देव दोषक व विज्ञान शोधक

*आस्तिकता, नास्तिकता, दैव, अध्यात्म आणि विज्ञान या विषयावर सहज केलेले चिंतन :*

देव आहे की नाही? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सामान्य माणसापासुन ते ऋषी महात्म्यांपर्यंत असं कोणी सापडणार नाही की त्याला हा प्रश्न सतावत नसेल. एवढंच काय तर वैज्ञानिक सुद्धा विज्ञानमार्गे दैवापर्यंत पोहचण्याचा अटोकाट प्रयत्न करत आहे. बिगबँग व गाॅड पार्टीकल हे त्याचेच उदाहरण. प्रयत्नशिल व्यक्तींच्या हाती काही साध्य जरुर होऊ शकेल पण 'आस्तीकत्व' व 'नास्तिकत्व' या मुद्द्यांच्या बाजुने
लढणा-या वकिलांचं करावं काय? कोणीही दूधखुळा येतो नि तोंडात येईल ते प्रश्न आस्तिकतेवर ओढण्याचा तडाखा लावतो.

'दिसेल तेच खरे' असे माणुन चालायला लागलो तर मग फक्त दैव किंवा आस्तिकतेवरच आसुड का ओढायचे? देव दिसत नाही म्हणुन त्याला टाळायचं आणि मग आपल्या शरीरातील आणि ब्रम्हांडातील अश्या असंख्य गोष्टी आहेत ज्या दिसतच नाहीत. त्यातील काहींचं अस्तित्व अजुनपर्यंत मिळालेलं नाही. मग तरीही विज्ञान सांगतं म्हणुन आपण त्यावर विश्वास ठेवतोच ना? ब्रम्हांडातील तर ब-याच गोष्टींचा आता कुठे उलगडा होऊ लागलाय पण हजारो वर्षापूर्वी कुठली दूर्बीण होती नि कुठल्या होत्या प्रयोगशाळा? पण वैदिक कालगणना असो व वैदिक खगोलशास्त्र. ज्यामध्ये या गोष्टींचा उल्लेख तेव्हापासुन आहे, जे वैदिक ऋषीं मुनींनी तयार केले होते तेही संगणक, दुर्बीण, सॅटेलाईटच्या मदतीविना! उदाहरण द्यायचेच झाले तर आज जे ग्रह (मंगळ, बुध, गुरु, शनि, ध्रुवतारा) तारे वैज्ञानिकांनी शोधुन काढले ते कुठल्याही सोयीसुविधाविना आपल्या वैदिक ऋषीमुनींनी गृहीत धरुन अध्ययन केले व ग्रंथही लिहिले. त्यातील काही गृहितके किंवा संकल्पना विज्ञानाने वेगळ्या स्वरुपात मांडल्या असतिल किंवा काही खोट्या ठरल्या असतिल (उदा. पृथ्वी शेषनागाच्या  डोक्यावर असते वगैरे वगैरे). परंतु काही गोष्टी खोट्या ठरल्या म्हणुन सगळे शास्त्रच चुकीचे म्हणणे योग्य ठरणार नाही.

बरेच असे शास्त्रज्ञदेखिल आहेत ज्यांनी लावलेल्या शोधामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत. एखाद्या व्यक्तीने मांडलेल्या सिद्धांतावर पुन: अध्ययन होऊन एक नवीन विचार पुन्हा जन्मास येत असतो. जसा की 'अणुसिद्धांताबाबतचा विचार'. इ.स.पु. ७ व्या शतकात कणाद महर्षींनी सर्वप्रथम अणुसिद्धांत मांडला. पुढे १८०३ मध्ये 'जाॅन डाल्टन'ने अणु निर्माण करता येत नाही व त्याचे विभाजन होत नाही असा सिद्धांत मांडला. त्यानंतर थाॅमसन यांनी अणुच्या बाबतीत प्रोटाॅन व इलेक्ट्राॅनची मांडणी केली. १९११ मध्ये रुदरफोर्ड यांनी सुवर्णपत्रीच्या साह्याने थाॅमसनचा सिद्धांत खोडून काढला. पण पुढे नील्स बोर यांनी रुदरफोर्डचाही सिद्धांताबद्दल वेगळे मत नोंदवले. याचा अर्थ या विश्वात घडणा-या काही क्रिया प्रक्रियांमध्ये सतत बदल होत असतात व हळुहळु मानव बुद्धीने ते रहस्य उलगडत जाते. त्यामुळे शेवटचा जो सिद्धांत असतो त्यालाच गृहीत धरुन वर्तमानकाळ चालत असतो. तेव्हा वैदिकशास्त्रातले अतिजुने दाखले देणे योग्य ठरत नाही (शेषनाग व पृथ्वीचे दाखला).

जगात विशेषत: युरोप खंडात कालगणना माहितही नव्हती तेव्हा भारतखंडामध्ये कालगणना तयार होत्या. नुसत्याच वर्तमानकाळ दर्शवणा-या नाही तर युगा युगापर्यंतचा भविष्यकाळ ठरवणा-या होत्या! पण जे विज्ञान वेडे नास्तिकतेचं ढोंग करतात त्यांच्या बुद्धीच्या कोसो दूर या गोष्टी असतात. सत्य समजण्याचा ते प्रयत्न करत नाही. कारण, निष्पक्ष वृत्तीच्या आणि प्रामाणिक अभ्यासकालाच सत्य उलगडता येत असते. मग ते कितीही आश्चर्यचकीत करणारे असले तरी ते त्या व्यक्तीसाठी अपचनीय ठरत नाही. म्हणुनच सत्य जाणावे ते न्यायाधिशाच्या भुमिकेतून. वकिलाच्या नव्हे.

     विवेकाने विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की कलीयुगात 'दैव' या संकल्पनेला शोधण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे अध्यात्म (ध्यान, साधना, जप, तप) आणि दुसरे म्हणजे 'विज्ञान'! एखाद्या नास्तिकास विचारले की देव दिसत नाही म्हणुन नाकारतोस. पण डीएनए, अणु-रेणु, लहरी, गुरुत्वशक्ती, वायु यासारख्या अनेक गोष्टी ज्या दिसत नाही तरी माणतोस? त्यावर त्याचे तात्काळ उत्तर येईल की "त्या सर्व गोष्टी व त्यांचे अस्तित्व सिद्ध करता येते.  मग खरी गंमत तर इथेच आहे. ज्याप्रमाणे काही अदृश्य गोष्टींना सिद्ध करण्यासाठी विज्ञानास काही चाचण्या घ्याव्या लागतात तसेच, अध्यात्माच्या मार्गे अदृश्य शक्ती (दैव) शोधण्यासाठीही काही प्रयोग-चाचण्या कराव्या लागतात. ते म्हणजेच जप, तप, यज्ञ, याग, ध्यान, साधना...वगैरे वगैरे! विज्ञानमार्गे शोध घेणा-या काही मोजक्याच अभ्यासु व्यक्तींना शास्त्रज्ञ म्हणतात; तसेच अध्यात्माच्या मार्गे जाणा-या अभ्यासु व्यक्तींना ऋषी, मुनी, साधू, संत अश्या नावाने ओळखले जाते; जे कठोर परिश्रमाअंती दैवप्राप्ती करतात. भिन्न भिन्न धर्मानुसार त्यांची नावेही भिन्न असु शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे जी माणसं विज्ञानवादी (विशेषत: नास्तिक) असतात ते डोळेझाकपणे वैज्ञानिकांवर विश्वास ठेवत असतात. वास्तविक त्यांना त्या वैज्ञानिकांनी केलेल्या प्रयोगांचा व चाचण्यांचा सुतराम संबंध नसतो. पण तरीही त्यांचा शास्त्रज्ञांवर विश्वास (श्रद्धा) असतो! तसाच विश्वास आस्तिकांचा साधू, संत, योगी, महंत, ऋषी, मुनी यांच्यावर (श्रद्धा) असतो. ज्याप्रमाणे वैज्ञानिकांच्या प्रयोगसिद्धीला व अभ्यासाला जगाने मान्यता दिलेली असते, तशीच अध्यात्ममार्गे सिद्धी प्राप्त करणा-या अध्यात्मिक शास्त्रज्ञांनासुद्धा जगाने (आस्तिकांनी) मान्यता दिलेली असते. विशेष म्हणजे या दोघांनीही एकमेकांच्या प्रयोगांना व चिकित्सेला मानलेलं असतं.

विज्ञानाच्या मार्गे जाणा-यांनी अध्यात्माचा स्विकार केलेला असतो व अध्यात्माच्या मार्गे जाणा-यांनी विज्ञान मान्य केलेले असते. दोन्ही मार्गाचा ताळमेळ साधूनच जगाचं कल्याण होईल असं त्यांनीही मान्य केलं असावं. पण दोन्ही मार्गाने साधं एक पाऊलही न टाकणा-या परंतु आपापले तत्व कसे खरे आहे हे सांगण्याचा एकमेकांना निरर्थक विरोध करणा-याचा अट्टाहास करणा-यांचं काय? आस्तिक नास्तिकांना दोष देतात, नास्तिक आस्तिकांना दोष देतात. पण दोघांनीही 'अध्यात्म' आणि 'विज्ञान' नीट समजुन घेण्याचा प्रयत्न केला तर एकमेकांवर होणारी चिखलफेक बंद होऊ शकेल. जगात जे अंतिम सत्य आहे ते आहेच! कोणी नाही म्हंटल्यामुळे त्याचे अस्तित्व नष्ट होऊच शकत नाही. एका कविने म्हंटल्याप्रमाणे 'जग कोणाएवढे? ते आपापल्या डोक्याेवढे' हा एकच निष्कर्ष चांगला निघतो. एवढे जरी लक्षात आले तरी आस्तीक-नास्तिकतेचा गुंता सुटण्यास मदत होईल.
Kavesh37.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान