"भंसाळी - एक (दु)प्रवृत्ती"
दिग्दर्शक व निर्माता भन्साळींच्या चित्रपटाला पुन्हा एकदा विरोध होतोय. दोन वर्षापुर्वी असाच विरोध 'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटाला होत होता. यावरुन भन्साळींची 'उपदव्यापी' अशी प्रतिमा तयार झालीय. आणि का होऊ नये? ज्या व्यक्तीला समाजाशी काही देणं घेणं नाही, राष्ट्रीय एेक्याशी काही एक घेणं नाही आणि एक कलाकार म्हणुन जो स्वत:चं कर्तव्य समजु शकत नाही त्याला उपदव्यापीच म्हंटलं पाहिजे. लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आपण कुठल्या थराला जातोय याचं भान जवळपास सगळेच सिनेसृष्टीतील कलाकार विसरलेले दिसतात. त्यातीलच एक म्हणजे भन्साळी. बाजीराव मस्तानी चित्रपटातही बाजीराव मस्तानीची प्रेमकथा अतिशयोक्तीने रंगवुन दाखविण्यात आली होती. चित्रपटातील बाजीराव-मस्तानी आणि बाजीराव-काशीबाई या जोडीचे काही हाॅटसीन दाखवले गेले होते. का? तर हाॅटसीनमुळे लोक चित्रपटाकडे आकर्षित व्हावे म्हणुन? कल्पकता करावी ती किती? ज्या व्यक्ती हयात नाहीत त्यांचं भांडवल करुन पैसे उकळायचे आणि मनोरंजन, कला, स्वातंत्र्य पुढे करुन लोकांसमोर खोट्या गोष्टी मांडायच्या. वर अभिव्यत्ती स्वातंत्र्याची बदनामी करायची.
प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही ना काही कला असतेच. म्हणुन सगळेच काही भन्साळी होत नसतात. कारण देशातल्या सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला त्याला त्याच्या अधिकारांसोबत सामाजिक कर्तव्यांचीही जाणिव असते. पण ज्यांचे मेंदू कमर्शिअल झालेले असतात, त्यांना कसली आलीय सामाजिक कर्तव्ये.? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भन्साळी प्रवृत्तीचे लोक वाट्टेल ते दाखवायला बसलेत. बरं जेव्हा लोक ह्यांच्या अश्या बदनामीकारक चित्रपटांना विरोध करतात तेव्हा ही मंडळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सेन्साॅर बोर्डाला पुढे करतात. तसा ह्यांचा कर्ताधर्ता सेन्साॅर बोर्डच. पण एखादवेळी सेन्साॅर बोर्डाने जरी यांच्या चित्रपट प्रदर्शित होण्यास हिरव्याऐवजी लाल कंदिल दिला तरी यांचा पोटशुळ होतो. अश्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य नामक शस्त्र अचुक उगारलेलं दिसतं. (उदा. चित्रपट: सेक्सी दुर्गा)
मुळात अश्या मंडळींना स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरकच कळलेला नसतो. कारण "आपल्या स्वातंत्र्यामुळे जेव्हा दुस-या व्यक्तीच्या स्वातंत्र्याला धक्का पोहचतो तेव्हा स्वैराचाराची सुरुवात झालेली असते" हे तत्व भन्साळीसारख्या उच्चभ्रू मंडळींना समजत नाही(?). अश्या मंडळींनी अधिकारांच्या फळांना चाखत असताना कर्तव्यांच्या बीयांना सोयीस्करपणे डस्टबीनचा रस्ता दाखवलेला असतो. इथेच याचे मुळ आहे.
याचाच अर्थ भन्साळी प्रवृत्तीच्या लोकांना सारंकाही त्यांच्या सोयीचं हवं असतं. समाजाच्या स्थिरतेसाठी, राष्ट्रीय ऐक्यासाठी असलेली नीतिमुल्य व कर्तव्य यांना नकोशी असतात. कारण त्यामुळे त्यांच्या पैश्याची आवक कमी होत असते. तथापी, आजही असे अनेक कलाकार आपणांस दिसतील जे समाजपुरक व राष्ट्र ही संकल्पना समोर ठेऊन त्यांच्या कला सादर करत असतात. ब-याच ठिकाणी कार्यक्रमात न नावाजलेले गायक दिसतील. ज्यांना देश काय तर एखादा जिल्हासुद्धा ओळखत नसतो. परंतु त्या गायकाला याचे भान असते की तो ज्या ठिकाणी राहतो तेथिल लोकांच्या नजरेत त्याची एक प्रतिमा बनावी. त्यासाठी तो तेथिल संस्कृती, परंपरांचा आधार घेऊन त्या परंपरा संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत सन्मानाने ठेवतो. जेणेकरुन पुढची येणारी पिढीही त्या परंपरांचा आदर करेल. आजही डोंबा-याचा खेळ दाखविणारे कलाकार असोत, मिनी सर्कस करणारे कलाकार असोत, सापाचे खेळ दाखवणारे असोत किंवा जादुचे खेळ दाखवणारे कलाकार असोत. सारेच कलाकार खेळ संपल्यानंतर प्रेक्षकवर्गातील लोकांपर्यंत जाऊन नमस्कारही करतात, सलामही करतात, रामरामही करतात आणि आदआबही करतात. याचे कारण काय असु शकेल याचा भन्साळी प्रवृत्तीने अवश्य विचार करावा. भन्साळींना व्यक्तीश: बोलण्यात काही अर्थ नाहिये. कारण आज सिनेसृष्टीत भन्साळीसारखे बहुतांश कलाकार असेच आहेत, ज्यांना फक्त पैसा प्रिय आहे. बाकी देश-बीश समाज-बिमाज याच्याशी त्यांना काही एक देणंघेणं नाहिये. देशातल्या भूतकाळातल्या महापुरुषांचा हवातसा वापर करायचा व काल्पनिक रंगरंगोटी करुन चित्रपट तयार करुन पैसे कमवायचे. चांगली कमाई झाली की विदेशात मजा मारत फिरायचं. हीच ह्यांची लाईफस्टाईल! हीच लाईफस्टाईल बहुतांशी कलाकारांमध्ये पहावयास मिळते. म्हणुन, भन्साळी ही व्यक्ती नाही तर प्रवृत्तीच म्हणणे जास्त रास्त ठरते.
"सुचेल ते लिहावे, सुचेल ते मांडावे
विरोधचिन्हे पाहुन
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवावे.." हीच ती वृत्ती.
या अभिव्यक्ती स्वातंत्र्य नामक शस्त्राचीही एक खासियत आहे बरं का. "हे शस्त्र तुम्ही मेलेल्या व्यक्तींवर निडरपणे उगारु शकतात!" कारण त्याला विरोध करण्यासाठी ती व्यक्ती शिल्लक नसते ना. मग त्या व्यक्तीच्या वंशजांची, नातलगांची बदनामी झाली तर होवोत. पण ते मात्र अभिव्यक्त होणे असते. परंतु एखादी व्यक्ती जीवंत व्यक्तीबाबत अभिव्यक्त झाली आणि एखाद्याची अब्रु चव्हाट्यावर आणली तर चालेल काय? भन्साळीची पत्नी बहिण किंवा नातलग अप्रतिम, सुंदर, लावण्यखणी आहे. म्हणुन मला वाटेल तसं तिच्या अब्रुची पर्वा न करता तिच्याविषयी लेखन करणं, चित्रे काढणं, लघुपट बनवणं किंवा इतर कुठल्याही मार्गानं अभिव्यक्त होणं योग्य ठरेल काय? तिच्या अब्रुवर शिंतोडे उडू लागले तर ती अब्रुनुकसानीचा दावा ठोकल्याशिवाय राहणार नाही. कारण फक्त एकच 'ती व्यक्ती जीवंत आहे'! पण त्याच व्यक्तीच्या मृत्युनंतर कुणीही वाटेल तसं तिच्याविषयी अभिव्यक्त होऊ शकतं. कारण तेव्हा ती 'मस्तानी', 'पद्मावती', 'काशीबाई' झालेली असते. एकुणच काय तर ती मृत असते. जीवंत व्यक्तीच्या अब्रुचे विनय संरक्षण करणारे कायदे मृतव्यक्तींबाबत नाहिसे झालेले असतात. मग असेच असेल तर मेलेल्या मुर्द्यांना भारतरत्न तरी द्यायचे कश्यासाठी? वैकुंठवासी झालेल्यांचे स्मारक आणि पुतळे उभारावे तरी कश्यासाठी? मेल्यानंतरही ज्यांचा छळ होतो, कधी पुतळे कापले जातात, कधी चारित्र्यहनन होते, कधी काल्पनिक प्रेमकथा रंगवल्या जातात. त्यांचा विचार घटनारक्षक का करत नाही? याचा विचार झाला पाहिजे. कारण, ती व्यक्ती भलेही मृत असेल. तिचं अस्तित्व नसेल. पण ती व्यक्ती कुणासाठी आदर्श असेल तर.? त्या व्यक्तीचे नातलग, हितचिंतक, आप्तेष्ट हयात असतिल तर? साहजिकच या सर्व व्यक्तींच्या भावना दुखावल्या जाणार. आपल्या माणसाची जीवंतपणी बदनामी झाल्यावर जितके वाईट वाटते तितकेच ती व्यक्ती मृत असल्यानंतरही वाटणे स्वाभाविक आहे. कारण, त्या व्यक्तीचं भौतिक स्वरुप नष्ट झाले असेल; पण कित्येकांच्या स्मरणात ती व्यक्ती चिरंजीव झालेली असते. 'राणी पद्मावती'सुद्धा काहीशी अशीच बळी पडलेली आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर ज्या स्त्रीने म्लेंच्छांचे अपवित्र हात अंगावर पडू न देता सहस्त्रावधी महिलांसोबत अग्नीकुंडात उड्या घेतल्या पण, बाटुन मुसलमान झाल्या नाहीत. म्हणुन या महान वीरांगणेच्या स्मृती आजही जीवंत आहेत. मग शेकडो वर्षांनंतर पुन्हा तिच्या अब्रुवर हात टाकणा-या भन्साळीयुक्त खिलजींची हयगय कशी काय केली जाईल...?
-कल्पेश गजानन जोशी (सोयगांवकर)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा