"नोटबंदीची गुलाबी आठवण"


२०१७ या संपुर्ण वर्षात प्रसारमाध्यमात व जनसामांन्यात सर्वात जास्त चर्चेचा ठरलेला विषय म्हणजे 'नोटबंदी'! एकीकडे शालेय विद्यार्थ्यांपासुन ते गावागावातील कट्यांवर, पारावर, पानटप-यांवर व सार्वजनिक ठिकाणी कधी नव्हे इतके अर्थतज्ञ आढळुन येऊ लागले. देशाच्या पंतप्रधानांच्या निर्णयातील चुका शोधणे म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा शहाणे असल्याचा अविर्भाव कित्येकांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. तर...काही जणांचा नोटाबंदीचा निर्णय कसा योग्य आहे, हे सोशल मिडियापासुन ते गल्लीगल्लीतील गप्पांमध्ये पटवुन देताना प्रयत्नांची शर्थ लागत होती. काहींना जुन्या नोटा परत करतानाचा त्रास होत होता, तर काहींना गुलाबी नवीन नोट पाहुन आनंद होत होता. नवीन येणा-या २०००च्या नोटविषयी तर सोशल मिडीयावर विविध प्रकारच्या अफवा पसरत होत्या. पंतप्रधानांच्या धाडसी निर्णयाचा कुठे आनंद व्यक्त होत होता, तर कुठे शक्य तितकी अवहेलना केली जात होती. आनंद - दु:ख, उत्साह - यातना, भक्ती - द्वेष, समर्थन - निरोधन यांसारखा विरोधाभास नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रकर्षाने जाणवला. कारण एकच...'नोटबंदी'!!

     ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरात नोदवण्याइतपत धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. ८ नोव्हेंबरपुर्वी 'नोटबंदी' हा शब्द देखिल एेकला नव्हता. नरेंद्र मोदीजींचे भाषण एेकताना एवढे विशेष नव्हते वाटले. परंतु नंतर प्रसारमाध्यमातुन प्रतिक्रिया उमटू लागल्या तेव्हा नोटबंदी म्हणजे काहीतरी मोठा निर्णय असल्याचं जाणवलं. त्याच दिवशी रात्री १० वाजता उद्या गर्दी वाढेल म्हणुन मामा एटीएममधुन पैसे काढण्यासाठी गेले होते...आणि खाली हात परत आले. स्वत:ला चतुर समजणा-या अनेकांचं त्या दिवशी गर्वाहरण झालं होतं. कारण, १० वाजेपर्यंत जवळपास संपुर्ण शहरातील (भुसावळ) एटीएम रिकामे झाले होते. नोटबंदीविरोध तेथुनच पहायला सुरुवात झाली आणि हळुहळु प्रकरण लक्षात येऊ लागले. परंतु तरीही राजकियदृष्ट्या नोटबंदीकडे पाहता येत नव्हतं. घरातील ज्येष्ठ मंडळी हा निर्णय उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी भाजपला धोका ठरेल अशी भाकितं वर्तवत होते; तेव्हा मस्तिष्कावर तणावाचं साम्राज्यच वाढलं होतं. परंतु दुस-या दिवशी ममता बॅनर्जी, मायावती, सिताराम येचुरी यांची नोटबंदीविरोधी आक्रस्ताळी प्रतिक्रिया पाहुन खुषीची लाट आली आणि क्षणात तणावमुक्त झालो. कारण, ज्याअर्थी हे लोक आक्रमकपणे नोटबंदी व मोदीविरोध करू लागले त्याअर्थी तो निर्णय देशहिताचाच आहे हे सिद्ध झाले! नोटबंदीचा येथुन पुढचा प्रवास तसाच रोचक राहिला.

    जळगांवला परतल्यावर बँकांसमोर, एटीएमसमोर लागलेल्या लांबलचक पण शिस्तबद्ध रांगा दिसल्या. सोशल मिडीयावर एव्हाना रांगेतल्या सेल्फींना ऊत आला होता. एटीएमसमोरच्या रांगेत उभी राहण्याची ८-१० दिवसांनी माझ्यावर पाळी आली व नंतर वारंवार आली. रांग लावण्यासाठी कुणीही वर्दीतली व्यक्ती नसताना नागरीक स्वत: स्वयंशिस्तीचे दाखले देऊ लागले होते. युवक युवती वृद्धांना मदत करताना दिसु लागली. ब-याच ठिकाणी स्वयंसेवकांकडून चहा-पानी वाटप झाले. शिकले सवरलेले तरुण प्रथमच एटीएम मध्ये येणा-या नवख्या एटीएमधारक व्यक्तींसाठी मदत करु लागले. जळगांवस्थित पेंडसे नामक एका वयस्कर (अनोळखी) आजोबांसाठी मीही सव्वा तास रांगेत उभा राहिलो. पेंडसे आजोबांना पैसे काढून दिल्यानंतर त्यांना फारच आनंद झाला होता. त्यांनी प्रेमाने पाठीवर दिलेली शाबासकी आणि नंतरची 'चाय पे चर्चा' अजुनही त्या वातावरणाची आठवण करुन देते. नोटबंदीनंतर दोन हप्त्यांनंतर मात्र राजकिय वातावरण तापले होते. नोटबंदी विरोधाला धार आली होती. ८ - ९ तारखेला नोटबंदीचं तोंडभरुन कौतुक करणा-या मिडीयाचेही विचारवारे बदलले. अश्यातच रसरशीत राष्ट्रभक्ती संचारलेले, जनतेला नोटबंदीमुळे होणा-या यातना पाहुन हेलावलेले व जनतेला देशहितासाठी नोटबंदी स्विकारुन भावुक आवाहन करणारे पंतप्रधान दिसले... आणि काय आश्चर्य..! मोदींचं आवाहन स्विकारलेली भारतीय जनता आनंदाने व अभिमानाने एटीएम व बँकांसमोरच्या रांगेत उभी दिसली.

     मोदींनी त्यांच्या भाषणात जनतेला फक्त पन्नास दिवस त्रास सहन करण्याचे आवाहन केले. या सुरुवातीच्या पन्नास दिवसांत सरकार व बँकांची खूपच तारांबऴ उडालेली दिसत होती. जुन्या हजार पाचशेच्या नोटा जमा करण्याची गर्दी आणि नवीन २००० च्या नोटांचा तुटवडा यामुळे जनता हवालदिल झाली होती. सुरुवातीला पन्नास-शंभर मुल्य असलेल्या नोटाच मिळत होत्या. त्याही अपु-या पडू लागल्या. मग दहा-वीस रुपयांपासुन नोटा मिळण्यास सुरुवात झाली. पण तरीही ते पुरेनासे झाले. एटीेमसमोरील रांगेत उभे असलेले लोक निराश होऊन पुन्हा घरी परतत होते. दोनवेळेस तर माझा नंबर लागला अन् पैसे संपले! अश्यावेळी माझ्यासह सर्वांचाच हश्या झाला..! बहुतांश जनतेने मोदींना साथ द्यायचे ठरवले असताना काही विशिष्ट लोक मात्र जाणिवपुर्वक सरकारचा अपप्रचार व शिवीगाळ करत होते. पण रांगेतील जनतेकडून अश्या प्रवृत्तीला विरोध व्हायचा. त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेना. त्यामुळे अशी माणसे जास्त दु:खी कष्टी होत.

     सोशल मिडीयावरुन एव्हाना अफवांना उत आला होता. नवीन दोन हजारच्या नोटमध्ये काहीतरी माइक्रोचीप बसवलेली आहे म्हणे. ज्यामुळे त्या नोटेचं लोकेशन ट्रेस होणार आहे. तसेच मीठाच्या टंचाईची अफवा व सरकार लाॅकरमधील दागिने जप्त करणार आहे अशीही अफवा पसरली होती. अश्यातच व्यापारी, दुकानदार व विक्रेत्यांनी पाच व दहा रुपयाचे नाणे घेणे बंद केले. आरबीआयने याविषयी गैरसमज दूर केल्यानंतर त्याचा प्रभाव ओसरला व पुन्हा पाच-दहा रुपयाची नाणी वापरात सुरुवात झाली. दोन हजारची नोट आल्यानंतर तर अफवांची हद्द झाली होती. या अफवांना सुशिक्षित लोकांसह प्रसारमाध्यमे व न्युजचॅनेल्सही बळी पडत होते हे विशेष! काय तर म्हणे नोटचा रंग जातोय. तोही केवळ खिश्यात, पर्समध्ये किंवा वाॅलेटमध्ये ठेवल्याने नव्हे तर वाॅशिंग मशीनमधुन घुसळुन काढल्यावर, गरम पाण्यात उकळल्यावर, करकसुन घासल्यावर!! हे सारं हास्यापद होतं?? नाही..नाही..! हे लज्जास्पद होतं त्या सर्व लोकांसाठी जे स्वत:ला सुशिक्षित समजतात; पण ते असे निरर्थक प्रयोग करुन जनतेला भ्रमात ढकलत होते.! त्या सर्व प्रवृत्तींसाठी हे वर्तन लज्जास्पदच होतं! एकीकडे सरकार पुर्ण ताकदीनिशी या महाधाडसी कारवाईला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते; तर दुसरीकडे काही माणसं जनतेत गोंधळ- भ्रम निर्माण करण्यासाठी शक्ती पणाला लावत होती. पण, ही सारी कारस्थाने जनतेच्या तीक्ष्ण नजरेतुन सुटलेली नाहीत.

     १९९२ मध्ये तेव्हाच्या पी.व्ही. नरसिंहराव सरकारने
'एल-पी-जी धोरण' अवलंबिले होते. त्यावेळी अर्थमंत्री होते मनमोहनसिंग. तेव्हाचा तो निर्णयही देशासाठी अपरिहार्य होता. त्या निर्णयामुळे तेव्हाही काही काळ जनतेला त्रास सहन करावा लागला होता. परंतु त्या निर्णयाची मधूर फळे आपण आज चाखत आहोत की नाही? निश्चलनीकरण (नोटबंदी) हीसुध्दा एक अपरिहार्य गोष्ट होती. आज ना उद्या तो निर्णय घ्यावाच लागणार होता. प्रश्न होता तो सरकारच्या धारिष्ट्याचा...हिंमतीचा. काँग्रेस सरकारलाही माहित होतं की नोटबंदी गरजेची आहे. पण या निर्णयामुळे खूप मोठी उलथापालथ होणार होती. नियोजन करावं लागणार होतं. जनतेकडून आक्रोश होणार होता. व विरोधक प्रचंड गदारोळ करणार होते. हे  सर्व धोके बाजुला सारुन काँग्रेसने निश्चलनीकरणाचा विचार सोडून दिला. १९९२ साली दाखवलेली हिंमत पुन्हा दाखविण्याची त्यांची छाती झाली नाही. परंतु, सत्तेवर येऊन केवळ दोनच वर्ष झालेल्या मोदी सरकारने व प्रथमच पंतप्रधानपदी विराजित झालेल्या व्यक्तीने सर्व राजकिय धोके स्विकारुन नोटबंदीचा निर्णय घेतला..! याचे करावे तेवढे कौतुक थोडेच.

      देशाला अशी धाडसी पावलं उचलावीच लागतात. पण त्यासाठी देशाचं नेतृत्व करणारं सरकार हिंमतवान पाहिजे. १९४६ साली सर्वप्रथम विमुद्रीकरण झाले होते. त्यानंतर ३२ वर्षांनी मोरारजी देसाईंनी हजार पाचशेच्या चलनाचे विमुद्रीकरण केले होते. त्यांनंतर पुन्हा तब्बल ३८ वर्षानंतर नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा महाधाडसी निर्णय घेतला. एक नागरीक म्हणुन सुरुवातीला सगळ्यांनाच त्रास झाला. परंतु, आज एक वर्षानंतर परिस्थिती पुर्वपदावर आली याचे श्रेय सरकारला जाते. कालपर्यंत बँकेत जाताना, मार्केटमध्ये जाताना, काॅलेजची फीस भरताना, मोठमोठे व्यवहार करताना मोठी रक्कम सोबत घेऊन जाणे म्हणजे जोखमीचे होते. परंतु, कॅशलेस व्यवहारामुळे आता निश्चिंतपणे व्यवहार होऊ शकताहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक वेळी पैसे काढण्यासाठी आता बँकेत जावे लागत नाही. एकदा भरणा केला की त्यातुन पुरेसे व्यवहार होतात. चोरीची भीती आता नाहिशी झाली. ज्या व्यक्तीसोबत व्यवहार झाला त्या व्यवहाराचा सारा तपशिल कायमस्वरुपी जतन झालेला असतो. कॅशलेस इकाॅनाॅमीमुळे २४ तास पारदर्शक व्यवहार करणे शक्य झाले. देशातील प्रत्येक नागरीकास नोटबंदीमुळे भिन्न भिन्न अनुभव आले असतिल. काहींना फायदा तर काहींना तोटा झाला असेल. हजार पाचशेच्या चलनाचे बंडलं मंदिरांना, गरीबांना तर काही गंगेला दान करुन अनेकजण पुण्यवान झाले असतिल. अश्याप्रकारे अनेक कटूगोड आठवणींयुक्त नोटबंदीला आपण स्वत: साक्षीस होतो याचा आनंद वाटतो. नोटबंदीची ही गुलाबी आठवण भारतीयांच्या सदैव स्मरणात राहीन.
-कल्पेश गजानन जोशी, सोयगांवकर

    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान