$$$सवारी बालपणीची$$$

    मित्रांन्नो जुन्या आठवणींना उजाळा देऊन मी एक छोटासा लेख लिहिला आहे. खात्री आहे तो तुमच्याही हृदयाला स्पर्श करेल व तुम्हालासुद्धा तुमच्या बालपणी नक्की घेऊन जाईल.
       जीवन म्हणजे सदैव पुढे धावत जाणारी गाडीच नाही का... तिच्या वाटेत अनेक अडथळे अनेक खड्डे अनेक वळणं येतच असतात पण तरीही असते फक्त आगेकुच. जीवनाच्या गाडीला ना रिव्हर्स गिअर आहे ना थांबा पण पुढे मार्गक्रमण करायचे ते साईडमिरर मधील मागील गोड जुन्या आठवणी चाळत.
      आज मी माझ्या गाडीच्या साईड मिररमध्ये माझ्या बालपणीच्या शालेय जीवनातील काही आठवणी चाळल्या अन अपसूकच माझ्या चेहर्यावर हसू तरळलं..! किती अज्ञानी पण संवेदनशील असतो आपण लहानपणी. या जगाविषयी काही माहित नसतं आपणांस... कारण त्यावेळी आपलं जग फक्त आपले आईवडिलच असतात. 
    मला आठवतं, त्यावेळी रोज पहाटेच शिकवणीकरता आई झोपेतुन उठवायची... त्यासाठी तिला थोडा वेळ आधीपासुनच मला उठवावं लागायचं कारण एका आवाजात मी कधी उठत नव्हतो... उठल्यावर थोडा उशीर झालेला असायचा. मग घाईघाईत तयारी करायची अन पळायचं...! 
शाळेत जाताना आईने बनवलेला डबा न्यायचा अन मधल्या सुटीत सर्व मित्रांसमवेत खायचा. त्या डब्यातील तेल आणि चटणी लावलेल्या पोळीची तुलना आज कुठल्याही पंचतारांकीत होटेलातील कोणत्याही पदार्थासोबत होऊच शकत नाही!
त्यावेळचा दरवर्षीचा नविन दप्तर, वह्या पुस्तके, डबा व वाटरबॅग घेण्याचा तो आनंदाचा व उत्साहाचा क्षण जसा आठवतो तसा प्रगतीपत्रकावर बाबांची सही घेतानाची तारांबळही आज हृदयाचे ठोके वाढवल्याशिवाय राहत नाही. कधी कधी शिक्षकांकडुन विनाकारण शिक्षा व्हायची तेव्हा त्यांच्यावर फार राग येत असे अगदी शिव्यासुद्धा त्यांच्यामागे हासडल्या जायच्या पण त्याच शिक्षकांविषयी दुसर्या शाळेतील मित्राने अपशब्द काढल्यास त्याच्याशी बाचाबाची व शाब्दिक चकमक नक्कीच व्हायची.
त्यावेळेसचे ते मित्रांचे ग्रुप्स, आपापसातील वाद, गंमतबाजी, हा माझा ती माझी, तो खोडकरपणा अन वर्गातील मुलींना चिडवणं व त्यांच्यासोबत भांडणं या सार्या गोष्टीत इतका पराकोटीचा आनंद सामावलेला होता की सुटीच्या दिवशीही घरी करमत नसे.
शाळा सुटल्यावर पळतच जाऊन स्कूलबसमध्ये किंवा रिक्षामध्ये जागा सांभाळणे व जागेवरून पुन्हा मित्रमैत्रीणीत भांडणं करणे हेही नित्याचेच. त्यावेळी त्या धक्कास्टार्ट रिक्षाला धक्के देत देत आपण आज इतक्या दूर निघुन आलोय की मागे फक्त आठवणींचा ढगाळलेला धूर धूसर झालेला दिसतोय. 
   काही दिवसांपूर्वी माझ्या शाळेत (ललवाणी हायस्कुल) गेलो होतो. बदल काहीच नाही. बरेचशे तेच शिक्षक, त्याच शिक्षिका, तेच शिपाई, त्याच भिंती, तेच मैदान मात्र कमी भासली ती माझ्या जिव्हाळ्याची मित्रांची. असं वाटत होतं कुठून तरी एखादा मित्र येईल अन हाक देईल...पण फक्त आभास!!! 
शाळेच्या पायरीवर असतानाच 'मनोज पाटीलसर' आणि 'गुजरसर' यांचा कणखर आवाज त्यांच्या उपस्थितीची जाणिव करून देत होता, एका वर्गात नाईकसरांची काँमेडी एक्सप्रेस सुसाट धावत होती, सोनवणे मँडम कुणावरतरी राग काढत होत्या. काही वर्गात गोंधळ तर काही वर्गात शांतता होती. प्रत्येक गोष्ट न्याहाळत मी संथपणे चालत होतो व आॅफिसबाहेरील बाकावर बसणार तोच कानावर 'जोशीबुवा' आवाज आला अन माझी भंबेरी उडाली. आवाज ओळखीचा होता त्यात आनंद आपुलकी व थोडंबहुत प्रेम यांचं अनोखं मिश्रण होतं. चकित होऊन आवाजाच्या दिशेने पाहिलं... समोर आम्हाला गणित व विज्ञान शिकवणारे मुख्याध्यापक 'खलचेसर' आणि 'आर आर चौधरीसर' उभे होते.
चटकन सरांजवळ गेलो नमस्कार केला. त्याबरोबर खलचेसरांकडुन एक पूर्वीसारखा गालगुच्चा मिळाला. माझी व माझ्या मित्रांची प्रगती सरांना ऐकवली ते ऐकुन सरांना फार आनंद झाला. 
तेव्हाचे ते काही क्षण शाळेत घालवले अन काही कटू मधुर आठवणींच्या डोहात अक्षरश: होरपळुन निघालो... त्याची साक्ष परतताना डोळ्यात आलेले दोन अश्रु देत होते अन मला सांगु पाहत होते " ते जीवनच वेगळं होतं...ते जीवनच वेगळं होतं"...!! अश्यावेळी वाईट वाटत असतानाच हायसं वाटत होतं ते एका गोष्टीचं की ते माझे मित्र मैत्रिणी आजही माझ्यासोबतच आहेत आणि आपापल्या आयुष्याच्या प्रगतीपथावर आहे.

"खरंच आयुष्य हे असंच असतं
जमेल तसं जगायचं असतं
भविष्यात तर रोजच असतो
आठवणीत कधी भिजायचं असतं
जीवनात रोज नवं कोडं असतं
उत्तर फक्त शोधायचं असतं
दु:ख कोणाच्या वाटे नसतं
चंद्रालासुद्धा ग्रहण असतं"

आजपर्यंतच्या आयुष्यात सर्व काही मिळालं आणि खात्री आहे की पुढेही मिळेल पण रोज एक गोष्ट मला दुखवत असते ती म्हणजे "आठवण"!!
     लहान असताना देवाजवळ रोज एकच मागणं असायचं "देवा मला लवकर मोठं कर!" पण आज मात्र देवाकडे रोज मागणं मागावसं वाटतं की "देवा पुन्हा लहानगं कर... देवा! पुन्हा लहानगं कर...!!"

- कल्पेश गजानन जोशी (कवेश)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान