'नामधारी बाई...कामधारी माणुस'

'नामधारी बाई...कामधारी माणुस'

श्यामराव, या बाई कोण हो? तुमच्याच गावच्या ना?

हावं. ह्या आमच्या गावच्या अग्गोबाई! पालिका सदश्या बरं का. गेल्यायेळी निवडून आलत्या. म्या केलतं मतदान त्यायले. आमच्या घरी आलत्या. मत देजा सांगायले. त्या गेल्या अन् त्यायचा नवरा आला खाऊ घेऊनसन. खाऊ? माहित हाय ना खाऊ तुम्हाले? आरं बाबा मतदानाच्या आदल्या राती मिळतो त्यो खाऊ. काय परेम म्हणावं माणसाचं आपल्या बायकुवर. ती निवडून याया पायजे म्हणुन किती मरत व्हता त्यो. खरंच नवरा बायकुचं परेम असाव ते आसं.

असं व्हय. निवडून आल्या होत्या का मग?
हा मंग. आलत्या की निवडून. लय मोठी मिरोणूक काडली व्हती बगा. तिच्या नव-याले गाडीवरुन फिरवलं व्हतं भाऊ पु-या गावात.

नव-याला? का बरं हो श्यामराव?
हा. आता समदं जे काय कराचं ते नव-यानच केलतं न्हवं. लोकाले भेटणं. खाऊ देणं. मत मागणं. समदं समदं केलतं त्यानं. बाई फकस्त काॅलनीतच फिरली व्हती मिरोणुकीत.

असं का. मंग लोकांच्या समस्या, कामं बाईनं केली की ती पण नव-यानंच?
आता काय सांगाव भाऊ तुम्हाले. आवं हे तं समदीकडी असंच हाय न्हवं. बायका फकस्त नावाले उभ्या राहत्या निवडणुकीमधी. पण काम समदी माणसालेच करणं पडत्या. बाई कसं काय जाईन हो लोकामधी. लोक पर्तिनीधी हाये म्हणुन काय झालं. त्यात माणसाले बी आपल्या बाईवर तवढा ईस्वास पायजे. म्हणुन तं समद्या बैठकाले, कार्यक्रमाले, उदघाटनाले समदीकडं माणुसच राहतो. बाई फकस्त नामधारी हाय. फकस्त सही करापुरती.

श्यामराव,पण त्या बाईला एवढं असुरक्षित का वाटावं. लोक चांगली नाहीत काय?
नाही हो आप्पा. असुरक्षित असं काय नाय. लोक चांगली हाय बगा. पण बाईले बाहेर पाठवाले माणुसच धजत नसन. बाईले आजुक बी पुरं स्वातंत्र मिळालं नाई बगा. ते उगीच ५० टक्के आरक्षण हाय म्हणुन पक्ष्यावाल्यांले बाईमाणुस उभं कराया लागतंय. न्हाई तं बाईले कश्याले उमेदवार म्हुन उभं केलं असतं हो कोणं.

खरं आहे श्यामराव तुमचं. ही परिस्थिती काही तुमच्याच गावात नाही बर का. आमच्या गावाला सुद्धा असच चालतय. बाईचं काम फक्त सही करायचं. बाकी समदं माणुसच करतोय. याचा अर्थ बाई अडाणी हाय असं नाही बर का. पण माणुस काही अजुन मानसिक परिपक्व झाला नाही. कोणाला निवेदन देणं असो नाहीतं लोकांच्या अडचणी जाणुन घेणं असो. सगळ्या ठिकाणी बाईचा पतीच असतो.  ब-याच लोकांना तर हे पण माहित नसतं की आपला नगरसेवक हा माणुस आहे की याची बायको. कारण बाहेर त्या माणसालाच सगळा मान सम्मान मिळतो. जसं काही तोच नगरसेवक. बाईच्या नावाखाली माणुसच सगळीकडं दिसतो. सगळे निर्णयही तोच घेतो. कोणत्या पक्षात जायचं? कोणता सोडायचा? सगळंच. बाई काय माणसाच्या हातातली कठपुतळी आहे काय? हवं तसं वागवायला. तिला ना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, ना लोकांचं दु:ख यातना जाणुन घेण्याचं. ग्राम पंचायत पासुन पालिकेपर्यंत हीच परिस्थिती. ज्या कारणासाठी बाईला आरक्षण दिलं ते सपशेल फोल ठरलंय एवढं नक्की. 'बाई नामधारी' अन् 'माणुस कामधारी' अशीच परिस्थिती झालीय बघा सगळीकडे. कधी बदलन तं बदलो.

-कल्पेश गजानन जोशी
Kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान