वसई किल्ला (जंजाळा)
वसई (जंजाळा) किल्ला- सोयगांवचे प्रवासी वर्णन करणारा लेख: "वसई किल्ला- सोयगांव"
साधु संतांच्या पदस्पर्शाने व आशीर्वादाने समृद्ध झालेलं व अनेक ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभलेले मराठवाडा व खान्देश यांच्या सीमेवर वसलेलं गांव...'सोयगांव'..! या गावाची व एकुणच तालुक्याची ओळख करुन देताना सहजच ओठांवर नावे येतात ती जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, भगवान शंकरांचं देऊळ असलेले 'रुद्रेश्वर'(लेणी) व मुर्डेश्वर (देऊळ), वाडी किल्ला, घटोत्कच लेणी आणि 'वसई किल्ला'..! ही सर्व ऐतिहासिक स्थळे शहराच्या दक्षिणेकडील सातमाळा डोंगराच्या द-याखो-यात वसलेली आहेत. या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या स्थळांपैकीच एक म्हणजे 'वसई किल्ला'!


सोयगाव शहराच्या दक्षिणेला सातमाळा डोंगराच्या अंगाखांद्यावर हा किल्ला विराजित आहे. सातमाळा डोंगररांगांमध्ये ऐतिहासिक वास्तुस्थळांची मांदीयाळीच आहे. उजवीकडे जवळच वाडी किल्ला, डावीकडे अंतुर किल्ला व मध्यभागी वसई किल्ला विराजित आहे. जवळच असलेल्या 'वसई' गावामुळे त्यास 'वसई किल्ला' अशी ओळख पडली असावी. त्याची अवस्था मात्र एखाद्या शक्तीहीन अज्ञात मृत्युच्या दारात तडफडत पडलेल्या वृद्धासारखी झालेली आहे. एकेकाळी समृद्ध संपन्न असलेला व विजयाच्या ललकार्यांचा आपल्या भित्तींकर्णांवरील वर्षाव ऐकुन अभिमानाने आपल्या कोटाची छाती फुगवून हा किल्ला त्या डोंगरावर पाय रोवून उभा असेल पण आज त्याची जटायुप्रमाणे दयनीय अवस्था आहे. विशेष प्रसिद्धी नसल्यामुळे कोणीही तिकडे फिरकत नसावे त्यामुळे किल्ल्यापर्यंत पर्यंत पोचण्यासाठी चांगला मार्ग नाही पण आडमार्गाने व गुरांख्यांच्या पाऊलवाटेने किंवा जंजाळामार्गे तिथपर्यंत पोचता येते. सागवृक्ष, पळस, खैर, कड, ढांबोळी, वेळु, सिताफळ, भोकर यांच्या संगतीत तसेच करवंद व बाभळीच्या काटेरी वनात 'वसई किल्ला' निपचित पडला आहे.
किल्ल्यासमोरील टेकडीवरुन संपुर्ण किल्ला एका बाजुने न्याहाळता येतो. सद्दस्थितीत किल्ल्याची पडझड होऊनही साधारण पाच-सहाशे मीटरपर्यंत किल्ल्याची लांबी असावी असा अंदाज नक्की काढता येतो. किल्ल्याच्या पायथ्यापासुन थोड्या अंतरावर अलीकडेच एक- दोन छोट्या खोल्या दिसुन येतात. ज्या भग्नावस्थेत आहे. पण त्याची रचना पाहुन त्या त्याकाळी चौकीदारासाठी बनवलेल्या 'चौकी' असाव्यात असा अंदाज आहे.
जीर्ण असुनही किल्ल्याची तटबंदी चांगल्या अवस्थेत असुन तटबंदीवर ठरावीक अंतरावर नक्षीदार वळणं देऊन खिडक्यादेखील काढलेल्या दिसुन येतात. किल्ल्याच्या पुर्व दिशेला मुख्य द्वार असुन पायथ्याशी दगडी शिळांच्या पाय-या आहेत. किल्ल्यावर ३ ते ४ बुरुज आहेत पण भग्न अवस्थेत. बुरुजाच्या काळ्याशार चौकोनी व आयताकृती शिळा कोसळुन इतस्त: विखुरल्या आहेत. शिळा एकमेकांना जोडण्यासाठी पांढ-या रंगांचा चुन्यासारखा पदार्थ वापरलेला दिसतो. त्याकाळी बहुतेक चुना व जडीबूटींचा वापर करुन सिमेंट तयार केले जात असावे. त्या सिमेंटची जोडणी व बांधणी अजुनही टिकाव धरुन आहे हे विशेष!
प्रवेशद्वाराची पडझड झालेली आहे पण स्तंभ अजुनही ताठरपणे उभे आहेत. काळ्या पाषाणापासुन तयार केलेल्या स्तंभावर नक्षीकाम केलेले दिसुन येते. किल्ल्यावर छत्र नसुन ते ब-याच वर्षापुर्वी ढासळले असावे. आत शिरताना ठराविक प्रवेशद्वारापुढे कोनाडे दिसुन येतात. या कोनाड्यांचा वापर रात्रीच्यावेळी दिवाबत्तीसाठी होत असावा. तसेच प्रत्येक कोपर्यात साधारण आठ फुटवर दहा इंचेच्या चौरसाकृती दगडी फरश्या बसवलेल्या आहेत. याचा वापर मशाली उभ्या करण्यासाठी करत. आत गेल्यावर एक अजुन लहान द्वार दिसुन येते. द्वार ओलांडून पुढे दोन्ही बाजुंना खोल्या काढलेल्या आहेत. खोलींच्या मध्यभागी नक्षीदार दगडी स्तंभ उभे आहेत. किल्ल्याची आंतरीक रचना विशेष बुद्धी चातुर्याने उभारलेली दिसुन येते. कारण द्वार ओलांडताना चुकुनही पलीकडचा कानोसा घेता येत नाही. पलीकडे कोणी आहे किंवा नाही असा चुकूनही अंदाज बांधता येत नाही. ही रचना नक्कीच द्वारपाल व रक्षकांसाठी बनवलेली असावी. जेणेकरुन अनोळखी व्यक्तीला किंवा शत्रुला त्याच्या नकळत कैद करता यावे यासाठी.
पुढे थोडे अंतर गेल्यावर सर्वत्र उजाड भाग आहे. त्या ठिकाणी एक मोठा तलाव बांधलेला आहे. तलावाचा दगळी शिळांचा बांध त्याच्या जन्माची साक्ष देतो की त्याचं बांधकामही त्याच काळात झालेलं आहे. चैत्रातल्या रणरणत्या ऊन्हात त्या आकाशाला भिडणा-या डोंगरमाथ्यावरील तलाव व तलावातील शांत शितल पाणी दुष्काळातही अस्तीत्वात असणं म्हणजे आश्चर्यच! थोडं पुढ्यात गेल्यावर एक आयताकृती महाल दिसतो. आजुबाजुला सगळं ओसाड रान आणि मध्ये एकाकी ऊन्हात उभा तो महाल.
शेकडो वर्षापासुन वादळ, वारा, ऊन, पाऊस यांच्या तडाख्यातसुद्धा अविचल उभा असलेला महाल एखाद्या वीरासमान त्या पठारावर अजुनही तग धरुन उभा आहे. महालामध्ये मागच्या भींतींच्या शिळामध्ये कोरीवकाम करुन देवघरासारखी प्रतिकृती तयार केली आहे. त्या ठिकाणी बहुधा देवघरच असावे. छताचे वैशिष्ट म्हणजे ते आतुन पाहिले असता घुमटाच्या आकाराचे छत आहे असा भास होतो आणि बाहेरुन पाहिल्यावर मात्र सपाट भाग दिसतो. छताला मध्यभागी व देवघराच्या अचुक वर भगदाड पडलेले असल्यामुळे दुपारी सुर्यमाथ्यावर आल्यावर त्याची महालमध्ये पडणार्या किरणांमुळे विलक्षण चित्र पाहायला मिळते.
हा किल्ला कोणत्या राजाचा होता किंवा कोणत्या कालखंडात बांधला गेला याची काही माहीती मिळु शकली नाही. वसई किल्ल्याची संपुर्ण माहीती कदाचित शिवकालीन इतिहास किंवा बखरींमध्ये मिळू शकते. परंतु या वसई किल्ल्याच्या जवळच समोरच्या डोंगरात 'घटोत्कच लेणी' कोरलेली आहे. या लेण्यांमध्ये गौतम बुद्ध, भगवान विष्णू व महादेवाची पींड कोरलेली आढळुन येते. त्यामुळे या किल्ल्याचा संबंध कुठल्यातरी हिंदू-बौध्द सम्राटाशीच असणार असा अंदाज येतो.
वसई किल्ला आज आहे त्या अवस्थेत पहायला मिळतो हे आपले भाग्यच. कारण किल्ल्याची स्थिती पाहता अजुन काही वर्षानंतर त्याचे अवशेष तरी पाहायला मिळतिल किंवा नाही याची शाश्वती नाही. शेकडो वर्षांपासुन नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आजही स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवलेल्या या मरणासन्न स्थितीत असलेल्या वास्तुचे जितके पोवाडे गावे तितके कमीच. म्हणुन माझ्याकडून या वास्तुला या लेखाच्या माध्यमातुन कृतज्ञ आदरांजली..!!
- माहीती, संकलन व लेखन
कल्पेश गजानन जोशी (सोयगांवकर)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा