'विकास' फरार आहे!
सोयगांव तालुक्याच्या दयनीय अवस्थेची व्यथा मांडणारा लेख.
*'विकास' फरार आहे!*
-कल्पेश ग. जोशी
गांधीजी म्हंटले होते "खेड्याकडे चला". अर्थात त्यांना भारतातील खेड्यांचा विकास हवा होता. कारण खेड्यांतला विकास झाला तर कृषीप्रधान देशातील शेतकरी व कामगार वर्ग जो खेड्यात राहतो तो समृध्द बणू शकेल. पण गांधीजींच्या म्हणण्याचा शब्दश: अर्थ घेतला तर... 'खेड्याकडे चालत जा' असा अर्थ काहीसा अल्पबुद्धीने निघु शकतो. त्यामागे विचार करणा-याची बालबुद्धी कारणीभूत ठरते. पण एखाद्या बालकाने जरी असा विचार केला तरी त्याचे चुकले असे म्हणता येत नाही. कारण, खेड्याचा विकास करायचा तर तेथे दळणवळणाच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत ही प्राथमिक अट महत्वाची. खेडे व ग्रामिण भाग विकसित करायचा तर त्यांना नागरी भागापर्यंत व शहरांपर्यंत जोडणारे रस्ते व महामार्ग तयार होणे गरजेचे ठरते. रस्ते म्हणजे देशातील प्रगतीच्या वाहिन्याच नव्हे का? पण या वाहिन्यांनाच खड्डेरुपी रोग जडला असेल तर? ही रोगासमान भयावहता नाकारली जाऊ शकत नाही. भारतातील अनेक खड्ड्यांना आज असाच रोग झालाय. रस्ते खंगुन खंगुन मृत झाले तरीही त्यांचे राजकिय चक्षुंना दर्शन घडत नाही. अश्याच आमच्या सोयगांवच्या एका महामार्गाची दयनीय व्यथा झाली आहे.
म्हणायला महामार्ग. पण मार्ग म्हणण्याच्या देखिल लायकीचा नसलेला हा रस्ता. पुर्वेकडून फर्दापुरपासुन सुरुवात होते ती पश्चिमेकडे चाळीसगांवपर्यंत. तालुक्याचा विचार केला तर फर्दापुर ते किन्ही पर्यंतचा हा रस्ता. पण निम्म्याहुन जास्त रस्त्याची जर्जर अवस्था झालीय. फर्दापुरहून चाळीसगांवकडे जसजसे पुढे जावे तसतशी रस्त्याची विद्रुपीकरणाचे दर्शन होण्यास सुरुवात होते. फर्दापुरहून सुटलेली चारचाकी कार सोयगांवपर्यंत टाॅप गिअरवर चालत येते. जरंडी पर्यंत थर्डवर आणि पुढे घोसला-तिडकापर्यंत सेकंडवर येते...आणि मग गाडीचा ड्रायव्हर विचार करु लागतो "पुढे जायचे की नाही?" ही उपरोधिकता नाही शोकांतिका आहे. जवळपास ८३ गावे व खेडी मिळुन असलेला हा तालुका रस्त्याविना पंगू झालाय आणि त्याकडे लक्ष द्यायला कोणी तयारच नाही.
सोयगांवला लागुन अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. दक्षिणेला सातमाळा डोंगर उभा आहे. उत्तरेला खान्देश लागुन आहे. या डोंगरात पर्यटनाची बरीच स्थळे आहेत. पण त्यांकडेही सतत दुर्लक्ष होत राहिले आहे. त्यात किन्हीचा अंतुर किल्ला अपवाद सोडला तर वाडी किल्ला, वसई किल्ला, रुद्रेश्वर लेणी, घटोत्कच लेणी विकासापासुन कोसो दूर राहिले. सोयगांव तालुक्याचे वैभव म्हणजे या ऐतिहासिक वास्तु आहेत. या पर्यटनस्थळांचा विकास झाला तर सोयगांव तालुक्यातील युवकांना खूप सा-या रोजगाराच्या संधी निर्माण होतील यात शंकाच नाही. हल्ली उशीरानं का होईना पण वाडी किल्ल्याचे बांधकाम व पुनर्उभारणी सुरु आहे त्याचे कौतुकवजा स्वागतच. पण निव्वळ किल्ल्याची दुरुस्ती करणे म्हणजे मृत सांगाड्याला अाभुषणे चढवुन अंधारात ठेवण्यासारखे होईल. वाडी किल्ला व अंतुर किल्ल्यास त्याची प्रतिष्ठा तेव्हाच मिळेल जेव्हा तालुक्यातील युवकांना पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातुन रोजगार प्राप्ती होईल.
सोयगांव तालुक्यास असाच एक अजुन महनीय वारसा लाभलाय. तो म्हणजे तेथिल 'वन संपदा'. सोयगांव तालुक्याला पुर्व-पश्चिम बाजुस शेवटपर्यंत सातमाळा डोंगराची अभिनव संपदा लाभलीय. पुढे कन्नडलगत गौताळ्याचे जंगल आहे. या डोंगरात वन्य जीवांप्रमाणेच अनेक औषधी वनस्पती उपलब्ध आहेत. पळस, मोह, कडूनिंबाची प्रचंड रास लागलेली दिसते. सिताफळ, आंबा, बोर, करवंदाची झाडे विपुल प्रमाणात अस्तित्वात आहेत. पण या झाडांचा उपयोग त्यांच्या गुणसंपदेपेक्षा इंधन म्हणुन आणि फर्निचर साठी लाकडे मिळवण्यासाठीच जास्त होताना दिसतो. वसई किल्ल्याच्या (जंजाळा) परिसरात सागवानाची प्रचंड कत्तल आपणांस दिसुन येईल. दिवसा ढवळ्या वृक्षतोड होते. वृक्षतोड करणारे आपल्या हातुन होणा-या पापापासुन अनभिज्ञ आहेतच. पण त्यांच्या हाताला दुसरे काम मिळत नसल्यामुळे वृक्षतोड करुन मोळ्या विकणे किंवा लाकडे वाहणे हाच मुख्य व्यवसाय होऊन बसलाय. सातमाळा डोंगराचे टक्कल पडले ते याचमुळे. मग... पुर्वी वैभव संपन्न असलेल्या ह्या सातमाळा डोंगराच्या विद्रुपतेला कारणीभूत कोण? याचा विचार प्रत्येकाने करायलाच हवा. डोंगराच्या छायेतला प्रदेश वैभव संपन्न असतो असे म्हणतात. पण, या वर्षी (२०१७) सातमाळा डोंगरातुन उगम पावणा-या सोना नदीला पुर का आला नसेल? सातमाळा डोंगराच्या छायेतील प्रदेशात पाण्याच्या टँकरवर का अवलंबुन रहावे लागते? सोयगांव तालुक्यात पाण्याची टंचाई का भासत असेल? याचा विचार निष्पक्षपणे एकदा व्हायलाच हवा.
सोयगांव तालुक्यातील तरुण शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी बाहेर पडतात. पण बाहेर साध्या जळगांव व औरंगाबादेतील उच्च शिक्षित लोकांना जरी 'सोयगांव' सांगितले, तरी त्यांच्या कपाळावर आठ्या पडतात. सोयगांव त्यांना माहित नसते. ते त्यांचे अज्ञान नव्हे तर सोयगांवचे दुर्भाग्य असते. सोयगांवातून बाहेर पडलेल्या लोकांना गांवची ओळख सांगताना 'शेंदुर्णी-सोयगांव' किंवा 'फर्दापुर-सोयगांव' अशी ओळख सांगावी लागते ही सोयगांव वासियांसाठी लज्जास्पद बाब म्हणावी लागेल. सोयगांवला येणारे अतिथीही सोयगांव तालुका असल्याचे कळताच अचंबीत होतात. तसेच राजकियदृष्ट्या विचार केल्यास 'नेतृत्वहिन तालुका' व 'इच्छाहिन नेतृत्व' हे दोन अभिशाप तालुक्याच्या दयनिय अवस्थेस कारणीभूत आहेत. आजकाल देशातील विकास कधी 'वेडा' होताना तर कधी 'शहाणा' होताना दिसतो. पण पुर्वाश्रमीच्या पुण्याईने सोयगांवास तालुका दर्जा मिळालेला असताना तालुक्यात विकासाचा थांगपत्ताच नाही. त्यामुळे तालुक्यातील 'विकास फरार असावा' अशी लेखी कुजबूज करावयास हरकत नाही.
सोयगांव तालुक्याच्या डबघाईला अश्याच अनेक गोष्टी महारोगासमान चिकटून बसलेल्या आहेत. तेव्हा त्याच्या आरोग्याविषयी दखल घेणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ राजकिय शक्तींवर अवलंबुन न राहता जनशक्तीचा पराक्रम गाजवुन परिवर्तन आणता येऊ शकते. लोकचळवळीतुनच सोयगांव तालुक्याचा विद्रुप चेहरा बदलु शकतो. या सर्व प्रयत्नात सोयगांव ते नागद रस्ता खड्डेमुक्त होऊन त्याचे उत्कृष्ट गुणवत्तेचे डांबरीकरण करणे अत्यंत महत्वाचे ठरेल. कारण, हा केवळ रस्ताच नाही तर सोयगांव तालुक्याचा कणा आहे. रस्त्यामुळे दळणवळणाचा मोठा अडसर दूर होईल. विशेष म्हणजे एस.टी. बसेसचा खुळखुळा होणार नाही. याची पुर्ण जाणिव असल्यामुळेच सोयगांव तालुक्यातील पत्रकारांनी रस्ते विकासासाठी आता कंबर कसली असावी. निष्क्रिय झालेल्या सोयगांव तालुक्याच्या विकासाला पुन्हा उभारी देण्यासाठी व्यापक जनांदोलनच नवचेतना देऊ शकेल असा विश्वास ठेवण्यास हरकत नाही. कारण सगळे निष्पक्षपणे प्रयत्न करतिल तर 'फरार विकास' सापडल्याशिवाय राहणार नाही.
©कल्पेश गजानन जोशी, सोयगांवकर
Kavesh37.blogspot.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा