विक्रम-वेताळ आणि जळगांव रणसंग्राम'

'विक्रम-वेताळ आणि जळगांव रणसंग्राम'

    पराक्रमी व बुद्धीमान राजा विक्रम त्या जंगलातील वेताळ नामक पिशाच्चास पकडण्यासाठी निघाला होता. त्या घनदाट जंगलात राजा विक्रम बेसावध पाहून तो वेताळ राजाच्या पाठीवरच येऊन बिलगला. आणि मोठमोठ्याने खिदळत राजास बोलू लागला... "राजा तू हुशार आहेस. विद्वान आहेस. मनुष्याची पारख तुझ्याइतकी कोणालाच करता येणं शक्य नाही, हे मला ठाऊक आहे. मग मला आता सांग, "जळगांव मनपा निवडणुकीपुर्वी हे काय राजकारण शिजत आहे? 'भाऊ' काही दिवसांपूर्वी रेल्वे इंजिनातून उतरुन 'दादां'च्या शिवाजी नगरात दाखल झाले होते. तिथे त्यांनी दादांसोबत हातमिळवणी केली होती आणि आता एक आठवडाही होत नाही तो लगेच भाजपात प्रवेश करते झाले आहे. तिकडे घड्याळवालेही भाजपचा रस्ता धरत आहेत. यामागे काय राजकारण असू शकते? आणि खाविआ- भाजप युती होईल, की नुसतीच अफवा ठरेल?' राजा तू माझ्या या प्रश्नांची उत्तरं दिलीस तर ठीक, नाहीतर मी तुझी शकले शकले करुन टाकीन! आणि याद राख...जर तू उत्तर बोलून सांगितले, तर मी पुन्हा उडून जाईन."

     राजाला काहीही करून त्या वेताळला जंगलाच्या बाहेर काढायचे होते. एकदा का तो जंगल पार करुन त्याच्या पुण्य नगरीत शिरला, की त्या वेताळची शक्ती संपलीच म्हणुन समजा. म्हणुन राजाने युक्ती केली, की वेताळला बोलण्यात गुंतवून ठेवायचं आणि जंगलातून लवकर बाहेर पडायचं. राजाने बोलण्यास सुरुवात केली.
"बघ वेताळ... या वर्षी मनपाच्या ७५ जागांसाठी मतदान होणार आहे. गेल्यावेळी एकट्या खाविआने ३३ जागा मिळवल्या व तो सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. यंदा भाजपा खाविआसोबत युतीसाठी आग्रही असल्याचे दर्शवत आहे. पण, भाजपाला मात्र एकट्याला ४० जागांची अपेक्षा आहे. पण गेल्यावेळी जो पक्ष सर्वात मोठा ठरला होता, तो आज भाजपाचा लहान भाऊ का होईल? त्यामुळे खाविआ भाजपसोबत जाईल यात शंकाच आहे. त्यातच जिकडे तिकडे परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. जनता भाजपाला कौल देतेय. केंद्रात व राज्यातही भाजपची सत्ता. मोदीलाट अजून ओसरल्याचे काही चिन्हं दिसत नाही. तेव्हा मोदीलाटेत एकहाती सत्ता मिळत असताना व खाविआशिवाय कुठलाही तगडा प्रतिस्पर्धी नसताना भाजपवाले युती का करतिल? त्यामुळे युती हे केवळ प्रतिस्पर्ध्याचा वेळ घालवण्याचे तंत्र आहे. जे भाजप व खाविआ दोघे एकमेकांविरोधात आजमावत आहेत. त्यामुळे युती केवळ एक थोतांड आहे. याची जाणिव बहुधा 'भाऊं'ना झाली असावी. म्हणुनच त्यांनी भाजपची वाट धरली. परंतु भाजपातील मुत्सद्दीगीरांनी भाऊंना सरळ आत न घेता व्हाया शिवाजीनगर बोलावले. जेणेकरुन दादांचे खच्चीकरण होईल व भाजपाचे वर्चस्व निर्माण होईल. पण भाऊ देखिल चतूर आहेत. त्यांनी आपले सहा सैनिक शिवाजी नगरातच ठेवले आहेत. जे त्यांना भविष्यात मदत करु शकतील.

     या सगळ्यांत बिकट अवस्था आहे ती काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची. काँग्रेसला तर गेल्या वेळी भोपळा देखिल फोडता आला नव्हता. तर राष्ट्रवादीनेही जेमतेम जागा मिळवल्या होत्या. यंदाही राष्ट्रवादीचा वेळ खराब चालूय. त्यामुळे घड्याळास कमळाची ओढ लागल्यास त्यात नवल नाही. म्हणुनच घड्याळ असो वा रेल्वे इंजिन दोघेही भाजपच्या दिशेने धाव घेताय."
आपल्या नगरीत शिरण्याच्या आत राजाचे उत्तर संपले. आणि वेताळ मात्र मोठ मोठ्याने हसू लागला. "राजा...तू उत्तर अचूक दिलेस. पण मी तुला बोलण्याची मनाई केली होती." असे बोलून वेताळ पुन्हा त्या घनदाट जंगलात गायब झाला.

-कल्पेश गजानन जोशी
Kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान