मला भावलेलं पहिलं साहित्य संमेलन

गेल्या आठवड्यात नागपुरात समरसता साहित्य संमेलन पार पडले. मीही गेलो होतो. या अगोदर अहमदनगरला 2017 मध्ये झालेल्या समरसता साहित्य संमेलनलाही मी हजेरी लावली होती. नगरला झालेल्या संमेलनात केवळ अनुभूती घ्यायला गेलो होतो. साहित्य संमेलन म्हणजे काय, हेच जाणून घ्यायचं होतं. त्या अगोदर इतर ठिकाणी काही साहित्य संमेलनासही गेलो होतो. पण त्यामुळे माझ्या मनात साहित्य विश्वाबद्दल एकप्रकारे नकारात्मकता निर्माण झाली होती. साहित्य संमेलन म्हंटलं की तीच ती रडकी काव्य, अमक्या वरचा अन्याय, तमक्यावरील द्वेष, राजकारण केवळ ह्याच विषयांची जंत्री पाहिली होती. आपण कोणत्या काळात जगतो आहोत हाच विसर जणू पडावा असे निरुत्साही आणि नकारात्मक वातावरण दिसले म्हणजे साहित्य संमेलन अशी भावना होऊन गेली होती. वशिलेबाजी करून निवडक व विशिष्ट नावं पुढं करायची. सांगायला तोंड वर करून सांगायचं की हे विचारांचं व्यासपीठ, पण विशिष्ट विचाराच्या लोकांनाच तिथे संधी द्यायची. काहींना खड्यासारखे बाजूला काढून फेकायचे अश्या गोष्टी अनुभवल्या होत्या. पण या वर्षी उदगीरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे थोडं स...