#विद्यार्थ्यांना गंडवणार्यांच्या मानगुटीवरील भूत!#
'शिक्षणाचा बाजार झालाय'., 'शिकायचंय? मग ओत पैसा', 'शिक्षण म्हणजे गरिबाचं काम नाही'..वगैरे वगैरे. असे वाक्य आजपर्यंतच्या आयुष्यात कुणी ऐकले नाही असा क्वचितच कुणीतरी मिळेल. कारण ही वाक्य शिक्षणाशी संबंध आलेल्या व्यक्तीच्या त्याला येत असलेल्या वाईट अनुभवातून परिचयाची होतातच. चुकीची व अर्थहिन शिक्षणपद्धती, संस्था उभारणार्यांची हुकुमशाही, विद्यार्थ्यांकडून अवाजवी आकारले जाणारे शुल्क, खाजगी महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांची दडपशाही, विद्यार्थ्यांना कारण नसता त्रास देणे, घुमजाव करणे, विद्यार्थ्यांची बोळवण करणे अश्या अनेक कारणांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांवर दररोज अन्याय होत
असतो. पण याविरुद्ध कुणी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत नाही. केलाच तर त्याला धमक्या येतात. परिक्षेत त्रास दिला जातो. कार्यालयीन कामात जाणुनबुजून अडथळा आणला जातो. त्या विद्यार्थ्यावर नापास होण्याचीही वेळ येते व काॅलेजातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांकडून त्या विद्यार्थ्याला मानसिक त्रास दिला जातो. म्हणुन वैयक्तीकरित्या या प्रणालीला किंवा अन्यायाला विरोध करणे म्हणजे 'स्वत:च्या हाताने स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेणे' असंच सगळ्यांना वाटतं व सगऴेच या दडपशाहीला व अन्यायाला बळी पडतात. म्हणुन या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भारतिय वैचारीक व राष्ट्रवादी संशोधकांनी जालीम उपाय शोधुन काढला. तो म्हणजे 'अखिल भारतिय विद्यार्थी परिषद'! अर्थातच 'ABVP'! या विद्यार्थी परिषदेचा शंखनाद ऐकुन लुटारु संस्था चालकांचे व महाविद्यालयांचे धाबे दणाणत नसतिल तर नवलच!
विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी बाहेरगावी जायचे. महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आणि 'काॅलेज' नावाच्या 'रेड्याला' दररोज पैश्याची आणि लाचारीची 'ढेप' टाकत जायची हे जणू नित्याचंच! पण आजकाल ही ढेप खाऊनही काही रेड्यांचे पोटच भरत नाही. अश्या वेळी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या हातातील काठी बघितली की या रेड्याला 'ढेकर' आल्याशिवाय राहत नाही! आता विद्यार्थी परिषद म्हणजे 'आतंकवादी' किंवा 'नक्षलवादी' आहे असा काही गैरसमज नसावा. नाहीतर आजकाल राष्ट्रवाद्यांना 'आतंकवादी' म्हणण्याची जणु फॅशनच झालीये. विद्यार्थी परिषदेचं कोणत्याही शिक्षण संस्थेशी वैर नाही. विद्यार्थ्यांच्या हक्कावर जेवा गदा येते तेवा विद्यार्थी परिषदेला हाती 'गदा' घ्यावी लागते व विद्यार्थ्यांची पिळवणुक करणार्यांना गदगदा हलवावे लागते एवढेच.
विद्यार्थी परिषदेच्या अलिकडेच काही दिवसांपुर्वी (२५ जुलै) झालेलं 'मिशन देवगिरी काॅलेज' हे उत्तम उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो. देवगिरी काॅलेजात स्टेशनरी फीस व माहीती पुस्तिकांच्या (Information Brochure) माध्यमातुन विद्यार्थ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर लूट चालु होती. जी महाराष्ट्रातील जवळपास सर्वच काॅलेजात सर्रास चालु आहे व त्याला असंख्य अगणित विद्यार्थी बळी पडताहेत. यामध्ये स्टेशनरी शुल्क प्रती विद्यार्थी रुपये ५०००/- तर माहीती पुस्तिका रुपये ५००/- इतकी शुल्क विद्यार्थ्यांकडून दरवर्षी उकळले जात होते. काॅलेजची, तेथिल शिक्षकांची, प्राचार्यांची व एकुणच त्या काॅलेजची आजपर्यंत केलेल्या चांगल्या कामांची माहीती नवीन प्रवेश घेणार्या विद्यार्थ्याला मिळणे व त्याला प्रवेश घेण्यासाठी आकर्षित करणे हाच 'माहीती पुस्तीकेचा' उद्देश्य! मग यामध्ये विद्यार्थीहित कुठे आहे? विद्यार्थ्यांनी यासाठी का म्हणुन पैसे मोजावे? काॅलेजच्या वैयक्तीक प्रचारासाठी विद्यार्थ्यांनी यांना ही दक्षिणा का द्यायची? काॅलेजचे प्रवेश शुल्कही लाखो रुपयांपर्यंत असतेच मग तरीही अतिरिक्त स्टेशनरी फीस विद्यार्थ्यांनी का म्हणुन यांच्या झोळीत घालायची? त्या प्रवेश शुल्कामध्येच विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहीजेत आणि तसे होत नसेल तर तो विद्यार्थ्यावर महाअन्याय आहे. देवगिरी महाविद्यालय, संभाजीनगर (औरंगाबाद) येथे शेवटी या अन्यायाचा भडका उडालाच. १८ जुलैला महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आदरपुर्वक निवेदन देण्यात आले व विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळासोबत २१ जुलै रोजी चर्चादेखिल झाली. परंतु दोन दिवसात महाविद्यालयातर्फे कोणताही पाठपुरावा झाला नाही. म्हणुन २५ जुलैला विद्यार्थी परिषदेने आंदोलनच छेडले. विद्यार्थ्यांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणिव झाली व देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसुन आला.
विद्यार्थ्यांचा आवेश आणि आक्रोश पाहुन तेथील प्राचार्यांनी विद्यार्थी परिषदेच्या शिष्ट मंडळासोबत चर्चा केली. चर्चेमध्ये विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही तडजोड न करता आपल्या मागण्यांचा जोर लावुन धरला. अखेर शेवटी मा. प्राचार्यांकडून लेखी आश्वासन घेऊनच विद्यार्थी परिषदेचा विजयी भगवा त्या पठ्ठ्यांनी फडकवला! महाविद्यालयाने विद्यार्थी परिषदेच्या सर्व मागण्या पुर्ण केल्या. एवढेच काय तर ज्या ज्या विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले गेले होते त्या सर्वांना शुल्क परत केले जाईल हेही लेखी आश्वासन घेतलेले आहे.
आता हा विजयोत्सव वाचुन तुम्हाला आनंद वाटेल खरा. पण, अभाविपच्या कार्यकर्त्यांसाठी हा क्षणिक पण प्रेरणादायी आनंद आहे. ही लढाई पार पडत नाही तोच दुसरी लढाई त्यांची वाट पाहतच असते. प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या काही ना काही समस्या आहेतच. खरे पाहता विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी महाविद्यालयात मांडायला पाहीजे पण त्यांची होत असलेली मुस्कटदाबी पाहता त्यांचा कल 'अभाविप' सारख्या संघटनांकडे वाढलेला दिसतो. मिशन देवगिरीसारखे अनेक मोठमोठे मोर्चे, आंदोलनं करुन विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बर्याच मोहीमा फत्ते केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचे संरक्षण करत असताना राष्ट्रद्रोही गोष्टींना खतपाणी घालणार्या घटकांवरही विद्यार्थी परिषदेची करडी नजर असते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे जवाहरलाल युनिवर्सिटी, दिल्ली येथुन समोर आलेले देशद्रोही 'कन्हैया कुमार' व 'उमर खालीद'. यांचे देशद्रोही बुरखे फाडुन खरं रुप जगासमोर आणण्याचे कामही विद्यार्थी परिषदेचेच होते. म्हणुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे विद्यार्थ्यांना लुबाडणार्यांच्या शैक्षणिक संस्था व भारतीय तरुणाईला राष्ट्रवादी विचारसरणीपासुन दूर नेणार्या राष्ट्रद्रोह्यांच्या मानगुटीवर बसलेले 'भूत' आहे. जिथे भानामती (धमक्या) आणि करणी (साटंलोटं) सपशेल फेलच!
भारतात आज युवकांची संख्या जास्त आहे ही आनंदाची बाब. पण त्यातील बहुतेक विद्यार्थी व्यसनाधीन व देशाधर्माविषयी थोडीही चिंता नसलेले शुन्य बुध्यांकात वावरत आहेत. शारीरीक तसेच बौध्दीक श्रेष्ठत्व असलेला भारतीय युवक गच्चाळ अधोगामी शिक्षणामुळे राष्ट्रीयत्व, राष्ट्रवाद, देशभक्ती या संकल्पनांपासुन दूर जात आहे. सुखी आणि चैनीचं जीवन कसं जगता येईल याचा विचार आज बहुतांश युवक करतोय. फार कमी तरुणांची लष्करात भरती होण्यासाठी धडपड असते. याला कारण म्हणजे अर्थहीन शिक्षणपद्धती. परंतु अश्या परिस्थितीतही विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन देशाचं नेतृत्व आणि संरक्षण करण्यासाठी विद्यार्थी परिषदेसारख्या संघटनेमधून पुढे येताना दिसताय. शिक्षणाचा बाजार मांडून विद्यार्थ्यांकडून आर्थिक शोषण करणार्या शिक्षण संस्था त्यांचा उदरनिर्वाह मस्त चालवत आहेत. पण यांच्या उदरावर लाथ मारुन या शिक्षण सम्राटांचे कंबरडे मोडण्याचे विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठीचे कार्य 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद' करत आहे. या लढाईमध्ये प्रत्येक विद्यार्थी सहभागी होऊन स्वत:साठी व देशासाठी स्वयंपुर्ण होणे विद्यार्थ्यांसमोरील आव्हान आहे.
-कल्पेश गजानन जोशी
मु.पो.ता. सोयगांव जि. संभाजीनगर
Kavesh37@yahoo.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा