"वेड्यांचा बाजार"..!

 

    अहो राम गणेश...! काय हे तुमचे लिखाण. काय तुमचे साहित्य. काय तुमचे विनोद..! अहो... असे काय लिहिले तुम्ही? जे शब्द दिसायला आणि सुचायला तब्बल एक शतक उलटावे! मिस्टर इंडिया सिनेमा ऐकुन होतो.  पण तुमची अक्षरंही आता 'मिस्टर इंडिया' व्हायला लागली वाटते..? इतक्या वर्षानंतर ती दिसली..! आणि लिहीलंय तरी काय आपण? तो दस्तरखुद्द छत्रपतींचा अपमान! संभाजी राजांची बदनामी! अहो राम गणेश...! तुम्हास कल्पना नव्हती काय.? तुम्ही लिहिताय ते काही दिवसानंतर तथाकथीत शिवभक्तांच्या वाचनात येईल. याचा जराही विचार केला नाही हो आपण. तशी तुम्हाला कशी कल्पना असेल म्हणा. तुम्हाला कुठं ठाऊक...उद्या असेही 'पक्ष' स्थापन होतील जे प्रसिद्धीसाठी पुतळ्यांची कापाकापी करतील. आपल्याला निदान राजकारणाविषयी जरी थोडं सज्ञान असतं तरी असं घडते ना. राजकारणात खुर्चीसाठी जिवंत माणसांचे गळे कापायला कमी करत नाहीत लोक. गोळ्या घालायला आणि विषप्रयोग करायलाही कचरत नाही. तेव्हा तुमच्या पुतळ्यावर राग काढणं म्हणजे खूप धारिष्ट्याचं काम आहे असं काही नाही हं..!
    असो... आम्हा साहित्य रसिकांना आणि तुमच्या चाहत्यांना हायसे वाटले ते याचे. की आपल्याला जिवंतपणी  असा काही अनुभव आला नाही. अन्यथा तुमचे मारेकरीदेखील सापडले नसते. इथे तुमच्या स्वप्नातल्या महाराष्ट्र देशामध्ये पुतळे फोडणारे तरी लगेच सापडतात हो. पण जिवंत पुण्यात्म्यांचे जीव घेणारे आणि तरुणांची माथी भडकवणारी नालायक माणसं कोणाच्या नजरेत पडतच नाही. अगदी पोलीसांनादेखील! तेव्हा आपल्यावर जे संकट ओढवलं ते खूपच क्षुल्लक म्हणावं लागेल बरे. तसा त्या पुतळा तोडणा-यांना दोष देऊनही काय उपयोग म्हणा.? त्यांचे तोडणारे हात तेवढे दिसले. पण तोडायला सांगणारे निर्बुद्ध व अक्कलशुन्य मेंदूयुक्त माथे कुठे दिसले? खरे दोषी तर तेच. पण तरी काळ्या किर्रर्र...रात्री, थंड वा-याच्या वर्दळीत, शेजारच्याच भल्या मोठ्या मुठेशेजारी, चाणाक्ष नजरेच्या चंद्र चांदण्यात आणि विशेष म्हणजे छत्रपती संभाजी राजांच्या नामे असलेल्या पवित्र पावन बागेत येवून तुमच्या पुतळ्याला उखाडून फेकणे साधं सुधं काम नव्हे! मर्द रांगड्यांची व्याख्या करायची झालीच तर ती हीच. किती शौर्याचे काम हे!! इतके शुरवीर आहेत ही माणसं की निर्जीव पुतळ्यांना तेवढे भितात.! म्हणुनच तुमच्या जीवंतपणी राजसंन्यासविषयीचा 'राज' विचारायची छाती झाली नाही वाटते कुणाची.
     अहो राम गणेश पण... तुमचे फक्त राजसंन्यास हे अर्धवट लिहलेले नाटक पाहुन जसा या रसिकांना राग आला तसं तुमचं शिवरायांचं स्तुती सुमन लिखाण पाहून उद्या तुमच्या पुतळ्याला पुष्पार्पणही करतिल हो हे लोक. इतकंही मनाला नका लावुन घेऊ. काही जात्यंधांनी जशी तुमची विटंबना केली तशीच काही जातीवंतांनी तुम्हाला पुन्हा सन्मानाने चौथ-यावर विराजमानही केलेच. तुम्ही तुमच्या काव्यातून, नाटकातून, कवितांमधून आणि इतर साहित्यातून आनंद दिला तो फक्त मुठभर जातीवंतांनाच. नाही का? पुतळा तोडला तो जातीयद्वेषातून आणि पुतळा पुन्हा उभारला जाणार तो जातीय समर्थनातून! हे वर्तन कदाचित तुम्हालाही आवडणारे नसेल नाही? तुमच्या पुतळ्याकडे एका विनोद सम्राटाकडे पाहुन  आनंद शलाका चेह-यावर फुलणा-या रसिकांनीच तुमच्यापाशी यावे. अशीच तुमची प्रबळ मनोमन इच्छा असेल. पण तसे होणार नाही. तुमच्या राकट देशात, कणखर देशात  जातीयवाद नसानसात भिनला आहे राम गणेश...!
      अहो...राम गणेश. मुठभर लोकांना खूष करण्याच्या प्रयत्नात राजसंन्यास मधून हे महाभयंकर पाप करण्यापेक्षा 'जाॅनी जाॅनी येस पापा' किंवा 'ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार' सारख्या कविता केल्या असत्या तर त्या निदान या मराठी माणसांच्या आणि लंगोटातल्या लेकरांच्या मुखात आज असत्या तरी. तुम्ही लिहिलेत "राजसंन्यास"! तेही मराठीतून!! कसं कळणार तुमचं साहित्य? इथे स्वच्छ मराठीत बोलण्याची बोंबाबोंब आमची..! तेव्हा तुमचा साहित्यविष्कार कळण्यासाठी  ही मस्तकं निरुपयोगीच ठरणार. संटा-बंटाच्या बेचव विनोदावर हसणारी ही पिढी...तुमच्या "-हस्व दीर्घ"च्या साहित्याला कशी आपलं करेल? ज्या महाराष्ट्राला तुम्ही "नाजुक देशा, कोमल देशा" म्हटले त्याच महाराष्ट्रील अतिकोमल लोक नाजुक मने असलेल्यांच्या पुतळ्यांचे रात्री अपरात्री विखंडण करतात. अहो राम गणेश... तुमचं सखोल उच्चभु साहित्य समजुन घेण्याइतका परिपक्व नाही हो हा कणखर देश. "क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा" या तुमच्या एका ओळीवरसुद्धा कडकडा टाळ्या पडतिल इथे...पण या प्रेमपुजारी पिढीसमोर तुम्ही घेऊन आलात विनोदी वाडमय..! "गुणी बाळ असा जागसी कारे वाया...नीज रे नीज शिवराया" हा तुमचा अप्रतिम 'पाच देवींचा पाळणा' आजही कित्येक मातां-भगिणींच्या मुखात असतो. पण तुम्ही या संवेदनहिन 'राकट देशा'त घेऊन आलात ते विनोदी नाटक! अहो राम गणेश... तुमचे "एकच प्याला व प्रेम संन्यास" अक्षरश: डोक्यावर घेतले हो लोकांनी. पण तुम्ही घेऊन आलात 'राजसंन्यास'- तेही एक अर्धवट नाटक. एका पवित्र कल्पीक लेखकाचं मन जाणुन घेणारा नाही हा समाज. काय केलंत तुम्ही हे?? ही घोडचूक घडली रामगणेश तुमच्याकडनं 'घोडचूक'..!!
     तुमचे एक नाटक मला आठवते. "वेड्यांचा बाजार"..! त्यातला मधुकर म्हणतो.."वेड्यांचा बाजार आहे आमचे 'घर' म्हणजे". मधुकरसाठी घर म्हणजे महाराष्ट्र तर नाही ना..?
राम गणेश...अहो तुमच्या कृत्यामुळे कित्येक धावत्या लेखण्या मंद मंद झाल्या असतिल आज. आमच्यासारख्या कित्येक नवसाहित्यीकांना अश्या कृत्यांमुळे धडकी भरतेय. तुमच्यासारख्या कित्येक लेखकांच्या कलमांनी राजाश्रय घ्यायचे योजिले असतिल. आणि पुतळे? कित्येक पुतळे अश्या तोडफोडीमुळे भितीने अवगुंठून बसले असतिल. काळोख्या रात्री पुतळ्यांनाही असुरक्षितता भासत नसेल कश्यावरुन? कारण...हा पुतळे पळविण्याचा आणि पुतळे तोडफोडीचा कार्यक्रम काही आजकालचा नाही बरे. तुमच्या आधी "दादोजी कोंडदेव" यांच्यावरही हा प्रसंग ओढवलेला. तेव्हा केवळ पुण्यातल्याच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रातल्या यांसारख्या वेड्यांच्या बाजारात निर्जीव पुतळे कधी निर्धास्त होतील आणि सजिव पुतळे कधी हुशार होतील हे देवच जाणे.
- कल्पेश गजानन जोशी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान