'म्हैसुरचा महिषासुर'
महाराष्ट्र साम्राज्याचा विस्तार होत होता. मराठ्यांनी दिल्लीची पातशाही हादरवुन सोडली होती. हिंदूंच्या राजसत्तेला डिवचण्याची हिंमत करेल असा हर एक शत्रु मराठेशाहीच्या चाबकाने सोलुन निघत होता. अख्या हिंदूस्तानात हिंदू राजसत्तेला परिणामकारक विरोध करु शकेल असा विरोधक शिल्लक राहिला नव्हता. परंतु, अश्या काळीही दक्षिण भारतात हैदरअल्ली नामक मुसलमान हिंदू राजाच्या हाताखाली अधिकारावर चढत होता. त्या हिंदू राजाच्या 'सर्वधर्मसमान' व 'उदारीपणा'च्या भोंगळसुत्रीपणामुळे हैदर सत्ता काबिज करुन बसला. हैदरने हिंदूराजास बाजु सारुन सर्व राजसत्ता स्वत:च्या हाती घेतली. त्याच्या अंगी क्षत्रियाकडे असावे ते मुत्सद्दीपणा, शूर, पराक्रमी, चतुर असे सारे गुण होते. हैदरच्या मृत्युनंतर त्याचा पुत्र टिपू याच्याही अंगी तेच सर्व गुण होते. पण एक राजा किंवा शासक म्हणुन त्यांच्या अंगी प्रजेला समान न्याय देणारे गुण होते काय? ते प्रजाहितदक्ष होते काय? ज्या प्रमाणे हैदरपुर्वीच्या हिंदू राजा चिक्क कृष्णराजने आपल्या पदरी महत्वाच्या पदांवर मुसलमानांनाही मान दिला होता तसा हैदर किंवा टिपुने त्यांच्या पदरी हिंदू सरदारांना उच्च पदे देऊ केले होते काय? साम्राज्यविस्ताराबरोबर जबरीने धर्मप्रसाराला त्याने चालना नव्हती काय? असे प्रश्न एखाद्या राज्यकर्त्यांना विशेषणं लावताना आणि दूषणं देताना उपयोगी पडतात. कारण हेच मुद्दे योग्य अयोग्य राज्यकर्त्याचे मुल्यमापन करतात. म्हणुन हैदर व टिपुने केलेला नरसंहार, हिंदूंची धर्मांतरण व जाणिवपुर्वक केलेला छळ व त्याचे परिणाम बराच काही संदेश सोडून जातात.
सत्ता हाती येताच टिपुने मुळ हिंदूराजाचे नाव गांव पुसुन इस्लामीकरणाचा धडाका लावला. न्याय व्यवस्था, लष्करी प्रशासन व परराष्ट्र व्यवहार सर्व आपल्या काबुत ठेवुन त्याने स्वत:ला 'सुलतान' घोषीत केले. स्वत:चे शिक्के काढले. हिंदूंच्या परंपरागत चालत आलेल्या दिनदर्शिका व पंचांग बदलुन अरबी दिनदर्शिका सुरु केल्या. सर्व काफरांना मी हिंदू करुन सोडीन अशी प्रतिज्ञा त्याने भर दरबारात केली. लगोलग त्याने त्याच्या मुस्लीम अधिका-यांना कळविले की झाडुन सगळ्या हिंदूंना इस्लामची दिक्षा द्या. स्वेच्छेने न होतील तो जबरीने धर्मांतरण करा. प्रसंगी ठार करा. पकडुन आणलेल्या स्त्रियांना बटकी करुन आपापसांत वाटुन टाका. टिपुच्या या राजाज्ञेमुळे म्हैसुरमध्ये (कर्नाटक) हाहाकार उडाला. टिपुने स्वत: मलबारवर स्वारी करुन एक लक्ष हिंदू स्त्री-पुरुषांना बाटवुन टाकले. धर्म रक्षणार्थ व अब्रु वाचवण्यासाठी कृष्णा, तुंगभद्रेसारख्या मोठमोठ्या नद्यांतुन सहस्त्रावधी हिंदू स्त्री पुरुषांनी मुलालेकरांसह उड्या घेऊन जीव दिले! शतावधी हिंदू आगीत उड्या घेऊन भस्मसात झाले पण बाटून मुसलमान झाले नाहीत. हिंदूंचा नि:पात करण्यासाठी टिपुने विशिष्ट सैन्यपथकही तयार केले होते. त्यांच्या हिंदूंना बहिष्कृत करण्याच्या कार्यासाठी पारितोषिक म्हणुन हिंदू स्त्रियातील तरुण सुंदर मुली यथारुची आपापसात वाटुन दिल्या जात. टिपुच्या या धर्मोन्मादामुळे हिंदूंना त्याने अक्षरश: त्राही भगवन करुन सोडले होते.
हिंदूंवर होणा-या अत्याचाराच्या बातम्या छत्रपतींचे सेवक असलेल्या पेशव्यांच्या शनिवारवाड्यांपर्यंत धडाडत होत्या. छत्रपतींचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पुर्ण होईतो मराठे शांत बसणारे नव्हते. त्यात हिंदूवर होणारा अत्याचार पाहुन म्हैसुरच्या महिषासुराचे पारिपत्य करण्यासाठी मराठा राज्यधुरंधरांनी निश्चय केला. नाना फडणीसांनी दक्षिणेतील हाताशी असलेल्या सर्व सरदारांना टिपुवर चालुन जाण्याची आज्ञा केली. मराठे चालुन येत आहे हे कळल्यावर टिपु चवताळला. त्याने मराठा साम्राज्यापासुन जवळच असलेल्या 'कित्तुर' व 'नरगुंद' या दोन संस्थानांवर हल्ला केला. लुटालूट सुरु केली. स्रियांच्या अब्रुवर हात टाकला. प्रचंड छळ सुरु झाला. लिंगायत असो वा ब्राम्हण, कोळी असो वा भील्ल, शेतकरी असो वा व्यापारी सा-यांचा छळ सुरु झाला. जबरीने धर्मांतरण होऊ लागले. जाळपोळ सुरु झाली. मराठ्यांचा सेना सागर पोहचेपर्यंत टिपुच्या चवताळलेल्या राक्षसांनी प्रचंड हैदोस घातला. यापुर्वी मराठ्यांनी हैदरला (टिपुच्या बापाला) हिसका दाखवला होता. पण त्याने अखेरीस शरणागती पत्करुन मराठ्यांशी तह केला. तह करुन मराठ्यांनी त्याला सोडून दिला होता. पित्याने केलेली चुक टिपुने पुन्हा केली. तेव्हा मराठ्यांनीही टिपुचा कायमचा सोक्षमोक्ष लावायचे ठरविले. इंग्रजांचे आणि टिपुचे आधीच बिनसलेले होते. हैदर होता तेव्हापासुन त्यांच्यात शत्रुत्व होते. इंग्रंजांनी मराठ्यांना टिपुवर चालुन जाताना पाहिले व आलेल्या संधीचा उपयोग करायचे योजिले. इंग्रजांनी मराठ्यांशी संधी केली. निजामाने इंग्रजांच्या तैनाती फौजेचा स्विकार केलेला असल्याने त्यानेही युध्दात उडी घेतली. इंग्रज-मराठा-निजाम असा सेनासागर म्हैसुरच्या दिशेने येताना पाहुन टिपुला हुडहुडीच भरली. पटवर्धन, बेहेरे, भोसले, फडके, होळकर प्रभुती मराठा सेना नायकांनी टिपुच्या ठिकठिकाणच्या क्रुर मुस्लीम सैन्याची धोबीपछाड करण्यास सुरुवातही केली.
जे जे लहान मोठे संस्थाने टिपुने ताब्यात घेतली होती ती ती मराठ्यांनी मुक्त केली.
मंदिरांच्या झालेल्या विटंबनेतुन मंदिरं पुन्हा विधीवत उभी केली. मराठ्यांच्या चाबकाच्या फटक्यांचे आवाज टिपुपर्यंत पोहचायला वेळ लागला नाही. मराठ्यांच्या खडगाचे वार जसे त्या सैतानांवर बसु लागले तसतसा टिपुचा धर्मोन्माद उतरु लागला आणि काय आश्चर्य मुस्लीम धर्मोन्मादाने पछाडलेला टिपु हिंदू-देव देवतांच्या भजनी लागला.!!
टिपुने अकस्मात हिंदू देवालयांना देणग्या देण्यास सुरुवात केली. पुर्वी फोडलेल्या मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठा केली. युद्धात यश यावे म्हणुन ब्राम्हणांकरवी अनुष्ठाने बसविली. ज्या ब्राम्हणांचा कालपर्यंत टिपु हिंदूधर्मप्रसारक म्हणुन छळ करत होता त्याच ब्राम्हणवर्गासाठी दक्षिणा समारंभ सुरु केले. हिंदूंचे सण रथोत्सव, दिपोत्सव स्वत:च्या हाताने शोभेची दारु उडवुन साजरी करु लागला. टिपुला उशीरा सुचलेल्या लबाड शहाणपणाचा त्याला काही एक उपयोग झाला नाही. मराठा-निजाम व इंग्रजांच्या सैन्याने टिपुला अखेर यमसदनी धाडलेच!! राष्ट्रधर्मावर जेव्ह जेव्हा संकटे आली तेव्हा तेव्हा मराठ्यांनी आपल्या तलवारीच्या खणखणाटाने ती आक्रमणे परतवुन लावली होती.
आपला त्या काळचा वीरभाट आपल्या पोवाड्यात हिंदूत्वाच्या रसरशीत अभिमानाने म्हणतो की,
"जलचर हैदर निजाम इंग्रज
रण करिता थकले ।
ज्यानि पुण्याकडे विलोकिले
ते संपत्तीला मुकले ।।"
राक्षसाशी लढायचे तर सवाई राक्षस होऊनच लढले पाहिजे..!
टिपुला त्याच्या कर्माचं फळ मिऴालं होतं. भारतभूची संस्कृती भंजन करु पाहणा-या टिपुला अखेर त्याच भारतभूच्या मातीत मिसळावं लागलं. सर्वदूर आनंदोत्सव सुरु झाला. गुढ्या तोरणे उभारली गेली. बाटवुन मुसलमान केलेल्या हिंदूंच्या आनंदाला पारावार उरला नाही. टिपु मेल्यामुळे आता आपले हिंदू बांधव आपणाला पुन्हा हिंदू धर्मात घेतील, मुसलमानांच्या या जायबंदीतुन दास्यातुन सोडवतील अशी भाबडी आशा लावुन बसले. बटिक बनवलेल्या हिंदू स्त्रिया धावत पळत दारात खिडक्यातुन आपल्या नगरानगरातील, राज्याराज्यातील नातेवाईकांना, ओळखी-अनोळखी असलेल्यांकडे आशेने पाहुन आनंदी होत होती. त्यांना वाटत होते की हे आपले नगरजन, नातेवाईक हिंदू आपल्याला सोडवुन नेतील. मराठ्यांचं सैन्य नाचत कुदत जल्लोष करीत म्हैसुरच्या गल्लीगल्लीतुन जात असता त्या माता-भगिनींना काय तो आनंद होत होता. परंतु सारा हिंदू समाज 'शुद्धीबंदी'च्या बेडीत अडकुन पडला हेता. मराठा सैन्यातील एकाही व्यक्तीने ना हिंदू स्त्रियांना मुक्त केले ना पुरुषांना. सत्ता बदलली होती. शासक हिंदू होते. तरी कोणीही हिंदू समाजाला लागलेली 'शुद्धीबंदी'ची बेडी उखाडून फेकण्याची हिंमत दाखविली नाही. शिवाजी राजांनी बजाजी निंबाळकरांना ज्याप्रमाणे हिंदू धर्मात पुन्हा शुद्ध करुन घेतले तसे औदार्य दाखविण्याची हिंमत म्हैसुरच्या कुणाही हिंदूची होऊ शकली नाही. याचा परिणाम अतिशय वाईट झाला. त्या बटिकींपासुन झालेली पुत्र संतती पुढे स्वत:ला मुसलमान म्हणवुन घेऊ लागली व उत्तरोत्तर कट्टर मुसलमान होऊन बसली.
प्रस्तुत विचार स्वत: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 'सहा सोनेरी पाने' या ग्रंथात मांडलेले आहेत. म्हणुन ते जास्त विश्वासार्ह ठरतात. कारण सर्वधर्मसमान या विचारविकृतीमुळे कित्येक लेखकांनी आपल्या लेखणीला टिपुप्रभुती क्रुरकर्म्यांपर्यंत पोहचु दिले नाही. आपल्या लिखाणास विरोध न होता सर्वधर्मसमान विचार मांडल्यामुळे आपले कौतुकच काय ते होईल व आपली व आपल्या लेखनाची प्रसिद्धीच काय ती होईल असा स्वार्थ बाळगला. त्याचमुळे कित्येकांना कधी 'अकबर' प्रिय होतो तर कधी क्रुरकर्मा 'टिपु'. पुर्वी झालेल्या सदगुणविकृतींमुळे व सप्तबंद्यांमुळे जेवढे नुकसान झाले त्याहुनही अधिक नुकसान आजच्या सदगुण विकृत निधर्मी मुस्लीमधार्जिण्या लेखकांमुळे होत आहे. अन्यथा अकबर आणि टिपुसारखे क्रुरकर्मे आदर्श कसे होऊ शकतिल..?
संदर्भ-
१.स्वा. सावरकर लिखित 'सहा सोनेरी पाने'
२. ग्रोव्हर अँड बेल्हेकर, 'भारताचा इतिहास'
लेखन- कल्पेश गजानन जोशी
Kavesh37@yahoo.com
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख
उत्तर द्याहटवाआज हा इतिहास तरुण हिंदू पिढि समोर जाणे आवश्यक आहे
उत्तर द्याहटवा