा राममोहन राॅय यांच्यासारख्या भारतीयांचाही विरोध होताच. बेंटिकने या प्रथांना मोड घालून समाजमनात चांगली प्रतिमा तयार केली. याचा उपयोग त्याला शिक्षण सुधारणेत झाला. तसा त्याचा धूर्त डावच होता.
भारतात इंग्रजांकरवी ख्रिश्चन मिशनरी साम दाम दंड भेद तत्वाचा उपयोग करुन गोवा, ठाणे, वसई, बंगाल, पाँडीचेरी अश्या प्रदेशात जोरदार धर्मांतरणं करत होते. परंतु त्यांच्या या कामावर इंग्रज नाखुष होत. बाटवलेल्या भारतीयांना त्यांचे पुरोहीत नदीत स्नान करुन व मंत्रोच्चार करुन पुन्हा शुद्ध करवुन स्वधर्मात घेत. काही वेळा चिमाजी अप्पासारख्या धर्मप्रेमी मराठ्यांचा व इतर स्थानिक राजांचा रोष ओढवुन घेतला जाई. अश्याने भारताचे रुपांतर ख्रिश्चनबहुल इंग्लंड होण्यास शेकडो वर्षांचा अवधी लोटावा लागणार होते. त्यामुळे भारतीयांना एका झटक्यात व अतिशय कमी कालावधीत पाश्चात्तीकरण करायचे असल्यास येथिल शिक्षण पद्धतीतच बदल झाला पाहिजे असे बेंटिक व मॅकोले या दुकलीच्या डोक्यात विचारवादळ चालू होते. त्यानुसार त्यांनी पाऊल टाकलेच.
बेंटिकने आपल्या गोडबोल्या स्वभावामुळे भारतीयांची मने आपल्या बाजुने यशस्वीरित्या वळवुन घेतली होती. बेंटिकने केलेला बदल हा आपल्या फायद्याचाच असावा असा विचार समाजमनात होता. पण बेंटिक धूर्त होता. त्याने ठरवले असते, तर सरळ शिक्षण समिती नेमुन आपल्याला हवा तसा नवा इंग्रज शैक्षणिक कायदा भारतीयांवर लादू शकला असता. पण भारतीयांना आपल्या कुटील डावाचा संशय सुद्धा येऊ नये याची त्याने पुरेपुर दक्षता घेतली व पौर्वात्य व पारंपारीक भारतीय साहित्य व शिक्षण चालू ठेवण्याच्या बाजूने 'हेमन विल्सन' व 'प्रिंसेप बंधू' यांना उभे केले, तर नवीन पाश्चात्य शिक्षण लागू करण्याचे समर्थक म्हणुन 'चार्ल्स ट्रॅव्हीलीयन' व इतर होते. बेंटिकने मॅकोलेला यांच्या समितीचा अध्यक्ष केले. २ फेब्रुवारी १८३५ रोजी मॅकोलेने आपला अहवाल सादर केला. त्यात त्याने भारतीय शिक्षणाची अक्षरश: टिंगल उडवली. पाश्चात्य शिक्षणाची एक अलमारी भारतीय व अरबी शिक्षणाच्या बरोबरीची आहे, असे त्याने प्रतिपादन केले. 'रंगाने व रुपाने भारतीय परंतु विचार, प्रवृत्ती व बुद्धीने इंग्रज' असा वर्ग बणविण्याची त्याची धूर्त योजना होती. त्यात तो पुर्णत: यशस्वी झालाच.
भारताच्या शिक्षणाची टिंगल उडवली जात असताना भारतीय शिक्षण समर्थन करणारे विल्सन व प्रिंसेप सोयीस्कररित्या चुप्पी साधून होते. भारताची शिक्षण व्यवस्था इतकी खालावलेली असताना नालंदा व तक्षशिलासारख्या महान विद्यापीठं आगीत बेचिराख का करण्यात येत होती? भारतीयांची ग्रंथसंपदा परकियांकडून का चोरी होत होती? राईट बंधूंना विमान निर्मितीचे शास्त्र मुंबईच्या तळपदेंकडून कपटाने का पळविले असावे? यासारखे मुद्दे सामान्य भारतीयांस आजही पडतात. परंतु भारतीय शिक्षणाची बाजू मांडणा-या विल्सन व प्रिंसेप बंधूंना का वाटले नसावे? किंवा मांडले असतिल तर ते अपयशी का झाले?
कारण एकच होते. शत्रुपक्षाकडून बोलणारा वकिल व स्वकियांकडून बोलणारा वकिल शेवटी इंग्रजच होता ना. मग जय साहजिकच इंग्रजांचा होणार होता. नव्या शिक्षण सुधारणेमुळे भारतीयांना आधुनिक शिक्षण मिळाले हे खरे. परंतु, त्यांना भारतीयांबद्दल जिव्हाळा होता, भारतीयांना आधुनिक विचार मिळावे हा काही त्यामागचा प्रामाणिक उद्देश्य नक्कीच नव्हता. कारण ही शैक्षणिक सुधारणा नसून पाश्चात्तीकरणाचा प्रयोगच होता.
आपल्या पित्याला पत्रात मॅकोले अशी आशा व्यक्त करतो, "जर आमच्या शिक्षण योजनांचे अनुकरण झाले तर बंगालमधील प्रतिष्ठीत वर्गात येत्या ३० वर्षात एकही मूर्तीपुजक राहणार नाही."
मॅकोलेचे हे वाक्य त्याच्या डोक्यातील भारतीयांविषयीचे कपटी व धूर्त मत व्यक्त करतेच. शिवाय, आपण जे काही करत आहोत ते भारतीयांच्या हितासाठी करत आहोत ह्या बेंटिकच्या मताचे खरे रुप उघड करुन जाते.
एवढेच काय तर २ फेब्रुवारी १८३५ ला ब्रिटिश पार्लमेंटला लिहिलेल्या पत्रात मॅकोले लिहितो, "मी आफ्रिकेत प्रवास केला. मला एकही भिकारी किंवा चोर दिसला नाही. तेच वैभवसंपन्न चित्र मी इथे भारतात पाहत आहे. या लोकांची उच्च नैतिकता, आचारविचार, संस्कृती व प्रचंड इच्छाशक्ती पाहुन यांच्यावर कधी पुर्णपणे राज्य करणे शक्य होईल असे वाटत नव्हते. म्हणुनच येथिल समाजमनाचा कणा मोडून काढण्यासाठी आम्हाला नवीन पाश्चात्य शिक्षणपद्धती येथे सुरू करावी लागली. येथिल लोकांनासुद्धा आफ्रिकन जनतेप्रमाणे स्वत:च्या पारंपारीक शिक्षणाविषयी तिरस्कार वाटून पाश्चात्य शिक्षणाविषयी गोडी निर्माण होईल असा विश्वास आहे." हे मॅकोलेचे खरे विद्रुपकारी रूप होते.
लोक म्हणतात इंग्रज गेले. पण अजुनही विश्वास होत नाही. आमची आजही शिक्षणपद्धती मॅकोलेच्या ठरवलेल्या गाईडलाईनवर चालत आहे. मॅकोले अजुनही आमच्या मेंदूमध्ये जिवंत आहे.
असो. स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
-कल्पेश गजानन जोशी
lekhagni.blogspot.com
African asa ullekh ithe ka karnyat ala asava, nahi samajle.
उत्तर द्याहटवा