जंटलमन संत्याभाऊची 'जंटलगीरी'

जंटलमन संत्याभाऊची 'जंटलगीरी'

#उपरोधिक

    काय म्हणावं या सरकारला? चार वर्ष निव्वळ झोपा काढून आता कामाला लागताय. कामही कोणचं? जनतेची नाही. पुढच्या निवडणुकांची तयारीच ती. लोक म्हणत्यात सरकारची मुदत पाच वर्षाची असतीया. पण, आपण म्हणुया की चारच वर्षाची असत्ये. कारण शेवटच्या वर्षात सरकारनं केलेल्या जनहिताच्या कामाची काय ती किंमत करावी? भुकेल्यांना अन्न आणि कष्टक-यास पैसा मिळू लागतो त्याचे मुल्य शुन्य. कारण ते तर शेवटच्या वर्षात केलेलं काम ना. निवडणुकीच्या तोंडावर. अहो सामान्यांचं ठीक. पण मोदींना तरी कळू नये का? चार वर्ष तुम्ही काहीच नाही हो केले. जनधन खाते, मुद्रा बँक, पीक वीमा, सौभाग्य योजना, जनौषधी योजना ही सगळी बकवासच म्हणायची. पंतप्रधान विदेशात परराष्ट्र नीती धोरणासाठी थोडेच दौरे करत होते? ते तर मजा मारत होते या देशातून त्या देशात. त्याशिवाय काय व्हाईट हाऊसपर्यंत दरारा गेला भारतमातेच्या सुपुत्राचा. प्रजासत्ताक दिनी दहा देशाचे प्रमुख येतात, ते त्यांना भारताचा भला जिव्हाळा म्हणुनच. मोदींनी आमंत्रण दिले म्हणुन थोडीच. आणि हो. २०१४ पूर्वी ही राष्ट्रे, त्यांचे प्रमुख कुणीच नव्हते बरं का? सगळे पैदा झाले ते २०१४ नंतरच. म्हणुनच तर ते यापूर्वी कधी भारतात आले नाही. किंवा त्यांना यावसं वाटलं नाही.

    आता काय? सरकारनी वाढवला की हमीभाव. तेही 'निवडणुकीच्या तोंडावर'च म्हणा की. कारण शेवटचं वर्ष मोजायचं नाही हे आपण आधीच म्हणलंय ना. मग शेतक-याला त्याचा फायदा होवो अथवा नुकसान. ते झालं निवडणुकीच्या तोंडावर. मग त्याची किंमत शुन्य.

     आमचे संत्या भाऊ म्हणत होते पुढल्या वर्षी निवडणुका ना. म्हणुन तर सरकार आता काम करतंय. काय भारी बोलले ना संत्याभाऊ. सत्कारच कराया पाहिजे त्यांचा. ह्याच संत्याभाऊंना जनधन खातं उघडताना रांग मोडून पुढं जाताना अख्ख्या गावानं पाहिलं व्हतं बरं का? एका म्हतारीशी भांडला व्हता संताभाऊ नंबर लावासाठी! हाय का नाही आमचा झाक संत्याभाऊ जंटलमन. अन् अश्या जंटलमन संत्याभाऊंची आपल्या देशात कमी न्हाई बरं का. पोत्यानं हायेती. 'निवडणुकीच्या तोंडावर' त्यायची पैदास होतीया. 'जंटलगीरी'साठी.

      संत्याभाऊनं पाऊस चालू झाल्या झाल्या आपल्या शेतात आंब्याची झाडं लावली बरं का. अन् पुढल्याच वर्षी त्याला फळं लागणार आहेत. अहो! आश्चर्य कसलं त्यात? झाड आमच्या संत्याभाऊनं लावलंय. मोदीनं नाही!

    मोदीनं २०१४-१५ मधी जी झाडं लावली, त्याची फळं आता कुठे दिसू लागलीया. मोदीनं नोटबंदीचं झाड लावलं. त्याच फळ त्यालाच दिसलं, ज्यानं काळा पैसा दडवला व्हता. ईचारा की आपल्या आमदार साहेबास्नी? आतंकवाद्यास्नी? मोदीनं जीएसटीचं झाड लावलं. एका वर्षात करमहसुल वाढून दाखवला की. मोदीनं मेक इन इंडियाचं झाड लावलं. त्याचं फळ मिळालं की रोजगारातून. आता विमानंबी अन् पाणबुड्याबी आपल्याच देशात बनताय न्हवं? किती वेळखाऊपणा हा. त्यापेक्षा आमचा संत्याभाऊ बरा.

    जाऊद्या सायब... काय सांगाव आपण. सरकार म्हणतं संडास बांधा. संत्याभाऊनं नाही बांधला. सरकार म्हणं. आपल्या आरोग्यासाठी स्वच्छतेसाठी संडास बांधून घेतला पाहिजे. संत्याभाऊ म्हणं, आजारी पडलं तर चालीन. जनौषधी केंद्र जिंदाबाद हाय; सरकार म्हणं. आम्ही १२००० रुपये देत्यो. घे बांधून संडास. संत्याभाऊला असा काय आनंद झाला, अख्ख्या गावात 'संडास करतो' 'संडास करतो' म्हणत पळत सुटला. लोकांना काय टेंशन आलं होतं म्हणुन सांगू? बारीक भीतीचा, फायबर दरवाज्याचा अन् बिगर फरशीचा का होईना, पण...बांधला एकदाचा संडास. तो बी फकस्त ८ हजारात. वरचे ४ हजार खिश्यात भाऊच्या. आमच्या संत्याभाऊच्या संडासवर लिव्हलंय. 'दरवाजा बंद तर आजार बंद.' आरं काय सांगाव आता... संत्याभाऊनं संडासला कुलूपच ठोकलं की. अन् बायका, पोरं, म्हतारं, म्हतारी अन आपल् संत्याभाऊ समदे हागाया जाता नदीवर! असा हा जंटलमन संत्याभाऊ. त्यो म्हणतो हमीभाव निवडणुकीच्या तोंडावर दिलाय. मंग त्याच्या बोलण्यात काही तथ्य असन की न्हाई, तुमीच सांगा?

✍🏼कल्पेश गजानन जोशी
Kavesh37.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान