मरणासन्न रस्त्याचे...हृदयद्रावक बोल!

'सोयगांव-नागद महामार्गास वाचा फुटली तर.?' वाचा हा आत्मवृत्तपर लेख.

मरणासन्न रस्त्याचे...हृदयद्रावक बोल!

©कल्पेश ग. जोशी

    जरा ऐकाल का..? हो... मी रस्ता बोलतोय. होय... रस्ताच बोलतोय. लोक म्हणतात मी नागद-सोयगांवला जोडतो म्हणुन. पण कसं शक्य आहे? माझ्या लेखी मी तर दुभंगलोय. नाही नाही. या वाहणा-या वाहनांमुळे नाही. बिचा-या त्या वाहनांचा काय दोष? माझ्यामुळेच उलट त्यांची फरपट चालू आहे. माझ्या या भग्न देहावरुन जाताना त्यांनाही शरम वाटत असावी. म्हणुनच ती वाहनेही रस्त्याच्या कडेने जाणे पसंत करतात हल्ली. नव्या को-या गाड्यांना माझ्या देहावरुन जाताना किती नकोसे वाटावे ही तर माझी घोर शोकांतिका असावी नाही.?

   जीव मुठीत घेऊन ती कोरी करकरीत वाहने धिम्या गतीने पुढे सरकतात. त्यांच्या चकचकीत शरीरयष्टीवर धुळीचे थर साचतात काय. हे एकवेळ ठिक. पण जुन्या पुरान्या झालेल्या वाहनांचे काय? ट्रॅक्टरं तर मेली असतातच उधळमानकी. रस्ता कसाही असला तरी गडगड करत जाणं त्यांचा मुळ स्वभावच. पण ट्रकांचं काय? या भल्या मोठ्या खड्ड्यांमधून कण्हत कुथत ती जातात. जीव अगदी मेटाकुटीला येतो त्यांचा. दोन चाकी गाड्यांनी तर मला कधीच दूर लोटले आहे. ती आपली रस्त्याच्या बाजुनेच जातात. पण मला ना... या सगळ्यांत एस.टी. महामंडळाच्या बसेसची फार कीव येते. ती माझी फार जुनी सोबतीण आहे. काळानुरुप तिच्याच फार बदल झाले. मी मात्र तसाच आहे. माझ्या असल्या दुरवस्थेमुळे त्या बिचा-या एसटीला लवकर वंध्यत्व येऊ लागले आहे. माझ्यामुळेच तिचे आयुष्य कमी झाले. ती कितीही सजुन धजून आली तरी एक ना एक दिवशी तिचे पाटे तुटतातच. तिलाही फार वाईट वाटते. यातना होतात. पण कधीही ती माझ्यावर रागवली नाही की नाराज झाली नाही. माझ्या भग्न देहावरुन जातानाही ती मला एक दिलासा देऊन जाते. तिची प्रेमळ थाप मला किती तरी मोठा आधार देऊन जाते. म्हणुनच ती मला हवीहवीशी वाटते. कित्येक जणांनी मला दूर लोटले असले तरी ती नियमित मला भेटल्याशिवाय राहत नाही. माझ्या एकाकी पडलेल्या मनाला एस.टी. चा दुरुनच खड्खड् आवाज ऐकु येतो. तिची चाहुल लागताच मला किती आनंद मिळतो म्हणुन सांगु? खरंच तीच माझी एक प्रामाणिक सखी सोबतीण आहे.

   पुर्वी ही हिरवीगार झाडेही माझी मित्र होती. आजही आहेत. पण त्यांच्यातही आजकाल दहशत असते. त्यांची कत्तल सुरु केलीय ना माणसांनी. कधीही येतात चराचरा कापुन घेऊन जातात. त्यांच्या देहाचे बारीक तुकडे आणि पानं माझ्याच देहावर अखेर विसावा घेतात. झाडांचा आणि माझा जणु घरोबाच. सगळ्यात जास्त काळ आम्ही सोबत घालवलेला. पण तीही चाललीत आता सोडून. फारच विरळ झाली आहे त्यांची वस्ती आता. मलाच कधी मुक्ती मिळते काय माहित? अनंत दु:खे व शारीरीक पीडा यांमुळे पुरता खचुन गेलोय मी आता. कधीकाळी काही ट्रॅक्टरं यायची आणि मोठमोठी खडक, दगड गोटे माझ्या कडेला त्याची रास मांडून जायची. येणारे जाणारे प्रवासी म्हणायचे "रस्त्याचं बांधकाम सुरु होणार." त्यांचं हे बोलणं ऐकुन मी खूप आनंदी होत असे. पण नंतर तेही उदास होत अन् मीही. ती खडकं महिनोन्महिने तशीच पडून रहायची. माझे नुतनीकरण एक स्वप्नच राही.

   जेव्हा मी चांगल्या स्थितीत होतो तेव्हा धोतर कुर्त्यावाली माणसं फार फिरायची. त्यांचं आवडीचं वाहनही सायकल होतं. आज ती माणसंही दिसत नाहीत आणि सायकलही. पुर्वी मी चांगल्या स्थितीत होतो पण रहदारी कमी असायची. म्हणुन अपघातही कमी होत. ती परिस्थिती आजही कायम असल्याने जरासे हायसे वाटते. कारण... खड्ड्यांमुळे वाहने इतकी धीमी चालतात की अपघाताचा प्रश्नच उद्भवत नाही.

   असो... माझी ही कर्म कहाणी तुम्हाला सांगुन तरी काय उपयोग? तुमचं आपलं मस्त चाललंय. सोयगांवची माणसं पळतात शेंदुर्णी-जळगांवला. बनोटी-गोंदेगांवची माणसं जातात पाचो-याला. काही जण कन्नडवर अवलंबुन आहेत तर काही सिल्लोडवर. मी मात्र पडून आहे असाच तालुक्याला अभिशाप म्हणुन. आजकाल माझ्यावरुन प्रवास करणा-यांच्या तोंडात येणा-या शिव्यांनाही मी कंटाळलोय. प्रवास करणा-यांचा एक शिविगाळ करण्याचा विषय पक्का ठरलाय. ते मला तर शिव्या देतातच पण कुणी मंत्री म्हणुन असतो त्यालाही देतात. कोण असेल हा मंत्री? इतका निर्दयी असतो का तो? की निष्क्रिय असतो तो? सगळे लोक त्यालाच का दोष देतात? माझ्या या अवस्थेला तोच जबाबदार आहे का? मग असेल तर त्यास कळत का नाही? आणि कळत असेल तर तो माझी मदत का करत नाही? ... जाऊदेत... मी... आता... पुरता गोंधळलोय. मला वेड लागणारे बहुतेक. मला मरायचंय. मला एक नवीन जन्म हवाय. काही लोकं म्हणतात, "जमाना बदललाय." मलाही जाणवतं. मग मलाही बदलायचंय. मला मरण हवंय. पण मी इच्छामरण कसं काय घेऊ शकेन. मला या मानवाने जन्माला घातलंय. तेव्हा माझं जगणं-मरणं त्याच्याच हाती ना.?

   ...काल एका गाडीतुन पेपर फेकला कुणीतरी. सहज वाचायला घेतलं. कुणी
पत्रकार माझ्यासाठी उपोषण करताय म्हणे. ही पत्रकार मंडळी चांगली असावी बहुतेक. पण यासारखी बरीच वृत्त वाचलीत मी आजपर्यंत. काहीच तर बदल होऊ शकले नाही माझ्यात. मग आता कसा होणार? पण झाला तर किती बरे होईल नाही. मला तर साधा विचार करुनच डोळ्यात पाणी येतंय. आनंद होतोय. पण का कुणास ठाऊक. माझा आता कुणावरच विश्वास राहिलेला नाहीये. हा... पुन्हा एक आशेचा नवा किरण. बघुया काही होतंय का? पण माझं एक कळकळीचं सांगणं आहे बरं का मंडळी. मी फार थकलोय. आता राहवत नाही अजुन. किती दिवस मला हा त्रास भोगायला लावणार. मला...एक तर नवीन रुप द्या...अन्यथा पुरुन टाका या माझ्या दु:खाश्रुंनी बजबजलेल्या मातीत!   ... द्या मुक्ती एकदाची. "कराल....ना...एवढे...माझ्यासाठी..?"

                                    तुमचा कृष महामार्ग
                                        सोयगांव-नागद

©कल्पेश गजानन जोशी, सोयगांवकर
   Kavesh37.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान