#फार्मासिस्ट? कोण आम्ही??#

   आज फार्मासिस्ट विद्यार्थी व नोकरीवर्ग यांच्या हक्कावर आणि स्वातंत्र्यावर (विशेषत: महाराष्ट्रात)गदा येत आहे व त्यांना दुर्लक्षीत केलं जात आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या हक्क व मागण्यांसाठी एकत्र येवुन 'फार्माक्रांती' घडवण्याची गरज निर्माण झाली आहे.

     विसाव्या शतकाच्या अगदी मध्यापासुन ' औषध-निर्माण-शास्त्र' क्षेत्रात नानाविध नियम व अटींमुळे व्यापार व निर्मिती क्षेत्रात आमुलाग्र बदल होत आले. औषध व औषधी रसायनांचा गैरवापर रोखण्यासाठी तसेच व्यापारविषयक अनिर्बंधता व मनमानी रोखण्यासाठी विविध कायदे लागु केले गेले व यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कामकाजात सुव्यवस्था ठेवण्यासाठी 'फार्मसी काऊन्सील आॅफ इंडीया' ची स्थापना झाली. तसेच स्वतंत्र राज्यासाठी मुख्य कार्यालय म्हणुन 'स्टेट फार्मसी काऊंन्सील'ची स्थापना झाली. औषधनिर्माणशास्र क्षेत्रात ही १९५० ते २००० या पाच दशकात झालेली क्रांतीच मानावी लागेल आणि यासाठी अथक परिश्रम घेणारे नक्कीच कौतुकास्पद आहे. परंतु या कालखंडात व पुढील काही काळात औषध निर्मात्यांच्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी, अन्याय रोखण्यासाठी व
औषधनिर्माण शास्राचं शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा उत्कर्ष होण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले दिसत नाही.

   आज फक्त महाराष्ट्र राज्याचा विचार करायचा म्हटलं तर महाराष्ट्रात जवळजवळ ३२५ काही छोट्या तर काही मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये सद्य स्थितीला जास्तीत जास्त अधिकारी व कर्मचारी हे फार्मसी व्यतिरीक्त शिक्षण घेतलेले दिसतात. ( विशेषत: बी.एस.सी. किंवा एम.एस.सी.) त्या प्रमाणात फार्मसी शिक्षीत पदाधिकारी खूपच कमी आहेत. हा फार्मसी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यावर खूप मोठा अन्याय आहे!
कारण १) फार्मसीचं शिक्षण घेतलेले विद्यार्थी केवळ फार्मास्युटीकल कंपन्यांमध्येच काम करु शकतात (नियमानुसार) आणि याउलट फार्मसी न शिकलेले विद्यार्थी ( विशेषत: बी.एस.सी. किंवा एम.एस.सी.) फार्मास्युटीकल कंपन्यांमध्येही नोकरी करतात व इतर दुसर्या फार्मा व्यतिरिक्त कंपन्यांमध्येही नोकरी करु शकतात. त्यामुळे फार्मासिस्ट विद्यार्थ्यांच्या त्यांच्या हक्काच्या जागा हडप होऊन ते नोकरीपासुन वंचित राहतात.
२)फार्मसी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन प्रवेश फी बी.एस.सी च्या तुलनेत फार जास्त आहे.
३)फार्मसीचं संपुर्ण पदवी शिक्षण बी.एस.सी च्या मानाने एक वर्ष जास्त आहे. ४)अभ्यासक्रमाचा विचार करता बी.एस.सी च्या विद्यार्थ्यांना औषधनिर्माणीचं ज्ञान होईल असा त्यांचा अभ्यासक्रम अजिबात नसतो.
मग कोणत्या कारणांमुळे फार्मसी शिकणार्या विद्यार्थ्यांना दुय्यम दर्जा मिळतो? हा फार्मसीचं शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का?
  महाराष्ट्रात एकुण १६१ औषध निर्माणशास्र पदवी शिक्षणाचे महाविद्यालये आहेत आणि दर वर्षी पदवी शिक्षण (Degree) घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी जवळ जवळ ११ हजार आहेत. त्याचप्रमाणे औषधनिर्माण शास्त्र पदविका शिक्षण (Diploma) महाविद्यालये २१६ असुन दरवर्षी १४ हजारांवर विद्यार्थी पदविका शिक्षण पुर्ण करुन बाहेर पडतात. म्हणजेच एकुण २५ हजार विद्यार्थी औषध निर्माणशास्त्राचं शिक्षण घेऊन दरवर्षी बाहेर पडतात पण त्यांना रोजगारच मिळत नाही! याचं कारण काय?
आज फार्मसी शिक्षण घेणारे विद्यार्थी नोकरी विषयात प्रचंड तणावाखाली असलेले दिसुन येतात. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये काऊन्सीलींगचे कार्यक्रम घेतले जातात. सेमीनार घेतले जातात. पण माझ्या मते विद्यार्थ्यांना काऊन्सीलींगपेक्षा आणि सेमिनारपेक्षा भविष्यातील नोकरीच्या संधी आणि त्यातील यश कसे मिळवावे याचे दाखले देेेेऊन विश्वास देण्याची गरज आहे! कारण आजारी व्यक्तीला फक्त धीर देऊन भागत नाही तर औषधही द्यावं लागतं. आज औषध निर्माण करणार्या विद्यार्थ्यांनाच या औषधाची खास गरज आहे!

   फार्मासिस्ट बंधुंनो आपला लढा आपल्यालाच द्यावा लागणार आहे. आपणास स्वजागृती करुन इतरांनाही जागृत करावं लागणार आहे. वास्तवात आपलं शिक्षण हे अतिउच्च शिक्षण आहे. परंतु आपण आपल्या संकुचित मानसिकतेच्या साखळदंडात करकचुन बांधले गेलो आहोत. तसं नसतं तर वैद्यकिय शिक्षण घेणार्यां इतरांच्या तुलनेत आपण मागे राहीलो नसतो. वैद्यापेक्षाही उच्चपद आपलं असताना आपण आपली ओळख फक्त 'मेडीकलवाला' हीच करुन ठेवली आहे. समाजात जो तो आपले हक्क मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपल्यालाही आपले हक्क व अधिकार मानाचं स्थान मिळवायचं असेल तर आजच जागे व्हा! अन्यथा पुढील काही वर्षात आपल्याला कवडीमोल किंमत उरणार नाही...!!
...जागो! फार्मासिस्ट जागो!!...

- DRx कल्पेश जोशी (सोयगांव)
Kavesh37@yahoo.com
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान