#"फाशीच्या शिक्षेचे आव्हान"#
#..फाशीच्या शिक्षेचे आव्हान..#
न्याय, समता, बंधुता या मुलतत्वांना समाज व्यवस्थेत जितके उच्च स्थान दिले तितका समाज सुरक्षित, सुसंस्कृत व विवेकी बनतो. पण समानतेचा विचार करण्याला काही लगाम असतो का? जर असेल तर त्यांना कुठे ताण द्यावा आणि कुठे सैल सोडावे? असे काहीसे प्रश्न पडतात, जेव्हा समानतेचा विचार एखाद्या गोष्टीच्या दोन अंगांना स्पर्श करू लागतो. अश्याच एका प्रकरणाने समानतेचा तराजू हेलकावे खाऊ लागला आहे. निमित्त्य आहे सुप्रीम कोर्टात केलेल्या एका याचिकेचे. “फाशीची शिक्षा असंवैधानिक असून जीवन संपवण्याची ती सन्मान जनक पद्धत नाही” अश्या प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यासाठी फाशीमागची समानता तपासुन पाहण्याची वेळ आली आहे.
‘त्रास रहित मरणाचा अधिकार’ आणि ‘सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकारा’मुळे फाशीच्या शिक्षेला आव्हान मिळाले आहे. ज्या प्रमाणे ‘डोळ्यासाठी डोळा’ हे तत्व पटू शकत नाही, मग ‘मृत्यूसाथी मृत्यू’ हे तत्व कसे पटू शकते.? तसेच, केवळ फाशीच्या शिक्षांमुळे गुन्हेगारीला पूर्णत: आळा बसला आहे का? हे प्रश्न सामान्य माणसास विचार करण्यास भाग पाडतात. अॅमनेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संस्थेने “व्यक्तिंना मारणे हे चुकीचे आहे हे सांगण्यासाठी आपण त्या व्यक्तिला का मारतो?” हा मुख्य प्रश्न केला आहे. यामागे तार्किक विचार आहे. आणि या मार्मिक प्रश्नावरच सगळे कोलाहल सुरु झाले आहे. पण, असे असले तरी फाशीची शिक्षा एकदम चुकीची कशी ठरू शकते. आपल्या घटनाकर्त्यांना या गोष्टींची पूर्णत: कल्पना होती. त्यांनाही भावना होत्याच. स्वातंत्र्यलढे, ब्रिटीशांचे जुलूम, अघोरी निर्दयी शिक्षा, भारत-पाकिस्तानची फाळणी व त्यात उसळलेला जातीय-धार्मिक नरसंहार हे सगळं त्यांनी अनुभवलेलं होतं. इंग्रज भारतीयांना देहदंडाच्या व त्यातही फाशीच्या शिक्षा जास्त ठोठावत होते. जेणेकरुन भारतीयांवर त्यांच्या कायद्याचा वचक बसावा व त्यांनी कुठले बंड पुकारु नये. पण १८५७ ला भारतीय जनतेदेखत मंगल पाडेंना फाशी दिली गेली. त्याचा परिणाम उलट होऊन जनतेमध्ये ब्रिटिशांविषयी संताप आणि बंड करुन उठण्याची ठिणगी पडली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भगतसिंगांसहित अनेक देशभक्तांना फाशी झाली होती आणि त्याविषयी जनतेतील प्रतिक्रियाही पाहिल्या होत्या. त्यामुळे एक फाशी काय अनर्थ घडवू शकते हेही घटनाकर्त्यांनी अनुभवलेलं होतं. या घटनांचा प्रभाव घटनेवर नक्कीच पडलेला आहे. त्यामुळेच निव्वळ भावनिक आधारावर नाही, तर न्याय संस्थेने सखोल विचारा अंती, दोन्ही पक्षाच्या बाजू निष्पक्ष ऐकून घेऊन दोषी ठरलेल्या व्यक्तीस शिक्षा ठोठावलेली असते. तरीही त्या व्यक्तिला वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची मुभा असते आणि राष्ट्रपतीकडहीे दयेचा अर्जही करता येतो. सदर सदोष व्यक्तीबाबत विवेकबुद्धीने विचार करून राष्ट्रपती दयेचा अर्ज मंजूर करतात किंवा फेटाळतात. म्हणजेच, एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया पार पडते. म्हणून फाशीची शिक्षा अव्यवहार्य ठरवता येणार नाही. भावनेच्या आधारावर जशी फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, तशी भावनेच्या आधारावर रद्द तरी कशी होऊ शकते.?
पण तरीही मुलतत्ववाद, नैतिकमुल्ये, व्यक्तीस्वातंत्र्य आणि मानवाधिकाराआडून घटनेतील अनेक कलमांना आव्हान दिले गेले आहे. फाशीच्या शिक्षेमुळे गुन्हे जरी पुर्णपणे संपुष्टात आले नसतील, पण कुठे तरी गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याचा वचक हा असतोच. काही कठोर शिक्षेमुळे गुन्हे करताना भीती निर्माण होतेच. ज्या व्यक्तिला कायद्याचे काहीही ज्ञान नसते, किंबहुना घटना कशी तयार झाली हेही त्यांना ठाऊक नसते, त्यांच्या मनात खटल्यांच्या लांबलचक चालणार्या प्रक्रियेमुळे आणि गुन्हेगाराला न मिळालेल्या दंडामुळे कायद्याविषयी उदासिनता निर्माण होते. आजही काही टवाळखोर, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणि जे गुन्हे करूनही काही पळवाटांमुळे सुटलेले असतात अश्यांच्या मनात कायद्याविषयी अजिबात भय नसते. त्यांच्या वागण्या बोलण्यातून उगवत्या गुन्हेगारांना पाठबळ मिळत असते. अश्या प्रवृत्तीच्या लोकांना जेव्हा मोठी शिक्षा होते किंवा फाशी होते, तेव्हा मरणाच्या भीतीने ते न्यायालयातच धाय ओकून रडू लागतात.त्याच्या एकट्याच्या झालेल्या शिक्षेमुळे त्याच्या गोटातील व देशातील इतर गुंड प्रवृत्तीचे लोक वठणीवर आलेले असतात. निदान त्यांना जरब तरी बसतेच. शिक्षेमुळे हाच धाक निर्माण होत असतो व तो आवश्यक असतो. कारण त्या एका शिक्षेमुळे भविष्यात गुन्हे करणार्यांची संख्या कमी होत असते. खून होऊन, प्राणघातक हल्ले होऊन, आणि पर्यायाने फाशी होऊन मरणार्यांचीही संख्या कमी होत असते. समाजात कायद्याविषयी आदरयुक्त भीती पाहिजे. यासाठी शिक्षा महत्वाच्या ठरतात.
परंतु, तरीही फाशीची शिक्षा क्लेशदायक आहे हे कोणीही नाकारु शकत नाही. म्हणुन फाशीच्या शिक्षेला पर्याय निर्माण करणे पटू शकते. पण, फाशी किंवा देहांत शिक्षा रद्दच होणे धोकादायक ठरू शकते. यामुळे गुंड मोकाट सुटतील आणि आतंकवाद्यांसाठी तर भारत नंदनवन होईल. जनतेचाही कायद्यावरचा विश्वास उडेल व लोक कायदा हातात घेऊ लागतील. फाशीची शिक्षा रद्द झाली तर मानवाधिकारचे संरक्षक आणि उदात्त विचारसरणीचे म्हणून अनेकांची पाठ थोपटली जाईल. पण, ज्या ज्या गुन्हेगारांना आजपर्यंतच्या मृत्युदंडाच्या शिक्षेमुळे फाशी झाली आहे, त्यांच्या आई-वडिलांनी, नातेवाईकांनी किंवा जनतेनेच त्या त्या व्यक्तींवर अन्याय झाल्याचा आरोप केला, तर त्यांना काय उत्तर द्यायचे याचाही विचार आताच करून ठेवलेला बरा. कारण, अशी वेळ निर्माण झाल्यावर लोक सरकार आणि न्यायव्यवस्थेवरच नाराज झालेले असतिल.
यासाठी दरवर्षी किती जणांना फाशीची किंवा मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली जाते, किती जणांना कनिष्ठ न्यायालयाकडून शिक्षा ठोठावल्या जातात, सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिल्यावर किती कायम राहतात, सर्वोच्च न्यायालयात किती जणांना फाशीची शिक्षा ठोठावली जाते व त्यापैकि किती जणांना राष्ट्रपतींकडून दयेचा अर्ज फेटाळून फाशी होते? याचे प्रमाण काढले गेले तर ते अतिशय कमी असेल यात शंका नाही. परंतु, ज्यांना फाशी होते त्यात बहुतांश व्यसनी, अशिक्षित, गरीब किंवा मध्यमवर्गीय असतात. पांढरपेशे किंवा व्हाइटकॉलर गुन्हेगार अद्यापही मोकाट दिसून येतात हे खरे आहे. कायद्याचे हात जरी लांब असले तरी व्हाइट कॉलरवाल्या आम आदमीपर्यंत ते पोहचतात का? हा सवाल असतोच. शेवटी जो प्रत्यक्ष गुन्हा करतो त्याला फाशी होईलही. पण त्या समाजाचं काय ज्याने त्या व्यक्तिला गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जात असतानाच अडवलं नाही? त्या समाजाचं काय, ज्याने त्या व्यक्तीला व्यसनाकडे आकर्षित होताना पहिलं पण कधी रोखलं नाही.? त्या समाजाचं काय, ज्याने बलात्कार होताना पहिलं, खून होताना पहिलं, एका स्त्रीची छेड काढताना पहिलं, चोरी करताना पहिलं. त्याला विरोध करण सोडाच पण, पोलिसांनाच मदत करणं जाणीवपूर्वक टाळलं. अश्या समाजाचं काय? मग त्या समाजाच्या आग्रहास्तव त्या गुन्हेगाराला शिक्षा का व्हावी? ज्याला गुन्हा करताना ह्याच काही सामाजिक घटकांनी कळत नकळत खतपाणी दिलेले असते. असे असंख्य प्रश्न शेवटी अनुत्तरितच राहतात. कारण गुन्हेगार तेवढा दिसतो. पण त्याला गुन्हा करण्यासाठी काही पोषक घटक असतात ते अदृश्यच राहतात. तूर्तास, भारताची न्याय व्यवस्था, संसद, सरकार, विचारवंत, कायद्याचे अभ्यासक फाशीची शिक्षा कायम ठेवतात की बंद करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
-कल्पेश गजानन जोशी (सोयगांवकर)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा