'पुरोगामीत्व, दैव आणि श्रद्धा'

                                                           पुरोगामीत्व, दैव आणि श्रद्धा

     आजपर्यंत आपण अनेक लेख, कथा, निबंध देव व श्रद्धा-संस्कृती यांविषयी वाचलेले आहेत. 'जगात देव आहे' हे मांडण्यासाठी देवाची वकिली करणे हा यामागचा उद्देश्य नसतो. देवाची वकिली करणारे आपण कोण? स्वत:च्या अस्तित्वाचा साक्षात्कार तो भिन्न प्रकारे देत असतो. तो काहींना कळत नाही यात त्याचा मुळी दोष नाही. परंतु समाजाला त्याच्या संस्कृतीपासुन, कर्तव्यापासुन आणि धर्मापासुन कोणी फसवेगीरी करुन दूर नेऊ पाहत असेल तर त्याला आळा घालण्यासाठी या धर्मद्रोही विकृतींशी लेखणीयुद्ध करावेच लागते. किंबहुणा तेच लेखकाचे आद्य कर्तव्य असते. म्हणुन हा माझा सुक्ष्म प्रयत्न.

    पाप पुण्यापासुन ते स्वर्ग-नरक या संकल्पनांपासुन मणुष्य कधी दूर तर कधी जवळ जाताना दिसतो. आपल्याला येत असलेल्या अनुभवातून सोयीस्कररीत्या दैवावर विश्वास ठेवणे आणि न ठेवणे मणुष्य सदैव करत आलेला आहे. स्वत:चा स्वार्थ साध्य झाला तर ठीक नाहीतर देवाला शिव्या घालणार्या मानवाचा आजही काही तुटवडा नाही. साधू संतांच्या नावावरुन स्वत:चे धंदे थाटून बसलेलेही काही कमी नाहीत. या भोंदू लोकांमुळे सामान्य माणसाला 'श्रद्धा' आणि 'अंधश्रद्धा' यातील फरक करायला अवघड जातं ते खोटं थोडेच आहे? संत तुकारामांची गाथा कधी पाहिलीदेखील नाही, कधी वाचली नाही असे व्याख्याते संत तुकारामांविषयी त्यांच्या जन्मामृत्युवरुन जावई शोध लावतात. उद्देश फक्त एकच. 'समाजाला सत्यापासुन आणि धर्मापासुन दूर न्यायचे'. दुसर्या धर्मातील व्यक्तीने येऊन लपुन खोटं नाटं बोलून, फसवेगीरी करुन, लोभी आमिषं दाखवून एखाद्याला धर्म बदलायला लावणं साहजीक आहे. पण एकाच धर्मातील काही फुटिर लोक आपल्यातील माणसांना दुसर्या धर्मात लोटण्याच्या प्रयत्नात असतिल तर...याला काय म्हणणार? धर्मद्रोह..?
असो... कोणी कसंही असलं तरी देवाधर्माशी कुठे ना कुठे प्रत्येकाचा संबंध येतोच. मग कोणी कितीही बेंबीच्या देठापासुन ओरडून सांगीतलं की 'मी देवावर विश्वास ठेवत नाही, जगात देव नाही...स्वत:च्या अंगी कितीही "कृत्रीम पुरोगामीत्व" संचारलं तरी मृत्यु समोर दिसताच याला कोणत्या देवाचं नाव घेऊ नि कोणत्या नाही असं होतं'! अश्यावेळी यांचं पुरोगामीत्व नग्न उघडं बोडकं होऊन बसतं. अश्या लबाडांना पुरोगामी म्हणवुन घेण्याचा अधिकारही नाही. पण आज काल पुरोगामीत्वापासुन भरकटलेले अक्कलशुन्य माणसे कृत्रीम पुरोगामीत्वाचे फाटके टोपडे डोक्यावर चढवुन हिंडताय.

     हिंदू धर्माला विरोध करायचा म्हणुन खोटं पुरोगामीत्व मिरवणारे रोज टीव्हीवर झळकताना दिसतात. मग ते जिवंत असो वा मृत अवस्थेत...अर्धमेले असो वा चितेवर लाल सलामी देणारे असो. दिसतात जरुर! आजकाल तर जो हिंदूधर्माला आणि हिंदू संस्कृतीला विरोध करतो व इतर धर्मीयांच्या कुप्रथांकडे दुर्लक्ष करतो तोच पुरोगामी म्हणुन ओळखला जातो! खरं तर असे लोक पुरोगामी नाहीच. कारण पुरोगामीत्वाची इतकी संकुचित व्याख्या होऊच शकत नाही. असे लोक पुरोगामीत्व, पाश्चीमात्यीकरण व आधुनिकता या संकल्पनांना नीट न उलग़डताच गोंधळ घालत असतात. खरं पाहता हिंदू धर्मच मुळात पुरोगामी विचारसरणीचा आहे आणि 'हिंदू हा केवळ धर्म नाही तर ती जगण्याची रीत आहे.' मागील शंभर वर्षाचा जरी अभ्यास केला तरी आपल्या लक्षात येईल की हिंदू धर्मातील चालीरीती, प्रथा, सवयी या कालांतराने आवश्यकतेनुसार बदलत गेल्या आहे. (उदा. सती प्रथा, बालविवाह) त्यामुळे पुरोगामीत्वाचे लेबल माथी लावून हिंडण्यात कुठले आले शहाणपण? भगवान श्री कृष्णांच्या परम पावन गीतेमध्येच ती तत्वे मांडलेली आहेत जी माणसाला काल्पनिक जीवनपद्धतीपासुन प्रात्यक्षिक जीवनपद्धतीकडे घेऊन जातात. ज्याने गीता वाचली त्याला दैव व दानवता आणि धर्म-अधर्म यांतला फरक कळून चुकतो. अंधश्रद्धा मात्र या तत्वांना जाणते अजाणतेपणी लागलेली कीड आहे. देवदेवतांना 'नवस करणे' ही अत्यंत चुकीची प्रथा म्हणावी लागेल. स्वत:चं काम पुर्ण करण्यासाठी देवाला लाच देऊ पाहणारा मुर्ख माणूस खरा अधोगामी म्हणायला पाहिजे. देवळांत जाऊन फक्त स्वत:ला काय काय पाहिजे याची यादी जो देवासमोर मांडतो ना तो खरा अधोगामीच असतो. देव देव करुन जो वाईट कर्म करतो, ज्याच्या डोक्यात वाईट विचार येतात, जो इंद्रियांवर ताबा ठेवू शकत नाही तोच असतो अधोगामी. हे अगदी लहान बालकही सांगेल. पण "काही जण शरीराने मोठे होतात, बुध्दीने नाही"!  हिंदू धर्मातील ग्रंथांमध्ये सदगुणांच्या पवित्र गंगाच वाहताना आपणांस दिसतील. जो कोणी त्यांचं अमृत जलप्राशन करतो तो खरा पुरोगामी होतो. धर्मानं दाखवलेल्या मार्गावर चालत अध्यात्म व विज्ञान यांच्याशी सांगड घालून जीवन जगण्याची आज रीत झाली आहे आणि यावरुनच आपली उच्च विचारसरणी ठरत असते. नाहीतर रोज देवाधर्माला शिव्या घालणारे तरुण परीक्षेच्या तोंडावर देवळात जाऊन देवाजवळ हजारो मागण्या करतात, नवस करतात, उपवास करतात असे लबाड लोक पुरोगामी म्हणवण्याच्या लायक नाहीत आणि मागचा पुढचा काही आधार नसलेल्या, हिंदूद्वेषी, जातीयवाद पसरवणार्या भामट्यांनी तर स्वत:ला गाढव म्हणावं पण पुरोगामी म्हणुच नये.

     माझा एक मित्र होता. आम्ही आठवड्यातून एक दिवस जवळच्या गणपती मंदीरात जायचो. मंदीरात शांतता असायची, प्रसन्न वाटायचे. मध्यंतरी समर होलीडेजमुळे आम्ही आपापल्या घरी गेलो. पुन्हा परतल्यावर मात्र तो बदललेला होता. मंदीरात जायला तयार होत नव्हता. "काही देव-बीव नसतो, भुलथापा आहे वगैरे वगैरे बडबडत होता. मीही त्याला जास्त आग्रह केला नाही. पण जेव्हा आमची परीक्षा सुरु झाली, तेव्हा मात्र हा सकाळीच लवकर उठून तयारी करुन बाहेर जाऊ लागला. विचारले, तर काही नाही. एका दिवशी मी पाठलागच केला त्याचा. तो गेला सरळ मंदीरात. मी तेथे धडकल्यावर मात्र कावरा बावरा झाला. जणू तो काहीतरी भयंकर गुन्हा करताना सापडलाय. मीही त्याला काही उचकणे दिले नाही. त्यामुळे त्याला जरा हायसे वाटले आणि वाटेत त्यानेच विषय खोडला. त्याच्यामधील अश्या बदल होण्याचे कारण त्याने जेव्हा सांगितले तेव्हा मला हसूच आले. त्याने सांगितले की त्याचे वडील गणेश चतुर्थीला मोदकांसाठी पेढे आणायला जात असताना त्यांना अपघात झाला. ते जखमी झाले. हात मोडला... वगैरे वगैरे सांगत होता. त्याचे वडील देवाच्या नैवेद्यासाठीच तर जात होते मग त्यांच्यासोबत असं व्हायला नको होतं. म्हणुन त्याचा राग होता. अर्थात राग धरायला हरकत नाही. पण द्वेष करणे चुकीचेच म्हणावे लागेल. ब-याचदा आपली वैचारीक गफलत होते ती अशीच. त्याने नकारात्मक विचार केला. पण त्याचे वडिल देवाचा नैवेद्य आणायला जात होते म्हणुन थोडीशी जखम झाली. थोडक्यात बचावले. अन्यथा अजुन काही बरेवाईट झाले असते तर..? ही सकारात्मकता त्याच्या मस्तिष्कास शिवल्यावर त्याच्या मन:कलह संपला.

     अश्या घटना अनेकांच्या आयुष्यात घडत असतात. देव आपले कामं करण्यासाठी नेमलेला नोकर नाही की ज्याकडून वाटेल त्या अपेक्षा आपण करु आणि नाही झाल्या की पुन्हा त्याचाच द्वेष करु. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिलीय. तिचा योग्य वापर करण्यासाठी सुभाषितं, सुवचने दिली आहे. ती आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी धर्म ग्रंथ, वेद व पुराणे आहेत. तेच विचार अजुन प्रासादिकरीत्या साधू संतांनी वेगवेगळ्या पुस्तकांतून, ग्रंथातून, अभंगातून व किर्तन-प्रवचनातून वर्णिली आहेत. या सर्व तत्वांचा आधार घेऊन धर्माच्या मार्गावर चालत असता अडचणी निर्माण झाल्या तर अर्जुनामागे जसा उभा राहिला तसा आपल्यामागे तो भगवंत उभा राहत असतो. गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णांनीच सांगितले आहे की जेव्हा जेव्हा धर्मावर, राष्ट्रावर, सृष्टीवर व माझ्या प्रिय भक्तांवर संकटे येतील तेव्हा तेव्हा मी अवतार घेईन. याचा प्रत्यय अनंतवेळा मानवाला येऊन गेला आहे व येत राहणार आहे.

"यदा यदा ही धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
अद्भ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानम् सृजाम्यहम्"

याच त्या ओळी आहेत ज्या भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितल्या आणि कालानुरुप आर्य चाणक्य, सम्राट चंद्रगुप्त, महाराजा पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पेशवा बाजीराव, तात्या टोपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र यांसारख्या हजारो लाखो अर्जुनांपर्यंच तो श्रीकृष्णांचा संदेश पोहचला व ते धर्म व देशासाठी अमर झाले.

     ही शृंखला इथेच खंडीत होत नाही. तर त्यापुढेही अगदी आजपर्यंत चालूच आहे व सदैव चालूच असणार आहे. आपल्या भारतमातेसाठी लढणारे वीरजवान लढतात तेव्हा त्यांना याचे खूप प्रत्यय येत असतात. एक अतिशय सुंदर उदाहरण माझ्या वाचनात आले. भारत-पाक युद्ध सुरु होते. भारत-पाक सीमेवर जैसलमेरपासुन १३० किमी. अंतरावर असलेले 'तनोट माता मंदीर' आहे. या ठिकाणी युध्दादरम्यान पाकीस्तानी सैन्याकडून मंदिर परिसरात जवळजवळ ३००० बाँम्ब टाकण्यात आले होते. काही मंदिरावरही पडले. पण, काय आश्चर्य!! मंदीराला एक तडासुद्धा गेला नाही. एवढेच काय तर युध्दविरामानंतर सर्च आॅपरेशनमध्ये मंदीराच्या परिसरात ४५० जीवंत बाँम्ब सापडले. जे फुटलेच नव्हते! जे आजही मंदीराच्या संग्रहालयात कडक सुरक्षेत ठेवलेले आहेत. दुसरी घटना घडली ती ४ डिसेंबर १९७१ साली जेव्हा पाकीस्तानने लोंगोवाल या भागातून भारतावर हल्ला चढवला. चालुन येणारी पाकीस्तानी सेना शस्त्रबद्ध व रणगाड्यासहीत येत होती. आणि तेथिल चौकीवर भारतिय जवान होते फक्त १२०. पण भारताच्या जवानांनी पाकीस्तानी तोफांनाही पाणी पाजले व पाकड्यांना जबर मार खावा लागला. याही ठिकाणी अचानक आलेल्या संकटातून तनोट मातेने भारतिय जवानांचे रक्षण केले.
आज हे मंदीर तेथे प्रेक्षणिय स्थळ झाले आहे. विदेशी यात्रेकरुसुद्धा दर्शनासाठी तेथे येतात. सीमा सुरक्षा दलाचे जवान आजही तेथे गस्तीवर जाण्याआधी दर्शन घेतात व तनोट मातेच्या आशीर्वादासह भारतमातेचं रक्षण करतात. असे खूप सारे उदाहरणं आपल्याला सापडतिल.

    असेच एकदा एक दृष्य मनात भरत होतं. काहीतरी सुचवत होतं. एक बालक सायकल चालवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा मोठा भाऊ त्याला शिकवत होता.
सायकल नीट चालू लागली की तो सायकलला सोडून देत होता व लहाण भावाला असे वाटायचे की आपण पडणार नाही कारण, आपल्या दादाने सायकल पकडली आहे. दादा मात्र सायकल नीट चालू लागली की हात काढून घ्यायचा व छोटू पडायला लागला की पुन्हा पकडून घ्यायचा. मी या दृष्याला देव आणि मणुष्य किंवा भक्त यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करत होतो. जसे देवाचे आपल्या भक्ताशी आणि संपुर्ण सजिवांसोबत असेच काहीतरी संबंध असतात. जीवनाची सायकल सुरु करण्यासाठी वेगवेगळ्या रुपात येऊन तो आपल्याला मार्गक्रमण करतो पण काही संकटे उभी किंवा जीवनरुपी सायकल पडू लागली की तोच पुन्हा सावरायलाही सरसावतो. सायकल शिकताना पडले तर दादावर खट्टू होणे साहजिक पण द्वेष करणे चूकीचे नाही का? अश्याप्रकारे ज्याचा दादावर विश्वास आहे तो आनंदात नि:संकोचपणे  सायकल शिकतो. पण, ज्याचा दादावर विश्वास नाही त्याला सदैव पडण्याची भीती ही असतेच असते. तरी कुणाचा विश्वास असो वा नसो दादा मात्र सगळ्यांनाच मदत करतो एवढं नक्की. पण त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे पुरोगामीत्वाला सोडून नसते. पण ज्या लोकांचं पुरोगामीत्वच मुऴात हिरव्याकंच मनातील असेल तर त्याला आपण तरी काय करणार.??
-कल्पेश गजानन जोशी, सोयगांवकर
Kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान