फुले मार्केटवरील संकट
'फुले मार्केटवर समस्यांची टांगती तलवार कायम'
कापड मार्केट म्हणुन ओळख असलेल्या जळगांवच्या फुले मार्केटमधील समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालल्या आहेत. मार्केटमध्ये दिवसभरात हजारो ग्राहकांची रेलचेल असते. अश्या परिस्थितीत नागरीकांना दररोज वाहतुक कोंडी, कच-याच्या अव्यवस्थापनामुळे होणारी अस्वच्छता व पार्किंगसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच रिक्षा चालकांची अरेरावी नागरिकांना सोसावी लागते. रिक्षाचालक मेनगेटसमोरच रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे पादचारी व दुचाकी वाहन धारकांना वाहतुककोंडीचा त्रास होतो. हातगाडीवाले रस्त्याच्या कडेलाच आपल्या हातगाड्या उभ्या करतात. त्यामुळे नागरिकांना व वाहन धारकांना रस्त्याने चालताना अडचणी येतात. मनपाने अनेकदा अश्या अतिक्रमण करणा-या व अनधिकृत हातगाडीवाल्यांविरोधात व अतिक्रमण हटविण्यासाठी मोहिमा राबवल्या. परंतु पुन्हा पुर्वीसारखीच परिस्थिती निर्माण होते. अतिक्रमणाची समस्या इतकी गंभीर झाली आहे की काही गाळेधारकांनी अक्षरश: शौचालयाच्या जागी गाळे तयार केले होते. काही महिन्यांपुर्वी महापौर ललित कोल्हे यांनी केलेल्या पाहणीत हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यावरुन फुले मार्केटमील समस्या कोणत्या थराला पोहचल्या आहेत हे लक्षात येते.
मार्केटमधील समस्यांचे निराकरण करण्यासाठी मनपा हातावर हात ठेऊन आहे असे नाही. मनपाने ब-याचदा विविध उपाय व मोहिमा आखल्या परंतु या समस्यांवर कायमस्वरुपी तोडगा काही निघु शकलेला नाही. फुले मार्केटमधील गाळेधारकांनी महापालिकेत येवून मालमत्ताकर भरण्यासाठी मार्केटमध्ये स्टॉल उपलब्ध करून द्या अशी मागणी उपायुक्त डॉ. लक्ष्मिकांत कहार यांच्याकडे केली होती. त्यानुसार दोन स्टाॅल फुले मार्केटमध्ये उभे करण्यात आले होते.
वाहनकोंडी व अतिक्रमण शिवाय अस्वच्छता व प्रदुषणाच्या समस्याही आता फुले मार्केटमध्ये उत्पन्न होऊ लागल्या आहे. लोडशेडींग असताना किंवा वीज खंडीत असताना फुले मार्केटमधील दुकानदार जनरेटर्स सुरु करतात. मोठमोठी दुकाने असलेल्या बहुतेक जणांनी जनरेटरची व्यवस्था केली आहे. त्यामुळे वातावरणातील कार्बन डायाॅक्साईडच्या प्रमाणात वाढ होत आहे. कचरा गोळा करण्यासाठी अपु-या सुविधा असल्यामुळे मार्केटमध्ये जागोजागी कचरा साचलेला दिसुन येतो. या सगळ्या गैरसोयींचा नागरिकांना सामना करावा लागतोय. काही दिवसापुर्वी फुले मार्केटमधील एका दुकानास आग लागली होती. सुदैवाने आगीवर नियंत्रण मिळवण्यास लवकर यश आले. परंतु आग वेगाने पसरत होती व अग्नीशमन दलास मार्केटमधील अतिक्रमणाचा त्रास आग विझवताना होत होता. तथापी, भविष्यात अश्या प्रकारच्या समस्या आल्यास यावर त्वरीत काबू मिळवण्यासाठी प्रशासनास चांगल्या उपाय योजना कराव्या लागणार आहेत. तसेच मार्केटमधील दुकानदारांनीही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या फायर एक्स्टींगीशर यंत्रणा बाळगणे गरजेचे आहे.
नागरिकांच्या सर्वसामान्य समस्यांसोबतच फुले मार्केटमधील गाळेधारक व हातगाडीवाल्यांच्याही समस्या सुटायचे काही नाव घेत नाही. हातगाडीवाले कर/वसुली देण्यास तयार असुनही गेल्या सात - आठ महिन्यापासुन हातगाडीवाल्यांकडून करवसुली केली जात नाहिये. हातगाडीवाल्यांना अनेकदा जप्तीस सामोरे जावे लागले आहे. ईदसारखा सण समोर असल्यामुळे हाॅकर्सना हप्ताभर गाड्या लावण्यास सूट मिळाली असली तरीही, ईदनंतर पुन्हा हाॅकर्सना फुले मार्केटचे दरवाजे बंद होतील. अतिक्रमण व वाढत्या गर्दीच्या समस्येमुळे मनपाकडून ही कारवाई केली जात आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे शेकडो हाकर्सचा पोटापाण्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मार्केटमधील बहुतेक हाॅकर्स तरुण आहेत. बेरोजगारीच्या विळख्यातुन सुटून ज्यांना रोजगार मिळाला होता ते तरुण पुन्हा बेकार व्हायच्या मागावर आहेत. २५ - ३० वर्षापासुन ज्यांची दुकाने वसली होती त्यांना दोन पैसे कमविण्यासाठी आता तारेवरची कसरत करावी लागत आहे. मनपाचे जप्ती करणारी माणसे जेवणास जातात तेवढाच अर्धा एक तास धंदा होतो. म्हणुनच नागरीक, हाॅकर्स व गाळेधारकांसह संपुर्ण फुले मार्केट समस्याग्रस्त झाले आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
एकिकडे वाहतुक कोंडी, अतिक्रमण व अस्वच्छतेसारख्या समस्यांचा नागरिकांना होणारा त्रास, तर दुसरीकडे जागेअभावी हाॅकर्सवर आलेली गदा यामुळे मनपाला चांगलीच फसगत झाली आहे. नागरिकांना मुक्त व मोकळे वातावरण उपलब्ध करुन द्यावे की हाॅकर्सचा रोजीरोटीचा विचार करावा, या द्विधा मनस्थितीत सध्या मनपा सापडली आहे. परंतु जसजसा वेळ पुढे जाईल तसतश्या या समस्या वाढतच जातील. त्यामुळे मनपा प्रशासनास या सर्व समस्यांवर लवकरात लवकर कायमस्वरुपी तोडगा काढावा लागणार आहे. अन्यथा या समस्या लवकरच विक्राळ रुप धारण करतिल.
- कल्पेश ग. जोशी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा