स्वराज्य रक्षक संभाजी' व 'जळगांव मनपा निवडणुक'

------------------------------------------------
'स्वराज्य रक्षक संभाजी' व 'जळगांव मनपा निवडणुक'
                        
                           ©कल्पेश ग. जोशी
-------------------------------------------------

     'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका सध्या चांगलीच गाजतेय. या मालिकेमध्ये शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्यात टोकाचा वाद निर्माण होऊन वितुष्ट झाल्याचे दाखवले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी दक्षिण भारतातील प्रांतामध्ये दीड ते दोन वर्षासाठी रवाना झाले आहेत व स्वराज्याचे युवराज शंभुराजांना रायगड सोडून श्रुंगारपुरी सुभेदार म्हणुन पाठवले आहे. शिवाजी राजे, रायगड व शंभुराजे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याचे भासवले जात आहे. 'शिवस्वरुप बाबा' व शंभुराजे यांच्यामध्ये नियमित पत्र व्यवहार होत आहे. शिवस्वरुप बाबा हे नांव ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. पण हे बाबा म्हणजे नेमकं कोण? ते काही कुणालाच ठाऊक नाही. पण, शिवस्वरुप बाबा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. शिवाजी राजे व शंभुराजेंनी मिळून स्वराज्यरक्षणासाठी हे एक नाटक रचलं आहे. कारण, स्वराज्यात छत्रपती नाही हे समजल्यावर दिलेरखान स्वराज्यावर चालून येऊन स्वराज्याचे नुकसान करुन जाईल, हे शिवरायांना ठाऊक होते. म्हणुनच त्यांनी शंभूराजेंसोबत भांडण झाल्याचे दाखवून सगळ्यांनाच गाफिल ठेवले आहे. अगदी दिलेरखानाला सुद्धा. शिवरायांच्या अंदाजानुसार स्वराज्यावर छत्रपती नाहीत, हे कळताच दिलेरखान खरंच लाखोची फौज घेऊन खरेच चालून आला. परंतु शिवरायांच्या कुटनीतीस बळी पडला. स्वराज्यावर व शिवाजी राजांवर नाराज झालेले शंभुराजे आपणांस मिळाले, तर आपली शक्ती वाढेल व बादशहा आपणांस इनाम देईल म्हणुन दिलेरखान शंभुराजांना मैत्रीचा हात पुढे करुन शक्य तितकं आपल्या बाजुने वळविण्याचा प्रयत्न करत आहे. कधी पत्रव्यवहार तर कधी भेटीचे निमंत्रण त्याने सुरुच ठेवले आहे. पण त्यास ठाऊक नाही की शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय फत्ते करुन परतत आहे व तो शिवरायांच्या गनिमी काव्यास बळी पडला आहे.
एकंदरीत काय, तर 'सापाला पुंगी वाजवुन काठी येईतो झुलवत ठेवायचे,' असा डावपेच शिवरायांनी टाकला आहे, ज्यात दिलेरखान पुरता फसला आहे.

      जळगांवात सध्या काय राजकारण शिजत आहे? एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांच्यातील विळा भोपळ्याचे शत्रु संंबंध निर्माण झाले आहे. दोघी एकमेकांवर टिका करायची एकही संधी सोडत नाहीत. आरोपांच्या फैरीच्या फैरी झाडतात. कधी प्रत्यक्षपणे तर कधी नाव न घेता त्यांच्यात टिकाप्रहार चालूच असतो. दुसरीकडे जळगांवातील भाजपासमोरील एकमेव आव्हान सुरेशदादा जैन दोन वर्षापुर्वीच कारागृहातून जामिनावर सुटून आले आहेत. भाजपसाठी व विशेषत: खडसे व महाजन यांच्यासाठी जळगांव महापालिका निवडणुक आता प्रतिष्ठेची बनलेली आहे. राज्यात सत्ता भाजपची असल्यामुळे त्याला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. कारण, निवडणुकीत भाजपची हार झाली, तर भाजपचा प्रभाव ओसरला असा संदेश प्रसारमाध्यमातून गेल्याशिवाय राहत नाही. त्यात जळगांवला एकनाथराव खडसे व गिरिश महाजन ही भाजपची दोन मातब्बर नेते असताना पराभव होणे म्हणजे त्याचे शल्य अधिक जाणवणार व त्याचा थेट परिणाम येत्या लेकसभा व विधानसभा निवडणुकांवर होणार. म्हणुनच भाजपची ही दुकली कुटनीति करुन सुरेश जैन यांचा 'दिलेरखान' करण्याच्या बेतात असणारच.

      आपापसात भांडत रहायचे. प्रसारमाध्यमे, विरोधक व जनतेसहीत सगळ्यांनाच गाफिल ठेवायचे व योग्य वेळ येताच असा काही धक्का द्यायचा, की शत्रुची विचारक्षमताच कुंठीत झाली  पाहिजे. यामुळे शत्रुचे खच्चीकरण तर होतेच, शिवाय पश्चात्ताप करण्यातच त्याचा बराचसा वेळ निघुन जातो व अंतत: आपला विजय झाल्याखेरीज राहत नाही. असाच काहीसा डावपेच एकनाथराव व गिरीश महाजनांनी टाकला असावा. कारण, एकमेकांवर आरोप व टिका करण्या पलिकडे गेल्या दोन-तीन वर्षात दोघांमध्ये गंभीर असे काही घडले नाही. आपापल्या समर्थकांतील वाद, निषेध, आंदोलन या तश्या क्षुल्लक पण नियोजनाचा भाग असलेल्याच घटना. आजवर गिरीश महाजनांच्या आरोपामुळे खडसेंवर कोणतीही फौजदारी कार्यवाही झाली नाही की, खडसेंच्या आरोपामुळे गिरीश महाजनांना अटक झालेली नाही.
त्यामुळे 'मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर' असाच हा प्रकार आहे.

