भारताच्या इतिहासातील स्त्रीयांचे स्थान!

*भारताच्या इतिहासातील स्त्रीयांचे स्थान!*

    विचारांची उदात्तता सिध्द करण्याच्या प्रयत्नात अनेकदा भारतिय संस्कृतीवर टिकेची झोड उठवली जाते. पण भारताच्या इतिहासात स्त्रियांवर अन्याय अत्याचारच तेवढे झाले असे नाही. स्त्रियांचा आणि स्त्रित्वाचा सन्मानदेखिल आपल्या पवित्र भारतभुमीत झालेला आहे. स्त्रियांच्या दुर्बलतेमुळे आणि त्यांच्या सुरक्षेच्या कारणामुळे पुरुषप्रधान संस्कृती झालीही असेल. पण स्त्री तेव्हाही ज्ञानसंपन्न होती असं आपण म्हणु शकतो. आजच्या घडीला स्त्रिसंरक्षणासाठी कायदे कानुन आहेत, पोलीस यंत्रणा आहेत, अपराध्याला योग्य ती शिक्षा होण्यासाठी न्यायालये आहेत आणि जनजागृतीसाठी नाना प्रकारचे विचारवंत देखिल आहेत. तरीही एक दिवस असा नाही ज्या दिवशी स्त्रीवर अन्याय अत्याचार झाला नसेल. रोज कुठे ना कुठे हे घडतच असतं. पण भारताच्या इतिहासातील स्त्री सामर्थ्यवान होती. स्वसंरक्षणही तिला करता येत होते. शक्तीने नाही तर विद्येने. ब्रम्हज्ञानाने.

    भारतीय संस्कृतीतला अतिप्राचिन महान ग्रंथ म्हणजे ऋग्वेद. जे ऋग्वेदाने मान्य केले ते इतर वेदांनीही मान्य केले असे मानले जाते. ऋग्वेदामध्ये एकुण दहा मंडले आहेत आणि १०२८ सुक्ते. ही सर्व सुक्ते कुणी एका व्यक्तीने लिहिलेली नाहीत. तब्बल ३९० ऋषींच्या प्रयत्नातुन ती साकार झाली. या ३९० ऋषींपैकी '२१ स्त्रीया' होत्या! आणि इतकेच काय तर ४७ ऋषी ब्राम्हणनेतर होते! म्हणजे शिक्षणाचा अधिकार फक्त ब्राम्हणांना होता हा समज किती खुळा आहे हेही लक्षात येते. उपनिषदांमध्येही अनेक ब्रम्हवेत्त्या गृहस्थांचे, बालकांचे, राजांचे आणि गाडीवान रैक्वासारख्या व्यक्तींचेही वर्णन आहे. वेदसंहितांच्या अवतरणांच्या काळात अपाला, उशिज, ममता, विश्वतारा, घोषकाक्षिवती अश्या अनेक  स्त्रिया ब्रम्हतेजाने तळपत होत्या. अनेक विदुषीही होत्या ज्या त्यांच्या अतुल्य ज्ञानभांडाराच्या जोरावर मोठमोठ्या विद्वानांशी वादविवाद करत होत्या. त्यामध्ये वाचनवी, गार्गी आदींचा समावेश होता. याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयीलादेखिल भौतिक सुखाची अपेक्षा नव्हती तर तिने ज्ञानामृताची अभिलाषा मनात बाळगली होती. स्वत:च्या पतीकडून तिने ज्ञानसंपादन केले. ऋग्वेद व उपनिषदांच्या निर्मितीत हे चित्र आहे तर इतर वेद व ग्रंथांच्या बाबतीतही असेच सत्य लपलेले असेल.

     काळाच्या ओघात मुळ भारतीय संस्कृतीत अनिष्ट रुढी परंपरा किंवा प्रथा सुरु झाल्याही असतिल परंतु स्त्रियांवर आजच्या सारखे अत्याचार कुठेही दिसत नाही. पुत्र नाही तर कुळाचा गौरव वाढवणारी कन्या जन्माला यावी म्हणुन प्रार्थना करणारा सावित्रीचा पिता आजच्या मनोविकृत समाजासाठी आदर्शच ठरेल. रावण हा दानव होता. त्याची प्रवृत्ती मुळात राक्षसी होती. पण सितामाईंचं हरण केलं असतानाही त्याने सितामाईंसोबत कोणताच दुर्व्यवहार केला नाही. त्या काळातले राक्षसांनाही विवेक होता का काय कोण जाणे? आताच्या माणसात विवेक सापडणं महत् आश्चर्य! तरीही तोंड वर करुन सांगतात की भारतिय संस्कृती कशी वाईट होती. किती हास्यास्पद बाब आहे नाही? इ.स.पु. २३० ते इ.स.२३० या जवळजवळ ४६० वर्षांच्या कालखंडात भारतात एक संस्कृती अस्तित्वात होती. तिचं नाव 'सातवाहन संस्कृती'. महाराष्ट्राचा आणि मराठ्यांचा इतिहास ख-या अर्थाने सुरु होतो तो इथुनच. या संस्कृतीमध्ये २३वा जो राजा झाला झाला त्याचं नाव होतं 'सातकर्णी'. परंतु या महान संस्कृतीत मातेला अतिमहत्वाचं स्थान होतं. ते स्वत:च्या नावापूर्वी आईचं नाव लावत असत. म्हणुन सातकर्णी राजाला "गौतमीपुत्र सातकर्णी" असेच संबोधले जायचे. आपण जितका जास्त अभ्यास करु तितकीच आपली भारतीय संस्कृती किती महान होती व आहे हे आपल्या लक्षात येते. आजच्या प्रत्येक स्त्रीमध्ये मैत्रेयीचा वास आहे. त्यांना गरज आहे ती याज्ञवल्क्य ऋषींची. एवढे झाले म्हणजे भारतिय स्त्री माॅडर्नही होईल आणि सुसंस्कृतसुध्दा !

   'त्यावेळी काॅन्वेंट स्कुल नव्हते, इंग्रजाळलेले विचार नव्हते, माॅडर्नायजेशन आणि वेस्टर्नायझेशन या भानगडी नव्हत्या, ती पिढी सुशिक्षित नसेल पण ती पिढी 'सुसंस्कृत' होती. घरात जन्मदात्या आईला खूप काही स्वातंत्र्य नव्हते पण त्या मातेला नमस्कार केल्याशिवाय दिवसाची सुरुवात करायची नाही ही शिकवण खूप महत्वाची होती. हा स्त्रिचा आदरच नव्हता काय? मुलींना घरापासुन दूर जाऊ दिले जात नव्हते. शिक्षणाचा आग्रह मुलांच्या तुलनेत कमी होता. पण तिच्या आशीर्वादात आणि तिने भावाला बांधलेल्या धाग्यात एवढी ताकद आहे की तो धागा त्याचं रक्षण करु शकेल अशी भावना होती. त्याची प्रचिती आजही रक्षाबंधन आणि भाऊबीजला आपणांस येते. हा स्त्रिचा सन्मान नसतो का? भावाच्या रक्षणासाठी प्रार्थना करताना घराघरात, गल्लोगल्ली बहिणी दिसतात. पण, बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेताना किती भाऊ दिसतात? "काॅलेजला जाताना नको लावू 'स्कार्फ'. जा निर्भिडपणे!" असं सांगताना किती भाऊ दिसतात? उलटपक्षी "जाताना चेह-याला स्कार्फ बांधून जा. नसती आफत नको" असे सांगणारेच भित्रे भाऊ खूप दिसतात! यामागे कुठेतरी भीती दडलेली असते. आणि या भीतीचं मुळ सुरक्षितता असते. आपल्या उच्च सरणीने स्त्रियांना मुक्तता दिली, स्वातंत्र्य दिले, स्त्री शिक्षणासाठी जागृती झाली पण पुरुषी विचार मात्र तसेच राहिले. स्त्रीसंरक्षणाची जबाबदारी नाही घेतली. म्हणुनच आज स्त्रीयांना लाठीकाठी व  स्वसंरक्षणाचे धडे देण्यापेक्षा पुरुषांमध्ये स्त्रिबद्दल आदर व सन्मान निर्माण होण्याची जास्त गरज आहे.

#...सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..#

© कल्पेश गजानन जोशी
    Kavesh37.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान