बँडबाजा आणि मनो'रंजन'

#बँडबाजा आणि मनो'रंजन'#

     भारताला अनेक विचारवंतांचा वारसा लाभलेला आहे. यावर शिक्कामोर्तब करण्यास हरकत नसावी. पण कधी कधी सामान्य माणसाचाही विचारवंत व्हावा असा चमत्कार घडतो. काही तरी जगावेगळं करावं, म्हणजे अपसुकच आपल्याकडे नजरा वळतात. आपली चर्चा होते. एकुणच प्रसिद्धी मिळते. आजकाल असं काहीतरी करणे ही जणु फॅशनच झालीय. काहीतरी चांगले कार्य करुन नावलौकीक मिळविणे अवघड. पण त्यामानाने हे काम अगदी सोपे नाही का. मग या साध्यासोप्या मार्गाला जनतेचे तथाकथीत कैवारी तरी कसे भुलतिल? असाच काहीसा प्रताप गाजविण्याचे स्वप्न एका महान जनसेविकेने मनात आणले तर यात आश्चर्य ते काय..?

      काॅन्ग्रेसच्या महान खासदार 'श्रीमती रंजित रंजन' यांच्या मनपटलावर अचानक जनसेवा करण्याची इच्छा झाली आहे. देशातील 'गरीब व गरीबी'मुळे त्या अत्यंत अस्वस्थ झालेल्या आहेत. म्हणुनच त्यांनी एक अजब शक्कल लढविण्याचा 'छोटा भीम' पराक्रम केला आहे. भारतात लग्न समारंभात होणा-या वारेमाप खर्चाबाबत ह्यांना भयंकर चिंता लागली आहे. अगदी वरवधूच्या पित्यापेक्षाही! अशी जनतेची आणि विशेषत: गोर-गरीबांची काळजी वाटणा-या नेत्या आपल्या लाभल्या हे आपलं मोठं भाग्यच नाही का? लग्नात होणार्या अमाप खर्चावर गदा आणण्यासाठी आता नवीन कायदाच आणायचे त्यांनी ठरविले आहे. 'अश्या प्रकारच्या लग्न समारंभावर अंकुश ठेवून पाच लाखापेक्षा जास्त खर्च झाल्यास त्यापैकी दहा टक्के रक्कम ही गरीबांच्या मुलींच्या लग्नासाठी देणे बंधनकारक होणार आहे.' श्रीमंत लोक अनावश्यक खर्च करतात त्यामुळे गरीबांवर दडपण येते. त्यांच्याकडूनही अशीच अपेक्षा केली जाते. असे यांचे म्हणणे आहे. गरीब व मध्यमवर्गीय जनतेला ही बातमी ऐकुन आनंदच होईल. पण एखाद्या ठिकाणचं भोक बुजण्यासाठी चांगल्या कापडाच्या चिंध्या का म्हणुन करायच्या? हा खरा सवाल आहे.

     खासदार रंजित रंजन यांना मुळात गरीबाची सेवा करायचीय की श्रीमंतांवर राग काढण्याचा हा प्रयोग आहे तेच कळत नाही. कारण समाजातल्या एका वर्गाला मदत करण्यासाठी दुसर्या वर्गाला जोखडबंद करण्यात कुठले शहाणपण? गरीबांना त्यांच्या मुलामुलींचे लग्न लावण्यासाठी अनंत अडचणी येतात हे निर्विवाद आहे. पण त्यावर हा उपाय होऊ शकत नाही. असेही गरीबाची मुलगी गरीबच घरात दिली जाते. त्यामुळे वरपिता त्यांच्या सोहळ्याची तुलना श्रीमंताच्या लग्न सोहळ्याशी करतो ही फक्त तुलनाच होऊ शकते. "अंथरुण पाहुन पाय पसरावे" हे वाक्य समाजाने चांगलेच ध्यानात घेतले आहे. त्यामुळे असे प्रश्न सहसा उद्भवत नाही. पण तरीही समाजातला एक वर्ग श्रीमंत आहे म्हणजे त्याच्याकडे पैश्याचे झाड आहे किंवा काळा पैसा आहे असं नाही. त्या लोकांनीही तो पैसा कष्टानेच मिळविला आहे. कोणी किती खर्च करायचा व लग्नसोहळा किती धूमधडाक्यात करायचा आणि कोणाला काय दान द्यायचे हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. त्यासाठी बळजबरी होऊ शकत नाही.

    समाजातील गरीब कष्टकरी वर्गाला श्रीमंताविषयी एक प्रकारची असुया किंवा घृणा आहे हे काही नाकारण्यासारखे नाही. आणि याचाच फायदा अनेकदा
नेत्यापुढा-यांकडून होत असतो. त्याला हा अपवाद नाही. अनेक स्वयंसेवी संस्थांमार्फत किंवा व्यक्तीश: हिच श्रीमंत माणसं वेगवेगळ्या माध्यमातुन आर्थिक मदत किंवा वस्तुच्या स्वरुपात मदत करत असतात. सणावारांच्या दिवशी विविध जातीधर्माच्या व पंथांच्या लोकांचे 'हेल्पींग हॅण्ड' गरीबांपर्यंत पोहचत असतात. हेही तितकेच खरे. ग्रामीण तसेत शहरी भागात लग्न समारंभात किंवा कोणत्याही कार्यक्रमात गावपंगत असतेच. तिथे येणारे सगळेच एकजात साहेब असतात असे नाही. गावातील सर्व समाज त्याचा आस्वाद घेतो. गरीब व श्रीमंत या दोन वर्गामधल्या दरीत सुजाण सज्जन लोकांनी 'मदतीचा सद्भावना पुल' कधीच बांधुन टाकला आहे. ते रंजन यांना ठाऊक नाही यात त्यांचा मुळी दोष नाही. कारण या पुलाच्या उदघाटनाला ना त्यांना कोणी बोलावले ना या पुलावरुन त्यांनी कधी प्रवास केला. त्यामुळे ते याबाबत अनभिन्न असणारच.

     एकीकडे म्हणायचं की भारत गरीब देश आहे. देशात गरीबी ही बिकट समस्या आहे. आणि एकिकडे जे श्रीमंत आहेत त्यांच्या पायात लोंढणे बांधायच? गरीबांसाठी आम्हाला बँकेचे व्याजदर कमी करता येत नाहीत. गरीबांच्या मुलींच्या लग्नासाठी सोयी सवलती देता येत नाही. हुंडा प्रथेचा महाभयंकर राक्षस कायदा करुनही अमर राहतो. हुंडा प्रथेचे चटके जर बसत असतिल तर ते विशेषत: गरीबांनाच. हुंडा प्रथेविरोधात त्यांचे समुपदेशन कोणी करत नाही. व्यसनाधिनतेचा बिकट प्रश्न जनतेला भेडसावतोय. अनेकांची आयुष्य उध्वस्त झाली या व्यसनांमुळे. केवळ दारुसारख्या व्यसनांमुळे गरीबाच्या लग्न कार्यात विघ्न येतात. नातेवाईक एकमेकांच्या मानगुटीवर बसतात. मुडदे पाडतात. अश्या बातम्या आपल्याला आता रोजच ऐकायला मिळतात. या कायद्यामुळे हातोडा पडेल तो बँण्डपार्टीवरच! बँण्डपार्टीत काम करणारे शंभरटक्के लोक हे गरीब-मध्यमवर्गीय असतात. या कायद्यामुळे त्यांच्यावर घाला येणार. रोज रोज काहीतरी नवीन नियम  करण्यामुळे कायदे गुंतागुंतीचे होतायेत व जनताही संभ्रमित होतेय याचा विचार करण्याची गरज आहे. नाहीतर जनतेच्या मनात कायद्यांबद्दल अनादर निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.
-कल्पेश गजानन जोशी, सोयगांव
kavesh37@yahoo.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे...

मराठवाडा मुक्तीसंग्राम: वीरांगना दगडाबाई शेळके व सोयगांवचा ऐतिहासिक लढा

हुतात्मा वेदप्रकाश: मराठवाडा मुक्तीसंग्रामातील पहिले बलिदान