     जळगांव महापालिका निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना कोण मुर्ख आपल्यातच वाद घालत बसेल? त्यात जळगांव महापालिका निवडणुक या दोनही नेत्यांचं राजकिय भवितव्य ठरवणारी आहे. गिरीश महाजनांकडे आज राज्याचे मंत्रीपद आहे व खडसेंकडे राजकिय ताकद व अनुभव दोन्ही पुरेपूर आहेत. त्यातच त्यांची लढाई जळगांवचे लोकप्रीय असलेल्या खाविआचे सर्वेसर्वा सुरेश जैन यांच्यासोबत. कारण, जळगांवात मूळ प्रतिस्पर्धी भाजप व खाविआच आहे. मनसे आपल्या १२ नगरसेवकांसह खाविआत सामील झाली आहे. तेव्हा सुरेश जैन यांना रोखायचे असेल तर त्यांना युती करण्यासंबंधी झुलवत ठेवायचे व निवडणुक तोंडावर आली की गाजर पुढे करायचे, असा कुटील डाव खडसे व महाजन यांचा असू शकतो.

      गिरीश महाजनांनी तशी आपली भूमिका चांगली पार पाडली आहे. अगदी सुरुवातीपासुनच त्यांनी सुरेश जैन यांच्यासोबत युतीचा आग्रह धरला आहे. यासाठी दोघे मुख्यमंत्र्यांपर्यंतही पोहचले. मुख्यमंत्र्यांनीही शिताफीने युतीस अंधूक हिरवा कंदिल दाखवला. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे होकारही दर्शवला नाही व नकारही दाखविला नाही. याचा अर्थ साफ होता. त्यांना सुरेश जैन यांना टोलवत ठेवायचे होते. त्यातच सप्टेबर मध्ये निवडणुका होतील, अशी सर्वांना आशा असताना त्या एकदम १ आॅगस्टवर येऊन ठेपल्या (किंवा ठेपवल्या). याचा तोटा नेमका कुणाला होईल? किंवा ही तारीख कुणासाठी फायदेशीर ठरेल? हे वेळच ठरवेल. परंतु निवडणुकीची तारीख लवकर आल्यामुळे ती भाजपच्या पथ्यावरच पडू शकते.

     प्रसार माध्यमांत जरी सुरेश जैन यांना वरचढ दाखवले जात असले, तरी निवडणुक इतक्या जवळ आली असताना आपापसात वाद करत बसण्याइतकी भाजपा खूळी नाही. तसा प्रत्यय एकनाथराव खडसेंच्या एका इशारापुर्तीने आणून दिला आहे. कारण काही दिवसापूर्वी खडसेंनी जळगांव मनपाचे आजी माजी शंभर नगरसेवक कारागृहात जातील असा गौप्यस्फोट केला होता. तो आता खरा ठरताना दिसत आहे. जळगांव महापालिका घोटाळा प्रकरणी शंभर जणांवरील चौकशी पुर्ण होत आल्याचे सांगत पुढील कार्यवाही लवकरच होईल, असे सरकारी वकिलांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपाच्या एकनाथराव खडसे व गिरीश महाजनांना दुबळे ठरवून प्रसारमाध्यमे व राजकिय विश्लेषक त्यांना चुकीच्या तराजूत मोजत आहे, हे लक्षात घ्यावे. भाजपासाठी सध्या वातावरण पूरक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या सुरेश भोळेंनी खाविआच्या सुरेश जैन यांना जोरदार मात दिली होती. त्यातच सुरेश जैन जामिनावर सुटून आलेले असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेवरील ते काळे ढग साचलेले आहेतच. विरोधक त्याचा प्रचारा दरम्यान पुरेपूर वापर करतिल यात शंका नाही.

     तथापी, गिरीश महाजन आता युती होणे अशक्य असून कमी जागा मिळत असल्याचे कारण पुढे करत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतील. तसे ते संकेत देत आहेत. महाजन व खडसे यांच्यातील शत्रुत्व गळून पडून खांद्याला खांदा लावुन आपसी सहमतीने कुणी एक जण या निवडणुकांचे नेतृत्व स्विकारेल असे मान्य केले आहे. मग पुढे काय होते, ते तर वेळच ठरवेल. तूर्तास वर्षाऋतूचा आनंद घेत काय होते ते पाहुया. कारण, महाराज अजुन गडावर पोहचलेले नाहीत. दिलेरखानास सत्य उमगलेले नसून तो आपल्याच अविर्भावात मश्गूल आहे. शंभूराजे चार हजार अश्वदळ उभारुन तयार देखिल झाले आहेत. दिलेरखानास वाटते की शंभूराजांनी स्वराज्यावर चालून जाण्यासाठीच अश्वदळाची उभारणी केली आहे. शिवस्वरुप बाबांचे आशीर्वाद शंभूराजांच्या पाठिशी आहेच. शिवाजी राजे इतक्यात परतणार नाही, म्हणुन दिलेरखानही गाफिल आहे. तेव्हा जळगांवचा गड कोण काबीज करतं ते औत्सुक्याचे ठरेल!

✍🏼कल्पेश गजानन जोशी
Kavesh37.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान