लिंबू सरबत आणि मनपा निवडणूक
लिंबू सरबत आणि मनपा निवडणूक
मतदान करण्यासाठी जळगांवकरांनी बराच वेळ घेतला असं ऐकलं. नाना प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं. कोणास लक्ष्मी प्रसन्न झाली तर कोणास शेवभाजी. काही अतिभाग्यवान होते ज्यांना मटनपार्टी व दारूचाही मनमुराद आस्वाद घेता आला म्हणे. म्हणुनच की काय तर प्रसिद्ध खाऊगल्लीकडे कुणी फिरकलं नाही. हो पण लगेच नकारात्मक विचार करण्याचं काही कारण नाही बरे. कारण, या सर्व दानधर्मामागे कोण होते हे काही सांगायची आवश्यकता नाही. ज्यांच्या हाती जळगांवचं भविष्य होतं त्या लोकांनी आपण किती जनसामान्यांसाठी काम करतो, सेवा करतो हे त्यांनी जनतेस दाखवुन दिले एवढेच. शेवभाजी व वरणबट्टीच्या पार्ट्या देऊन आपण कर्णासमान महा दानी आहोत याची उडत उडत प्रयत्न केला गेला. मग या मंडळींचं कौतुक तर झालंच पाहिजे ना. लगेच आपलं प्रलोभन आणि आमिषसारखे शब्द वापरायचे कश्याला..? इथेच तर आपण सामान्य लोक मागे पडतो. हीच आपली नकारात्मक विचारसरणी आपला विकास रोखते. अहो, जरा डोळसपणे विचार करावा. पुरोगामी विचार करावा. विज्ञाननिष्ठ दृष्टी ठेवावी. जळगांवच्या लोकांना सर्व जीवनसत्वे अन्नाद्वारे मिळावी व जळगांवची जनता तंदुरुस्त रहावी म्हणुनच ही सर्व उठाठेव होती, असे मानायला काय हरकत आहे? अहो, हाच तो विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन. पण आपण अधोगामी लोक काही सुधरायचे नाहीतच.
जळगांवकरांची तशी अजुन एक गोष्ट फार आवडली. किती विचारपुर्वक निर्णय घेतात हो? युपीेएससीची परीक्षा देणारेही परीक्षेपुर्वी इतका विचार व खलबतं करत नसतिल. पोलीसदल ही एखादा छापा टाकण्यापुर्वी एवढा विचार व नियोजन करत नसतिल. पण जळगांवकर मात्र यावर मात करुन गेले हो. मतदानकेंद्रांच्या बाहेर ठिकठिकाणी काय गर्दी दिसत होती? काय ते घोळके व काय ती हितगुज? पाहुनच भारावल्यासारखे झाले अगदी. पण हे मेले अधोगामी नकारात्मक विचारांचे लोक सुधरायचेच नाहीत. काय तर म्हणे पैसे वाटप चालू असेल. मुर्खच म्हणावं असं बोलणा-यांना. अहो, मतदान कोणास करायचे? कोण उमेदवार चांगला कोण वाईट याची मसलत चालू होती ती. पण हे आपले नकारात्मक सोच सोडतीलच कसे?
जळगांवकरांच्या बाबतीत तर खरच शंका घ्यायला नको. आता सांगली, मिरज, कुपवाडा या ठिकाणीही निवडणुका झाल्या. पण तिकडे बघा अंधश्रद्धेने, अधोगामी विचारांनी, जुनाट चालीरितींनी तेथिल राजकारण्यांचा व जनतेचा पिच्छा काही सोडलेला नाही म्हणे. निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणे रात्री जादूटोणा व मंत्र तंत्राना ऊत आला होता. सकाळी लोकांना आपल्या गल्ली बोळात लिंबू कापलेले आढळले म्हणे. आता जळगांवप्रमाणे तिकडच्याही राजकारण्यांना वाटले असावे की आपल्या गावातील लोकांना एनर्जी यावी, म्हणुन त्यांनी लिंबु सरबताचे वाटप केले नसेल का? मतदानाच्या रांगेत किती तासनतास थांबावं लागतं लोकांना.
मतदानासाठी फार गांभीर्यानं घेतो ना आम्ही लोक. अहो बँकेसमोरील रांगांमध्ये भलेही आम्हाला वीट येईल, पण मतदानाच्या रांगेत दिवसभर उभे राहण्याची तयारी असते आमची. कर्तव्यदक्ष नागरीक असल्याचा हा पुरावा समजावा. पण या मिडियावाल्यांनाच काही कळत नाही. जरा काय लिंबू दिसले, कुंकू व मानवी कवट्या दिसल्या म्हणजे लगेच अंधश्रद्धा म्हणुन मोकळे होतात. या बाबतीत जळगांवकर मागेच पडले म्हणायचे. जळगांवच्याही दानी लोकांनी लिंबू सरबत वाटप करायला हवं होतं. तेवढीच जनतेला एनर्जी आली असती ना.
जाऊद्या सोडा. झालं गेलं गंगेला मिळालं. आज मतमोजणी दिन आहे. आपली उत्सुकता शिगेला पोहचली आहे. जळगांव मनपावर कोणाचा झेंडा फडकणार? कोण विजयी होणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. तेव्हा काल परवाच्या शेवभाजी वरणबट्टीचा ढेकर देऊन आज मोकळे व्हा. नाहीतर तुमच्यावर लिंबू सरबताची वेळ यायची. अहो, पचनसुलभतेसाठी! लगेच काय शंका घेता राव..?
- कल्पेश गजानन जोशी
Kavesh37@yahoo.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा