सायबर संकट!

                                                       सायबर संकट!








       काळ बदलतो तसे लढण्याचे प्रकारही बदलत जातात. फार पुर्वी मानव दगडी हत्याराचा वापर करी, त्यानंतर धातुची शस्त्रे तयार झाली. युद्धे व लढायांत तलवारसारख्या शस्त्रांचा प्रामुख्याने वापर होऊ लागला. कालांतराने दारुगोळा व बंदूकीसारखे शस्त्रास्त्रे उदयास आली. एकंदरीत काय तर काळानुरुप लढाया व शस्त्रास्त्रे रुप बदलत आहे. म्हणुनच काय ते आज सायबर युद्धाचा किंवा सायबर शस्त्राचा धोका मानवाच्या डोक्यावर आ वासुन उभा आहे. यास कोण, कधी, कुठे, कसा बळी पडेल सांगता येत नाही.

     'पाकिस्तानची संकेतस्थळं हॅक झाली' किंवा 'अमेरिकेची संकेतस्थळं हॅक झाली' अश्या बातम्या सर्वश्रुत आहेच. कधी कधी काही संकेतस्थळांवर 'व्हायरस हल्ला' झाल्याच्याही बातम्या येतात. त्यातच मोबाईल हॅकींगचे प्रकार जास्त. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशलमिडिया साईट्सही आजकाल हॅक होऊ लागल्या आहेत. या सर्वांचा विचार व्हावा तो यासाठी की, ज्याच्या हाती स्मार्टफोन आहे त्याच्या फोनमधील डेटा सुरक्षित नाही. कधी, कोण यास बळी पडेल सांगता येत नाही. हॅकींग करणा-या व्यक्ती कधी ओळखीच्या असतात तर कधी अनोळखी. काहींना डाटा चोरी करायची असते तर काहींना केवळ द्यायचा असतो मनस्ताप व पसरवायची असते दहशत. म्हणुनच चो-या करणा-यांपासुन ते दहशतवाद्यांपर्यंत सगळ्याच विद्रोही माकडांच्या हाती हॅकिंग नावाचे नवे कोलीत पडले आहे. ज्याचे परिणाम दिसु लागले आहे. जनता त्रस्त आहे. पण सरकार याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही.

     आजच एक बातमी वाचण्यात आली. "जळगावात डेबीट कार्ड क्लोन करुन गंडा; दहा महिन्यात वीस लाख उडविले."- दै. दिव्य मराठी
या प्रकरणात मॅग्नेटिक स्ट्रीप कार्ड रिडर, राऊटर, चार मोबाईल सीम कार्ड, संगणक, २० प्लास्टीक कार्ड अश्या तांत्रिक वस्तुंचा आधार घेत एका व्यक्तीने आॅनलाईन फसवणुक करुन दुस-याच्या खात्यातुन तब्बल २० लाख रुपये खर्च केले आहेत. अवघ्या काही मिनिटांसाठी हाती पडलेल्या दोन जणांचे डेबीट कार्ड क्लोन करुन या बदमाशाने आॅनलाईन पेमेंट केले. इंटरनेट व टेक्नोलाॅजी जगतासाठी ही धक्कादायक बातमी आहे. याचे गांभीर्य ओळखता आले पाहिजे. एवढेच काय तर ही एकमेव व्यक्ती नसुन यामागे आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय पोलीसांनी वर्तवला आहे. यावरुन या प्रकरणाचे गांभीर्य येते. यासारखे आॅनलाईन चोरटे देशभरात पसरले आहे व त्यांचे नित्य उपदव्याप चालू आहेत याचा कुणास सुगावाही नाही.

       केवळ पैश्याच्या स्वरुपातच चोरी करण्यासाठी या टोळी सज्ज आहेत असे नाही. काही टोळकी सोशल मिडियावरही सक्रिय आहेत. फेसबुकवरील अनेक अकाऊंट्स फेक असतात. काही अकाऊंट्स व फेसबुक पेज तसेच, गृप्स अनोळखी विदेशी व्यक्ती नियंत्रित करत आहेत. याचा भारतीयांना सुगावाही नाही. व्हाट्सअप व ट्विटरचीही तीच गत आहे. व्हाट्सअप युजर्सना आकर्षित करेल अश्या पोस्ट, लिंक, मॅसेजेस, चित्रे सर्वत्र पसरली आहेत. ज्यावर साध्या एका क्लिकमुळे आपला डेटा चोरी जाऊ शकतो. त्यातच आॅनलाईन व्यवहार करणा-यांसाठी हा धोका अधिक भयंकर.

     नुकतीच व्हाट्सअपवर एक गृप ईन्वाईट लिंक फिरत आहे. ज्यात ब्राम्हण व कोळी समाजातील व्यक्तींना जिल्हानिहाय गृपमध्ये जाॅईन होण्याचे आवाहन केले जात आहे. यात औरंगाबाद, जळगाव, उपनगर, भंडारा, पुणे, नागपुर, जालना, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. परंतु ही लिंक कोणी तयार केली हे कुणालाच ठाऊक नाही. शिवाय एकाच व्यक्तीने ही सर्व लिंक व गृप तयार केले आहेत. सदर गृपमध्ये अश्लीलतेचा कळस झाला आहे. यामागचे सुत्रधार कोण आहेत हे लवकरच समोर आले पाहिजे. अजुनही कुणालाही हा धोका माहित नसल्याने काहीही शहानिशा न करता लोक गृप जाॅईन करत आहेत. आज ब्राम्हण व कोळी समाजास टार्गेट केले जात आहे. पण, उद्या या जागी कोणीही असु शकेल. हे केवळ एक उदाहरण. परंतु अश्याच प्रकारचे अनेक प्रयोग सायबर चोरट्यांकडून केले जात आहेत. त्यामुळे सोशलमिडियावर वावरणा-यांनी वेळीच सावध झालेले बरे.

     अश्या प्रकारचे गुन्हे होतात व होत राहतात याचे कारण काय असावे? आमचे एक मित्र सायबर सेक्युरीटीचे काम करतात. त्यांच्या माहितीनुसार आपल्या देशात सायबर सुरक्षेसाठी आवश्यक असणारी 'कंट्री फायरवाॅल' ही यंत्रणाच नाही. ज्यामुळे सायबर गुन्हेगारांना मोकळे रान मिळत आहे. शिवाय सरकारी अधिका-यांचे दुर्लक्षही यास कारणीभूत आहे. तथापी, महाराष्ट्र शासनाने सायबर गुन्हेगारीविरोधात लढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यास्थानी सायबर सुरक्षा यंत्रणा व कार्यालय उभारण्यास सुरुवात केली आहे, ती प्रशंसनीय ठरते. तरीही अजुन प्रभावीपणे  सायबर गुन्हेगारांशी लढण्यासाठी सरकारी व पोलीस यंत्रणेस तांत्रिकदृष्ट्या अधिक सुसज्ज रहावे लागेल. तरच सायबर गुन्ह्यांवर आळा बसु शकेल. सरकार या सर्व प्रकरणांची दखल घेऊन लवकर काहीतरी उपाय करेल अशी आशा आहे. तुर्तास जनतेने सतर्क राहणे जास्त महत्वाचे.

✍कल्पेश गजानन जोशी
     Kavesh37.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान