छिंदम ते कोकाटे व्हाया संघ?

         छिंदम ते कोकाटे व्हाया संघ?

     काही दिवसांपुर्वी छिंदम नावाच्या व्यक्तीने शिवरायांविषयी अपशब्द वापरुन त्यांचा अवमान केला. त्याचे निश्चितच क्रोधयुक्त दु:ख आहे. परंतु सोशल मिडीयावर छिंदमचा संघाच्या गणवेशातील फोटो व्हायरल झाला व संघविरोधकांनी सर्वदूर छिंदमसोबत संघावरही टिका करण्यास सुरुवात केली. संघावर टिका करण्यास एक शस्त्र या मंडळींना चांगले मिळाले होते. शक्य तितक्या ताकदीने त्यांनी ते सोशल मिडियावर फिरविले. परंतु त्याचे अपेक्षित फळ स्वत:च्या गोटातील मेंढरांव्यतिरिक्त इतर लोकांकडून बिचा-यांना काही मिळाले नाही. कारण, साफ होतं. छिंदम काही संघाचा स्वयंसेवक नव्हता. काँग्रेसमधून भाजपामध्ये आल्यानंतर संघाच्या गणवेशात उभं राहुन फोटो काढायची हौस छिंदम साहेबांना राहवली गेली नसावी. परंतु, छिंदम संघाच्या एका कार्यक्रमात उपस्थित राहिला म्हणुन तो संघाचा स्वयंसेवक झाला असेही नाही. बरं एक दिवस संघात आलेला छिंदमसारखा स्वयंसेवक एवढा शिवद्रोही असेल, तर संपुर्ण आयुष्य संघासाठी देणारे लाखो स्वयंसेवक किती शिवद्रोही असावयास हवे?? पण प्रत्यक्षात तसे आहे काय? संघाचा तर एकही कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या पुजनाशिवाय होत नाही. हेच सर्वसामान्य माणसाच्या विवेकबुद्धीला पटले होते. म्हणुनच विरोधकांना छिंदमचे पाहिजे तितके भांडवल करता आले नाही. पण ज्यांच्याकडचा विवेक गहाण आहे अश्या लोकांचं काय करावं? श्रीमंत कोकाटेंनी सोशल मिडियावरील छिंदमचा संघाच्या गणवेशातील फोटो पाहिला आणि त्यांचा आनंद बोकाळलाच. साहेबांना आयतंच कोलीत मिळालं की हो संघाला झोडायला. म्हणुन साहेबांनी नेहमी प्रमाणे आपल्या विकृत लिखाणाचा परिचय तर दिलाच, पण त्यांची वाचन-आकलन क्षमता पंगु असल्याचे सिद्धही करुन बसले.

    श्रीमंतांनी संघावर टिका करताना छिंदमच्या गणवेशातील फोटोचा सहारा घेतला आणि संघ कसा शिवाजी महाराजांचा विरोधी आहे येथपासुन ते संघ महिलाविरोधी आहे इथपर्यंत हास्यास्पद लिखाण केले. कोकाटे साहेबांना लोक विद्रोही साहित्यीक समजतात, पण खरं तर ते विनोदी साहित्यीक असावे असे वाटुन गेले. असो... पण साहेबांनी सोशल मिडीयावरील छिंदमच्या फोटोचे दाखले देऊन संघावर निशाणा साधला. मग याच तत्वानुसार 'तरुणीला विकायला निघालेली चौकडी गजाआड' ह्या एबीपी माझाच्या बातमीचा स्क्रिनशाॅटही सोशल मिडीयावर व्हायरल झालाय. ज्यात तीन व्यक्तींसह संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष अटकेत असल्याचा उल्लेख केला गेला आहे. तसेच जामखेडच्या घटनेची एक बातमी फिरत आहे. ज्यात जामखेडच्या एका व्यापा-यास खंडणीची मागणी करणा-यांमध्ये संभाजी ब्रिगेडच्या आजी माजी पदाधिका-यांचा समावेश असल्याचे म्हंटले आहे. वगैरे वगैरे. एवढ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिका-यांचा समावेश असेल तर ही संघटना त्यांच्या कार्यकर्त्यांवर काय संस्कार करते ते लक्षात येते. जे लोक तरुणीला विकण्याचा प्रयत्न करतात ते कोणत्या थराला जात असतिल याचा विचार न केलेलाच बरा. दस्तरखुद्ध मराठा सेवा संघ संस्थापक युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकरांनी महिलांविषयी गलिच्छ, अश्लाघ्य, अश्लील पुस्तक लिहिल्यामुळे त्यांना मा. न्यायालयासमोर दोन वर्षापुर्वी महिलांची माफी मागायला लागली होती हे तर शंभर टक्के सत्य आहेच. तेव्हा अधिक स्पष्ट करुन काय सांगणे? म.से.संघ व संभाजी ब्रिगेडच्या कारस्थानांचे दाखले देण्याचे कारण एवढेच की दुसर्यांना स्त्रीसन्मान व सदगुणांचे धडे देणारे श्रीमंत कोकाटे यांचे म.से.संघ व संभाजी ब्रिगेडसोबत घनिष्ठ संबंध आहेत. नव्हे नव्हे तर ते त्यांचे मार्गदर्शकच आहेत. तेव्हा इतरांना सदगुणांचे शिक्षण देण्यापेक्षा आपले गुण दोष पहावे. शिवरायांच्या व महात्मा फुलेंच्या संस्काराची कमी कुणामध्ये आहे तेही कळेल. एखाद्या अबला स्त्रीची विक्री करण्याची घटना शिवाजी महाराजांच्या राज्यात झाली असती तर त्या व्यक्तीचे हातपाय तोडून टकमक टोकावरुन फेकुन दिले असते. अश्या लोकांनी शिवरायांचे नाव आपल्या तोंडी घेऊन त्या महापुरुषाची बदनामी तरी करु नये.

     संघावर आरोप करता करता श्रीमंत नेहमी प्रमाणे सावरकरांवर उतरले. अर्थात सावरकर हिंदूधर्माभिमानी आहेत व ब्राम्हण आहेत म्हणुन. काय तर म्हणे सावरकरांनी "शिवाजी हा काकतालीय न्यायाने झालेला राजा होता" असे म्हंटले होते. सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या ग्रंथात हे वाक्य आहे. पण ते असे नाही. सावरकरांचे वाक्य जसेच्या तसे, "दैवाने म्हणा, देवाची ईच्छा म्हणुन म्हणा, काकतालीय न्यायाने म्हणा किंवा पेटलेल्या प्रयत्नांचे अेकसमयावच्छेदेकरुन बहरुन वर आलेले पीक म्हणुन म्हणा पण, जिजामातेच्या गृहगणातील शिवाजीच्या या जन्मापासुन अेक आश्चर्यकारक परिवर्तन हिंदू- मुसलमानांच्या युद्धसंघर्षातील राष्ट्रीय रणांगणात घडून आले." एवढे लांबलचक व अर्थपुर्ण वाक्य श्रीमंतांकडून वाचले जाणे शक्य नसावे. मुळात त्यांची आकलनक्षमता कमी. म्हणुन त्यांच्या लक्षात केवळ सुरुवातच राहिली. ज्याचा अर्थही त्यांना समजला नसावा. याच वाक्याचे स्पष्टीकरण सावरकर सांगतात, की शिवाजी महाराजांच्या जन्मापुर्वी हिंदू राजे जेव्हा जेव्हा परकियांशी व विशेषत: मुसलमानांशी लढत असत, तेव्हा काही ना काही कारणाने पराभव व्हायचा तो हिंदूंचाच. हिंदूंचा पराजय व मुसलमानांचा विजय हे जणु सुत्रच होऊन बसले होते. परंतु शिवाजी राजांच्या जन्मानंतर हिंदूंचे जणु भाग्यच बदलले. मग ती देवाची इच्छा म्हणा किंवा शिवाजी राजांचा जन्म व हिंदूंचे भाग्य बदलण्याचा समय एक झाला असे समजा. सावरकर याचे कारणही पुढे स्पष्ट करतात की, हिंदूराष्ट्राचे नेतृत्व मराठ्यांनी स्विकारल्यापासुन शत्रुवर सैनिकी आक्रमण करणे हे अश्लाघ्य व धर्मविरोधी आहे ही सदगुणविकृती मराठ्यांनी लाथाडली व आपल्या धाडसी मनाने हिंदू मनाची सुटका केली." तेव्हा शिवाजी राजांविषयी ज्वलंत अभिमान असणारे सावरकर महाराजांविषयी घृणास्पद कसे काय बोलतील? श्रीमंत कोकाटेंचा हा आरोप त्यांचा बाल्लीशपणा सिद्ध करतो. स्वा. सावरकरांचे हिंदू धर्माभिमानी ग्रंथ वाचुन हिंदू देव-देश-धर्मासाठी तन-मन-धनपुर्वक कटिबद्ध होतो हेच बहुधा श्रीमंतांना आवडत नसावे.

     श्रीमंतांची आकलनशक्ती कमजोर असल्याचा अजुन एक दाखला. ज्या बाबासाहेब पुरंदरेंनी संपुर्ण आयुष्य शिवरायांच्या गडकोटावर घातले व इतिहासाचा अभ्यास करुन पहिले शिवचरित्र रचले. ज्यांचा गेल्या ५० वर्षातील एकही दिवस असा नाही की त्यांनी एखाद्या दिवशी गडकोटाचा किंवा शिवकालीन इतिहासाबद्दल अध्ययन केले नसेल. अश्या शिवशाहिरांवर श्रीमंत व त्यांची चाकर मंडळी आरोप करतात की बाबासाहेबांनी शिवाजी व जिजाऊंचा अपमान केला. काय तर म्हणे त्यांच्या शिवचरित्रामध्ये "दादोजी, शिवाजी व जिजाऊ यांचे कुळगोत्र एक होते" असा उल्लेख होता. परंतु हे वाक्य मुळात अपुर्ण आहे. इतके घाणेरडे आरोप करताना निदान सह्याद्री नावाचे गोत्र अस्तित्वात आहे की नाही याचा तरी अभ्यास करावा की नाही? शिवचरित्रामधील जुन्या आवृत्तींमध्ये "दादोजी, शिवाजी व जिजाऊ यांचे गोत्र एकच होते - ते म्हणजे सह्याद्री" असे ते मुळ वाक्य होते. अर्थात या तिघांचे ध्येय 'सह्याद्री' होते असा त्याचा अर्थ होतो. ज्या प्रमाणे शिवप्रेमी व शंभूप्रेमी संभाजी राजांना 'शिवाजीचा छावा' अशी उपमा देतात. इथे शब्दश: अर्थ घ्यायचा नसतो. छावा हे गुणविशेषण म्हणुन वापरलेले असते. असे मराठी व्याकरण आहे. सिंहाचा छावा जसा निडर व शक्तीशाली असतो तसे शंभुराजे होते असा त्या मागचा मतितार्थ असतो. मग इथे शिवाजी-संभाजीचा अपमान केला असे म्हणायचे नसते. त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेले व वाढलेले असल्यामुळे आणि सह्याद्रीच्या द-याखो-यात आपले स्वराज्य स्थापन केल्यामुळे व सतत सह्याद्रीवर राज्य करण्याचे स्वप्न असलेल्या शिवाजी, दादोजी व जिजाऊंचे गोत्र एकच आहे ते म्हणजे 'सह्याद्री' असे ते अलंकारीक वाक्य असते. म्हणुन श्रीमंतांच्या आकलन क्षमतेवर वारंवार शंका येते. तेव्हा बाबासाहेब पुरंदरेंच्या वाक्याच्या अर्थाचा गैरअर्थ काढून शिवाजी राजांची व जिजाऊ माँसाहेबांची बदनामी संबंध देशभर कुणी केली हे आपणच ठरवावे.

     श्रीमंतांनी इतर हिंदूत्व अभिमानी लेखक असोत किंवा व्याख्याते असोत त्यांच्या वाक्यांची याचप्रकारे मोडतोड करुन बदनामी केली आहे. योगेश उपासनींवर टिका करताना तोच वाक्य मोडतोडीचा कार्यक्रम केलेला आहे. साहेब वेद-पुराणावरही अशीच टिका करतात. परंतु ज्यांना मराठीत लिहिलेल्या साहित्याचे आकलन होत नाही त्यांना संस्कृतमध्ये लिहिलेले वेद कितपत समजतिल? म्हणुनच त्यांची वेदांवरील टिका निरर्थक आहे यात शंकाच नाही. तेव्हा श्रीमंत कोकाटे साहेबांनी छिंदमच्या नावे सोडलेला वैचारिक बाण संघ, सावरकर, बाबासाहेब पुरंदरे, उपासनी, भट-ब्राम्हण, वेद-पुराण मार्गे त्यांच्याच कंठासमोर येऊन उभा आहे असेच म्हणावे लागेल.

कल्पेश ग. जोशी
Kavesh37.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान