"दुष्काळ! की शिक्षा?"

              "दुष्काळ! की शिक्षा?"


    हे काळेकुट्ट ढग भरा भरा धाऊन येतात अन पुन्हा काही क्षणात दिसेनासे होतात. हे असं का होतं? की...त्याला काही सांगायचे तर नाही ना?. रोजरोजचा हा खेळ पाहून असं वाटतंय की त्याला काही सुचवायचे आहे...या भूतलावावरील मानवाला काही तरी त्याला सांगायचे आहे. ते सांगण्यासाठी त्याच्याकडे जिव्हा नाहीत तो अबोल आहे. आज पुन्हा तेच घडतंय... श्याम विचार करीत होता.


  अगदी दोन घटका टळून गेल्या पण ना पावसाचा शिंतोडा पडला ना ऊन्हाचा सडा! आता तर चक्क तो गडगडतोय जणू वेड्यागत बडबडतोय.! आज बहुतेक काकुळतीला आला असणार तो! दोन मास उलटले तरी त्याला काय सुचवायचे आहे हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करुन अखेर नाईलाजास्तव तो बरसण्याच्याच तयारीतच होता...


    काय असेल त्या ढगांच्या मनात...? काय सांगायचं असेल त्याला?  विचार करत श्याम जास्तीत जास्त उंच अश्या टेकडीवर जाऊ लागला जेणे करुन त्या ढगाशी अतिशय जवळ जाऊन काहीतरी संपर्क साधता येईल, त्याच्याही मनाचा वेध घेता येईल. त्या डोंगरमाथ्यावर आल्यावर श्यामने त्या निश्चल पाषाणहृदयी ढगांकडे जरा क्रोधीत होऊनच पाहीले. तो जर माझ्याशी बोलता झाला तर सर्वात आधी त्याला जाब विचारायचा हे ठरवूनच तो तिथे गेला होता. वर पाहता पाहता त्याने रुक्ष ढगांवर ओरडायला सुरुवात केली, प्रश्नांचा भडीमार सुरु केला. पण हा सगळा प्रकार किती बाल्लीशपणाचा आहे हे लक्षात आल्यावर तो हताश होऊन खाली गुढग्यांवर डोकं टेकवून बसला...


तेवढ्यात... अचानक सोसाट्याचा वारा सुटला... थंडगार वायुलहरी श्यामच्या घामाळलेल्या शरीराला शितलस्पर्श करु लागल्या... वर मान करुन पाहिले तर सर्वदुर धूळीचे लोळ उठले होते, झाडांची वाळलेली पाने उंच उंच उडत जणू ढगांना गवसणी घालत होते. एकीकडे झाडांच्या पानांचा सळसळणारा आवाज, ढगांचा गडगडाट तर वीजांचा लखलखाट त्याला जणू भीती घालू पाहत होता. हे दृष्य पाहुन त्याला धडकी भरलीच आणि तो किंचीत मागे सरकला...!


नकळत त्याचं लक्ष वर ढगांत गेले आणि बघतो तर काय! त्याला ढगांच्यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या नजरेस पडू लागल्या. त्या आकृत्या भिरभिरणार्या नजरेमुळे जरा अस्पष्टच दिसत होत्या. नजर स्थिर करुन पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं... की त्यातील एक आकृती हरिणाची, सश्याची.. नाही... नाही हत्तीची... ती आकृती अजून स्पष्ट होत हरिणाचीच होती हे लक्षात आलं आणि त्या हरीणाच्या डोळ्यातून खळणारे अश्रू स्पष्ट दिसू लागले. हा सगळा प्रकार पाहून श्यामला आश्चर्याचा धक्काच बसला!!


...थोडं मनोधैर्य वाढवून तो हळूच पुटपुटला "हा...हा... काय प्रकार आहे"..? 
"ही शिक्षा आहे तुम्हा मतलबी, स्वार्थी, निर्दयी माणसाला तुमच्या पापाची तुमच्या केलेल्या कृत्याची." ती आकृती बोलत होती. 
"क..क...का..काय केलं आम्ही..?" श्यामने भीत भीत विचारलं. 
ती आकृती अजुनच जोरात रडू लागली व हुंदके देत देत बोलू लागली. "तुम्ही माणसं पार स्वार्थी आहात निर्दयी आहात. माझ्या त्या गोजीरवाण्या पाडसाप्रमाणेच कित्येक प्राण्यांचा तुम्ही बऴी घेतला आहे. तुम्ही निर्दयी आहात." ती आकृती रडत रडत आवंढा गिळत पुन्हा पुन्हा तेच तेच बोलत होती.


     श्याम मात्र प्रश्नार्थक मुद्रेत अबोल झाला. ती आकृती पुन्हा बोलू लागली. 
"एका दिवशी मी आणि माझं पाडस त्या रखरखत्या ऊन्हात पाणी शोधत होतो. खाण्यासाठी तर काही नव्हतेच पण जीवाची तृषा मिटवायला पाणी तरी मिळेल म्हणुन माझ्या पाडसासोबत पाण्याच्या शोधात निघाली. आम्ही नेहमी ज्या तळ्यावर पाणी प्यायचो त्यात पाण्याचा एक थेंबही नव्हता. पण माझ्या पाडसासाठी पाणी मिळणं फार आवश्यक होतं. असंच शोधत शोधत डोंगराच्या पायथ्याशी आम्ही आलो. तिथं असलेल्या शेतामध्ये एक घागर दिसली. त्या घागरीत पाणी दिसताच तो निरागस , तहाणेने व्याकुळ झालेला जीव पाणी पिण्यासाठी आटापिटा करु लागला आणि त्याचं तोंड कसंबसं घागरीत शिरलं. ते मनसोक्त पाणी प्यायलं पण त्याची मान मात्र त्या घागरीत अडकली व ते आता तोंड बाहेर काढण्यासाठी आटापीटा करू लागलं. तेवढ्यात मला कुणी तरी आमच्या दिशेने येत असल्याची चाहूल लागली! मी त्या दिशेनं वळून बघितलं तर तिकडून एक मणुष्य हातात दगड घेऊन आमच्या दिशेने येताना दिसला. मला त्या क्षणी काय करावे नि काय नाही काही सुचत नव्हते. मी भीतीने व ममतेने व्याकुळ झाली. तो मणुष्य कसला?  हिंस्र प्राणीच भासत होता आणि तो आता आमच्या बर्याच जवळ आला होता. माझ्या डोळ्यातुन घळाघळा अश्रु वाहू लागले. पण मी हार मानली नव्हती. काहीही करुन मला माझ्या पाडसाला तिथून सुखरुप बाहेर काढायचं होतं. मी त्या घागरीला एक जोरात धडक घातली व त्याक्षणी त्या घागरीचे तुकडे झाले व तो भली मोठी दाढी असलेला निर्मम मणुष्य रागाने अधिकच हिंस्र वाटू लागला. माझं बाळ... माझं गोड पाडस... एका संकटातून निघालं होतं पण अजुन दुसरं संकट आमच्या दिशेनं येत होतं! आम्ही तिथून निसटण्याच्या तयारीत असतानाच भिरभिर करत आलेला तो दगड माझ्या पाडसाच्या मस्तकात बसला. तो रेशमी गालीचा पांघरलेला व कोमल अश्या शरीराचा जीव घायाळ होऊन खाली कोसळला. मी त्याला खूप उठवण्याचा प्रयत्न केला पण ते तडफडत खाली पडले होते. त्याच्या नाकातून घळाघळा रक्त वाहू लागले होते ...आणि पुढच्या काही क्षणातच त्याची हालचाल थांबली. पण माझ्या ममतेने, करुणेने आणि त्या मृत पाडसाच्या काळजीने माझे पाय तेथुन हालेनात. तेवढ्यात त्या माणसाचे काही साोबती तेथे आले व त्यांनी मला हुसकाऊन लावले. त्यांच्या हल्ल्याने मीही थोडी जखमी झाले होते. आधीच तहाण त्यात जखमी अवस्था.!" एक आवंढा गिळून ती आकृती पुन्हा बोलू लागली. "मला आता माझाही मृत्यु दिसू लागला होता.! जड अंत:करणाने मी अधून मधून मागे वळुन पाहत तिथून जात होते. असे वाटे मागुन माझं ते गोजीरं पाडस उड्या मारत येईल अन मला प्रेमाने चाटू लागेल ! मलाही पुढे चालवेनात. मी एका झाडाखाली त्या शेताकडे पाहत पडून राहिली. काही वेळानंतर मी पुन्हा त्या शेतात गेली व जिथे माझ्या पाडसाने देह ठेवला होता तिथेच मीही माझ्या आयुष्याला विराम दिला.!!" असे बोलून ती हरिण ढसा ढसा रडू लागली.


     तिच्यानंतर हत्तीणीने तिची कथा सांगायला सुरुवात केली... मग सश्याने, नंतर मोराने व एकच गोंधळ झाला. श्यामलाही गहीवरुन आले व त्याच्याही डोळ्यांतून आसवं आलीच..!


मध्येच एका मोराने पुढाकार घेतला व बोलू लागला. " तुम्ही मानव आहातच असे. तुमच्या स्वार्थासाठी आणि चैनीसाठी तुम्ही आमचा जीव घेत आला आहात. डोंगर दर्या हेच आमचं घर. पण सगळीकडचे वृक्ष तोडून उजाड रान करुन ठेवलं तुम्ही."!!


"तुमच्या चैनीसाठी पिंजर्यात बंदिस्त करुन ठेवता आम्हाला" पोपट बोलला. "म्हणुनच आम्ही सार्यांनी तुमची तक्रार देवाकडे केलीय व त्याचमुळे तुम्हा मानवाला शिक्षा म्हणुन वरुण राजानं पाऊस पाडायचं थांबवलंय.!!!


"तत्क्षणी श्यामचे पाणावलेले डोळे उघडले. त्या सर्वांचं हृदयद्रावक बोलणं ऐकुन त्याच्या काळजाचं पाणीच झालं. "मी एकटा जास्त काही करू शकत नाही तुमच्यासाठी, पण एक करू शकतो." श्याम म्हणाला.
एवढं बोलून तिथून तो त्याच्या घराकडे धावत सुटला. धापा टाकत घरी पोचला.  घरातील पिंजर्यातून त्यांनी पाळलेलेे दोन पोपट बाहेर काढले व पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांच्याशी तो बोलू लागला. "मी तुम्हाला कधीपासून या पिंजर्यात बंद करुन ठेवलं त्याबद्दल माफ करा. जा ...तुम्हाला वाटेल तिथं जा... वाटेल ती फळे खा.... तुम्ही आता मुक्त  आहात. जा..." त्यांनी गगनात भरारी घेताच श्यामच्या चेहर्यावर नकळत समाधानी हसू उमललं.


तेवढ्यात ...पुन्हा वारा सुटला. वीजा चमकू लागल्या व पावसाचा एक थेंब श्यामच्या गालावर पडला. त्याची आणि ढगाची आसवं एक झाली. त्याने वर ढगाकडे बघितले. पुन्हा त्या आकृत्या दिसू लागल्या. पण यावेळी त्या समाधानी व आनंदी भासत होत्या. त्या अदृश्य झाल्या आणि त्याच दिवशी  मुसळधार पाऊस झाला..!!


तात्पर्य- स्वत:च्या चुकांचं खापर इतरांवर फोडणारा मानव फक्त दुसर्यांना दोषी ठरवत आला आहे. या दुष्काळाला...प्रदुषणाला...महागाईला व इतर नैसर्गीक आपत्तींना मानवच सर्वस्वी जबाबदार आहे. प्राणीमात्रांवर दया करुन निसर्गाचं संवर्धन आणि संगोपन व्हावं हे आपलं कर्तव्य आहे.


- कल्पेश गजानन जोशी
Kavesh37.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान