‘लोकमान्य Vs भाऊसाहेब’

                                        

आजकाल  श्रेयवाद ही जणू नित्याचीच बाब झाली आहे. भूतकाळातील काही गोष्टीचा परस्पर संबंध लावून किंवा एखाद दोन उदाहरणावरून त्या व्यक्तीच्या आयुष्य भरातील कार्याचे अपवाद शोधायला सुरुवात होते आणि आपल्याला हवे तसे रंग त्या व्यक्तीच्या व्यक्तिरेखेला देता येतात व आपण किंवा आपली संस्था, संघटना कश्या इतरांपेक्षा वेगळया आहेत असा लौकिक वाढवण्याचा प्रयत्न यातून साध्य केला जातो. आताचा नवीन मुद्दा म्हणजे गणेशोत्सवाचे जनक कोण?’ हा.

      लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असण्याला काहींनी आक्षेप घेतला आहे. खरं तर या वर्षी टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ वर्ष पूर्ण झालेत. त्याचा उत्सव साजरा करणे दूरच पण श्रेयवाद मात्र फोफावला. तसे पहिले जाता सार्वजनिक हा शब्दच मुळात सगळ्या शंका कुशंका दूर करतो. कारण गणेशोत्सवाचा इतिहास पाहायला गेले तर तो काही दीड-दोनशे वर्षापूर्वीचा नाही हे लक्षात येते. म्हणजे तो लोकमान्य टिळकांनी सुरू केला असेही म्हणता येणार नाही. कारण, राजे रजवाडे व संस्थांनीकांकडे गणेशोत्सव नियमित साजरा होत असे. पुण्यात शनिवार वाड्यात पेशव्यांच्या दरबारीही गणेशोत्सव साजरा होत असे याचे अनेक उल्लेख मिळतात. एवढेच काय तर इतिहासाचार्य वी. के. राजवाडे यांनी तर सातवाहन’, चालुक्यराष्ट्रकूट यांच्या काळातही गणेशोत्सव साजरा होत असे, असे संशोधन केले आहे. असे असताना पुण्याच्या भाऊसाहेब रंगारी मंडळाचे म्हणणे आहे की गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनीच १८९२ साली केली तर हे विधान निरर्थक ठरतं. मग प्रश्न पडतो की लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक का म्हणावे?’ खरं तर गणेशोत्सवाच्या जनकत्वावर चर्चा करण्यापेक्षा सार्वजनिक गणेशोत्सवाचे श्रेय लोकमान्यांना का द्यावे लागते? यावर चर्चा व्हायला हवी. कारण सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्यांनी पुजा, आरती आणि सत्यनारायण एवढ्या पुरता मर्यादित न ठेवता त्याचा उपयोग जन माणसात देशभक्ती रुजवण्यासाठी व ब्रिटीशांविरुद्ध चळवळ उभी करण्यासाठी केला. १८५७ च्या स्वातंत्र्य समरमुळे ब्रिटिशांना भारतीयांच्या एकीचा जबर हिसका बसला होता. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी भारतीय एकत्र होत त्या त्या ठिकाणी ब्रिटिश पाळत ठेवत असे. बर्‍याचदा जमावबंदी लागू केली जाई. त्यामुळे क्रांतीकारकांना जनमाणसात स्वातंत्र्याची चिंगार फुंकण्यास अडचण निर्माण होत असे. अश्या प्रसंगी लोकमान्यांनी गणेशोत्सवाचा स्वातंत्र्यासाठी व तरुणांमध्ये देशभक्ती निर्माण करण्यासाठी उपयोग केला. ब्रिटिश गणेशोत्सव आणि शिवजयंतीला विरोध करू शकणार नाही याची टिळकांना पूर्ण जाणीव होती. कारण भारतीयांचे परंपरागत चालत आलेले ते उत्सव होते. भारतीयांची अस्मिता त्याच्याशी जोडली गेली होती. ब्रिटीशांनी त्याला विरोध केला असता तर कदाचित १८५७ चं छोटं प्रारूप त्यांना पुन्हा पाहावं लागलं असतं. कारण गणपती भारतीयांचा धर्मभाव तर शिवाजी भारतीयांचे श्रद्धाभाव होते. याला ब्रिटिश धक्का लावू शकणार नाहीत हे टिळकांना माहीत होते. म्हणूनच लोकमान्यांनी गणेशोत्सवाचे रूपांतर सार्वजनिक गणेशोत्सवात केले. सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रचार आणि प्रसार केला. चाफेकर बंधूसारखे देशभक्त युवक टिळकांना या सार्वजनिक गणेशोत्सवातुन मिळाले हेच तर खरे लोकमान्यांचे आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे यश होते. टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर जाऊन पार कराची व सिंध प्रांतापर्यंत जाऊन पोहचला. परकीय इंग्रजांच्या विरोधात स्वकीय भारतीय एकत्र येऊ लागले. शूद्र व अस्पृश्य समजल्या गेलेल्या लोकांसाठी टिळकांनी देवघरातला गणपती चार चौघात, रस्त्यावर व पटांगणावर आणला. समाजातल्या गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, मजूर-व्यापारी, शेतकरी-कष्टकरी सर्व वर्गात गणेशोत्सव साजरी होऊ लागला. गणेशोत्सव भारतात अनेक शहरात, राजवाड्यात साजरा होत होता पण त्याचे अनुकरण अजून कोणीही केले नव्हते. गणेशोत्सव एका चौकटीत बंदिस्त होता. परंतु टिळकांचा सार्वजनिक गणेशोत्सव सर्व स्तरातील भारतीयांना भावला. पूर्वीपासून चालत आलेला गणेशोत्सव लोकमान्यांमुळे देशाच्या कान्या कोपर्‍यात पोहचला. म्हणूनच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या श्रेयवादात लोकमान्य टिळक श्रेष्ठ ठरतात. म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळकांना म्हणावे लागते.

      सत्य असे असले तरी काही लोकांना ही बाब पचनी पडेलच असे नाही. कारण टिळकांच्या गणेशोत्सवापेक्षा त्यांना टिळकांची जात नडत असावी. टिळकांनी देवघरातील गणपती रस्त्यावर आणल्यामुळे त्याकाळी काही प्रतिगाम्यांनी त्यांना विरोध केला होता. पण आज टिळकांना विरोध करणारे स्वतःला पुरोगामी (?) म्हणवणारेच आहेत. ही तर पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी बाब नाही.

      हाच मुद्दा जरा दुस-या बाजुने उलगडून पाहू.  भारताच्या इतिहासात स्त्रियांना शिक्षणाचे स्वातंत्र्य होते याचे उदाहरणे व पुरावे मिळतात. वेद, पुराणे व ग्रंथनिर्मितीत काही स्त्रियांचा सहभाग होता. स्त्रिया सुद्धा अनेक विद्या आत्मसात करत असत. परंतु आधुनिक भारत उगवेपर्यंत याचे प्रमाण अत्यल्प झाले. म्हणून आधुनिक भारतात स्त्रियांनाही शिक्षण मिळावे अशी इच्छा जगन्नाथ शंकरशेठ यांची होती. मुंबई येथे स्वतःच्या राहत्या घरी त्यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून मुलींसाठी शाळा सुरू केली. महात्मा फुलेंची शाळा सुरू होण्याआधी कित्येक वर्ष पूर्वीचं हे पाऊल होतं हे विशेष. शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही हे ओळखून सन १८२२ मध्ये एल्फिन्स्टन यांच्या मदतीने बॉम्बे नेटीव्ह एजुकेशन सोसायटीची सुरुवात केली. या सोसायटीने मुंबईत व मुंबईबाहेर मुलामुलींसाठी शाळा सुरू केल्या. पुढे त्यांनी एल्फिन्स्टन एजुकेशन सोसायटी सुरू केली. जे आजतागायत सुरु आहे. समाजातल्या कुप्रथा, अस्पृश्यता, अंधश्रद्धा याला त्यांचा विरोध होता. मुंबई विद्यापीठाच्या उभारणीमागेही त्यांचा महत्वाचा सहभाग होता. तसेच स्त्रियांच्या शिक्षणासाठी व हक्कासाठी लोकहितवादी, भाऊ दाजी लाड, बाबा पद्मनजी, विष्णु शास्त्री पंडित, डॉ. भांडारकर, गोपाल गणेश अगरकर, पंडिता रमाबाई, न्यायमूर्ती रानडे, रमाबाई रानडे यांसारख्या अनेक समाजसुधारकांनी योगदान दिले होते. परंतु स्त्री शिक्षणाचे प्रमुख सुधारक म्हंटले की बिनदिक्कत श्रेय दिले जाते ते 'महात्मा फुले' यांना. कारण का तर, इतर सुधारकांचे कार्य जरी स्त्रियांच्या उद्धारासाठी महत्वपूर्ण असले तरी महात्मा फुलेंचे व सावित्रीबाई फुलेंचे कार्य इतरांपेक्षा अलौकिक होते. त्यांच्या कार्यामुळे एक लोकचळवळ उभी राहिली होती. ज्याचे देशाच्या सामाजिक पटलावर दूरगामी परिणाम झाले होते. म्हणूनच लोकांनी ज्योतीबांना महात्मा ही पदवी दिली. आजही स्त्री शिक्षणाचा विषय निघताच आठवतात ते महात्मा फुलेसावित्रीबाई फुले’! म्हणूनच स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुलेच ठरतात! तसेच दलितोद्धारासाठी व शोषित वंचित समाजासाठी स्वा. सावरकरांसह अनेक नेत्यांनी व समाज सुधारकांनीही प्रयत्न केलेच होते. ते कोणीही नाकारु शकत नाही. पण दलितांच्या आणि अस्पृश्यांच्या उद्धाराचा विषय येतो तेव्हा आठवतात ते आंबेडकर’, शाहू’, फुले’. अर्थात या व्यक्तींचे कार्य इतरांपेक्षा अलौकिक व असामान्य होते. त्यांचे कार्य अगदी देशाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचले होते. म्हणून दलित, शोषित, वंचित यांच्या हक्कासाठी लढणार्‍यांच्या यादीत ते सर्वश्रेष्ठ ठरतात.

      भूतकाळात होऊन गेलेल्या व्यक्तींच्या नावावरून श्रेयवाद करणे आजच्या सुशिक्षित समाजाला शोभनीय आहे का? हे सुज्ञ समाज ठरवेलच. पण, आज लोकमान्य विरुद्ध रंगारी असा उद्भवलेला वाद उद्या जगन्नाथ शंकरशेठ विरुद्ध महामा फुले किंवा सावरकर विरुद्ध आंबेडकर असा निर्माण झाला तर त्याला जबाबदार कोण असणार? महापुरुषांच्या नावावरुन असेच श्रेयवाद सुरू झाले तर ते सुशिक्षित आणि सामाजिक समरसता जोपासणार्‍या समाजाला काळिमा फासणारे असेल. कारण, जे लोक महापुरुषांवरून वाद उभे करतात त्यांना केवळ स्वत:च्या प्रसिद्धीसाठी भांडवल हवे असते. त्यामागे छुपा राजकीय डाव असतो. परंतु अश्या लोकांच्या विकृतीमुळे कुण्या काळी स्वातंत्र्य लढ्यात व  सामाजिक लढ्यात विजयश्री मिळवलेले महापुरुष आजच्या सुशिक्षित निर्बुद्ध लोकांमुळे हताश होत असतील यात शंका नाही.

-कल्पेश गजानन जोशी, सोयगांवकर



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान